मुंबई : जमीर काझी : महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शपथ घेतली. आझाद मैदानावर आयोजित केलेल्या भव्य सोहळ्यात त्यांच्यासह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन् यांनी या तिघांना शपथ दिली. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी तिसऱ्यांदा तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी सहाव्यांदा शपथ घेतली. (Maharashtra CM Oath Ceremony)
मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर तातडीने उपमुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे हे राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिले नेते ठरले आहेत.
विक्रमी बहुमत मिळूनही बारा दिवस लांबलेल्या महायुती-२ सरकारचा अखेर गुरुवारी मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात झाला.
पहिल्या टप्प्यात तिघांचा शपथविधी करण्यात आला असून हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार आहे. महायुतीतील घटक पक्षात खातेवाटपाबाबत अद्याप एकमत झालेले नाही.
विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये तिन्ही पक्षांचे माजी मंत्री, आमदार, नेते आणि कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते.
यावेळी अनेक केंद्रीय मंत्र्यांसह, भाजपाचे राष्ट्रीय नेते, भाजपशासित अनेक राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाच वाजून ३० मिनिटांनी व्यासपीठावर आगमन झाले. त्यानंतर तातडीने शपथविधी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. त्यापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
प्रमुख उपस्थितांमध्ये व्यासपीठावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवराजसिंह चव्हाण, ज्योतिरादित्य शिंदे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा,रामदास आठवले आदींचा समावेश होता.
सोहळ्यासाठी राज्य शासनाने त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या अनेक साधू-संतांना निमंत्रित केले होते. त्यात रामकृष्ण महाराज लहवितकर, महंत भक्तिचरणदास, महंत गणेशानंद सरस्वती, महंत रमणगिरी महाराज, माधवदास राठी, ह.भ.प. संजय धोंडगे, महंत सुधीरदास पुजारी, स्वामी संविदानंद सरस्वती, कांचनताई जगताप, महंत डॉ. अनिकेतशास्त्री देशपांडे आदींचा समावेश होता. हे सर्व महंत पहाटेच्या सुमारास नाशिकहून मुंबईकडे निघाले होते.
पंतप्रधान कार्यालयाला विनंती करून देवेंद्र फडणवीस यांनी ही व्यवस्था केली. त्यामध्ये नानीजचे नरेंद्र महाराज, अण्णासाहेब मोरे (दिंडोरी), प्रसाद महाराज अमळनेरकर, चंद्रशेखर महाराज देगलूरकर, विद्ध्वांस बाबा महानुभाव ( फलटण), कारंजेकर बाबा महानुभाव, जैन मुनी लोकेश, नामदेव शास्त्री सानप, (भगवान गड), विठ्ठल महाराज (गहिनीनाथ गड), राधानाथ स्वामी (इस्कॉन), राजेश साई (सिंधी समाज), भूषणस्वामी रामदासी (सज्जनगड), रामगिरी महाराज यांचाही समावेश होता. (Maharashtra CM Oath Ceremony)
या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
योगी आदित्यनाथ : उत्तर प्रदेश
चंद्राबाबू नायडू : आंध्रप्रदेश
नितीन कुमार : बिहार
प्रेमा खांडू : अरुणाचल प्रदेश
हिमंत बिश्व शर्मा : आसाम
विष्णूदेव साय : छत्तीसगढ
प्रमोद सावंत : गोवा
भूपेंद्र पटेल : गुजरात
नायब सिंग सैनी : हरियाणा
मोहन यादव : मध्य प्रदेश
कॉनराड संगमा : मेघालय
भजनलाल शर्मा : राजस्थान
मानिक साहा : त्रिपुरा
पुष्कर सिंग धामी : उत्तराखंड
मंत्रिपदासाठी मोठी चुरस
नव्या सरकारमध्ये मंत्री होण्यासाठी भाजपा-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अनेक आमदार इच्छुक आहेत. त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने लॉबिंग सुरू केले आहे. मात्र मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही.
सेलिब्रिटींची हजेरी
शपथविधी सोहळ्यासाठी फडणवीस यांच्या मातोश्री शारदा फडणवीस,पत्नी अमृता फडणवीस, मुलगी दिविजा, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी व त्यांचे कुटुंबीय, प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, त्यांची पत्नी अंजली तेंडुलकर, बॉलीवूडचा किंग शाहरुख खान, सलमान खान, संजय दत्त, रणबीर कपूर, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, वरूण धवन, श्रद्धा कपूर आदींचा समावेश होता. तसेघ विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना शपथविधीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये अहिल्यानगर येथील आदर्श गाव हिवरे बाजारचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार हेही उपस्थित होते.
एकनाथ शिंदे अखेर राजी !
नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावे, असे भाजपा पक्षश्रेष्ठीसह नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेच्या आमदारांचीही इच्छा होती. मात्र शिंदे त्यासाठी तयार नव्हते. अखेर बुधवारी रात्री उशिरापर्यंत आणि गुरुवारी सकाळी त्यांची फडणवीस व शिवसेनेच्या नेत्यांनी मनधरणी केली. त्यानंतर ते पद स्वीकारण्यास तयार झाले. नंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उदय सामंत आणि अन्य नेत्यांनी राजभवनावर जाऊन शिवसेनेच्यावतीने उपमुख्यमंत्रीपदासाठी शिंदे यांचे नाव दिले.
मुख्यमंत्रिपदावरून तातडीने उपमुख्यमंत्री
काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पदभार सोडल्यानंतर नव्या सरकारमध्ये तातडीने उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे सहभागी झाले. एखाद्या राजकीय नेत्याने अशा पद्धतीने तातडीने पदभार स्वीकारण्याची ही महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील राजकारणातील पहिलीच घटना असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात आले.
विरोधी पक्षाची अनुपस्थिती
शपथविधी सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट व काँग्रेसमधील एकाही बड्या नेत्याने शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली नाही. शरद पवार गटाचे माढ्यातील आमदार अभिजीत पाटील मात्र सोहळ्याला उपस्थित होते. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला.
Mumbai: Devendra Fadnavis takes oath as Chief Minister of Maharashtra
Prime Minister Narendra Modi, Union Home Minister Amit Shah, BJP national president JP Nadda, Defence Minister Rajnath Singh, UP CM Yogi Adityanath and CMs & Deputy CMs of NDA-ruled states, Union Ministers,… pic.twitter.com/NB5DyrX8ao
— ANI (@ANI) December 5, 2024
हेही वाचा :