Home » Blog » सत्तेच्या दहशतीशिवायचा भाजप कसा असेल?

सत्तेच्या दहशतीशिवायचा भाजप कसा असेल?

२०१९ मध्ये संख्याबळ घटले तरी पहिला क्रमांक टिकवला. हा पहिला क्रमांक २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला टिकवता येईल का, हा आजच्या घडीचा खरा प्रश्न आहे.

by प्रतिनिधी
0 comments

महाराष्ट्रात सुरुवातीची चाळीस वर्षे जनसंघाची म्हणजेच भारतीय जनता पक्षाची डाळ शिजली नाही. परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही. लढण्यासाठी उमेदवार आणि डिपॉझिट भरण्याची सोय होईल तिथे निवडणूक लढवण्याचे धोरण अवलंबून शक्य तेवढा पक्षाचा विस्तार केला. प्रारंभीच्या काळात हेटाळणी आणि कुचेष्टा सहन केली तरी हिंमत सोडली नाही. आणीबाणीनंतर जनता पक्षात सामील होऊन काँग्रेसला सत्तेतून हद्दपार केले. महाराष्ट्रात १९७८ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी लोकशाही दलाच्या (पुलोद) सरकारमध्ये सहभागी होऊन आपली ओळख आणि विस्तारही वाढवण्याचा प्रयत्न केला. नव्वदच्या दशकात शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय हा भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीतील टर्निंग पॉईंट ठरला आणि शेठजी-भटजींच्या या पक्षाने शिवसेनेच्या मदतीने महाराष्ट्रात हातपाय पसरले. इतके पसरले, की या ऑक्टोपसने शिवसेनेच्याच गळ्याला मिठी मारून बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. शिवाय शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचीही दोन शकले करून आपल्या विरोधातील शक्तींना कमकुवत केले.

ओबीसी हाच भाजपचा जनाधार
प्रमोद महाजन-गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणाबाबत अनेकांचे अनेक मतभेद असू शकतील. परंतु महाराष्ट्रात भाजपला जनाधार मिळवून देण्यामध्ये या दोघांचा मोठा वाटा आहे किंबहुना, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वामुळे भाजपला कर्तृत्ववान बहुजन चेहरा मिळाला. मराठ्यांसह ओबीसी समाजघटकांतील विविध नेत्यांना सोबत घेऊन त्यांना विश्वास देण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांनी केले. प्रमोद महाजन यांची ताकद मागे उभी असताना महाराष्ट्र भाजपमध्ये मुंडे यांचे एकमुखी नेतृत्व होते. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व भाजपमध्ये पुढे आले. त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले. नितीन गडकरी यांच्या पक्षाध्यक्षपदावर गंडांतर आणले गेले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अमित शाह यांच्याकडे भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर वाजपेयी-अडवानी यांच्या काळातील भाजपच्या खाणाखुणा पुसून मोदी-शाह यांचा ठसा असलेला नवा भाजप उभा राहू लागला. बारा महिने चोवीस तास निवडणुकीच्या मोडमध्ये असलेला हा पक्ष होता. पक्षविस्तारासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असलेला हा पक्ष होता.  महाराष्ट्रातील ओबीसींच्या राजकारणाला प्राधान्य देताना भाजपने प्रामुख्याने माळी, धनगर आणि वंजारी या तीन जातींवर लक्ष केंद्रित केले. माळी समाजाचे प्रा. ना. स. फरांदे, धनगर समाजाचे अण्णा डांगे आणि वंजारी समाजाचे गोपीनाथ मुंडे या तीन नेत्यांचे चेहरे पुढे आणले. भाजपचा हा ‘माधव’ फॉर्म्युला महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलणारा ठरला. मंडल आयोगाच्या शिफारशीने हळूहळू जागृत झालेल्या ओबीसी समाजामध्ये सत्तेची आस जागविण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला. आजही ते धोरण कायम आहे आणि बदलत्या सामाजिक वातावरणात ओबीसी समाजघटक हाच भाजपचा खरा जनाधार आहे.

विनोद तावडे राष्ट्रीय पातळीवर सक्रीय
गोपीनाथ मुंडे यांच्यापाठोपाठ एकनाथ खडसे यांचे नेतृत्व महाराष्ट्र भाजपमध्ये प्रभावी होते. त्यांच्यासह सुधीर मुनगुंटीवार, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पंकजा मुंडे, आशिष शेलार अशी नंतरच्या पिढीतील नेतृत्वाची फळी उभी राहू लागली. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर एकनाथ खडसे यांना बाजूला ठेवून केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सूत्रे दिली. त्यावेळी मुनगुंटीवार, तावडे, पंकजा मुंडे यांनाही मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली होती. परंतु फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत त्यांचे पंख छाटले. त्यामुळे महाराष्ट्र भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस हे भाजपचे एकमुखी नेतृत्व बनले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेले चंद्रकांतदादा पाटील यांचे नेतृत्व याच काळात राज्याच्या पातळीवर पुढे आले. एकनाथ खडसे बाजूला गेल्यानंतर त्यांची जागा चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतली. अनेक खात्यांच्या कारभाराबरोबरच प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी सांभाळले. सक्रीय राजकारणाचा पूर्वानुभव नसतानाही अचानक आलेल्या अनेक जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. त्याचवेळी सरकारचे संकटमोचक म्हणूनही ते भूमिका निभावू लागले. याच काळात आशिष शेलार यांचे नेतृत्व मुंबईतून पुढे आले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपने शिवसेनेला घाम फोडला. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतरचे समग्र भान असलेले सुसंस्कृत बहुजन नेतृत्व म्हणून अल्पावधीत आशिष शेलार यांनी ओळख निर्माण केली. गुजराती मारवाडी आणि उत्तरेतील भैय्यांचा पक्ष अशी ओळख असलेल्या मुंबई भाजपचा मराठी चेहरा टिकवण्याचे काम शेलार यांनी केले. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांना पक्षाने उमेदवारीही नाकारण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला. भाजपमधील मराठा चेहरा म्हणून तावडे यांची ओळख होती, त्यांची जागा आशिष शेलार यांनी घेतली. दरम्यान, पक्षाने विनोद तावडे यांच्याकडे राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देऊन त्यांनाही राष्ट्रीय नेत्यांच्या पंगतीत मानाचे स्थान दिले आहे.

स्वबळावर सत्ता कशी मिळेल?
भारतीय जनता पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष फोडले. महाराष्ट्रातील आपले विरोधक खिळखिळे केले. त्याआधी २०१९च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवेळी आणि त्याच्याही आधी काँग्रेसमधील अनेक नेत्यांना भाजपमध्ये घेतले. भाजपला स्वबळावर सत्ता मिळवायची असेल तर बाहेरचे ताकदवान नेते घेतल्याशिवाय शक्य नाही, हे भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला माहीत आहे. त्यामुळे जनाधार असलेला नेता भ्रष्ट किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असला तरी त्याला सन्मानाने वाजतगाजत भाजपमध्ये घेतले गेले. तुरुंगापेक्षा सत्ता बरी म्हणून नेते भाजपमध्ये जाऊ लागले. विचारधारेचा विचार कुणाच्या मनात येत असेल तर तोही, ‘जगलो तर विचारधारा’ असे म्हणून भाजपचा रस्ता धरतो. राज्यातल्या सत्तेचे लाभ आणि केंद्रातल्या सत्तेची दहशत अशा दोहोंमुळे अनेकांनी भाजपचा रस्ता धरला. या सगळ्यातून एक प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे पुढे जेव्हा कधी भाजपची केंद्रातील सत्ता जाईल, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करण्याची शक्ती भाजपकडे उरणार नाही, त्यावेळी काँग्रेस किंवा अन्य पक्षांतून भाजपमध्ये गेलेली ही मंडळी काय करतील? दुसरा विषय आहे तो भाजपच्या नेत्यांचा. ज्यावेळी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करण्याची क्षमता राहणार नाही आणि राज्यातील सत्तेची सूत्रेही हाती राहणार नाहीत, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व किती प्रभावी राहील? कोणत्याही सत्तेच्या पाठबळाशिवायचे त्यांचे नेतृत्व तेवढेच प्रभावी राहील का किंवा भाजपमधील मंडळींना मान्य होईल का? भारतीय जनता पक्षाने निःसंशय महाराष्ट्रामध्ये आपला पाया विस्तारला आणि बळकट केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. परंतु सत्तेशिवायचा, सत्तेच्या दहशतीशिवायचा भारतीय जनता पक्ष कसा असेल, या प्रश्नाचे उत्तर काळच देईल.

विजय चोरमारे

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00