कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ या द्विखंडात्मक ग्रंथाचे प्रकाशन खासदार सुप्रिया सुळे यांच्याहस्ते होणार आहे. शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्ट आणि महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे. (Maharani Tarabai)
त्यातून ८०० पानी संशोधनपर ग्रंथ साकारला आहे. शुक्रवारी, २४ जानेवारी रोजी न्यू पॅलेसच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे. गेल्या दीडशे वर्षांत महाराणी ताराराणी यांच्यावर दोन ते तीन संशोधनात्मक चरित्रे प्रकाशित झाली आहे. तथापि ताराराणी यांच्यावर सलग आठ ते दहा वर्षे संशोधन करुन लिहिलेला हा पहिला ग्रंथ आहे, असा दावाही डॉ. पवार यांनी केला. (Maharani Tarabai)
डॉ. पवार यांनी पत्रकार परिषदेत ग्रंथ प्रकाशन समारंभाची माहिती दिली. यावेळी शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्टचे अध्यक्ष खासदार शाहू छत्रपती, माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, डॉ. मंजुषा पवार उपस्थित होत्या.
डॉ. पवार यांनी ग्रंथाविषयी माहिती दिली. मुघलांशी संघर्ष करुन त्यांचा पाडाव करणारी मोघलमर्दिनी म्हणजे महाराणी ताराराणी. १९६५ पासून महाराणी ताराराणी यांच्यावर संशोधनात्मक ग्रंथ लिहिण्याचा विचार सुरू होता, पण गेल्या सात ते आठ वर्षात एक मिशन म्हणून ताराराणी यांच्यावर अनेक कागदपत्रांचा अभ्यास करुन ग्रंथ लिहिला. तो द्विखंडात्मक आहे. पहिल्या खंडात ताराराणीच्या जन्मापासून १७०७ पर्यंत औरंगजेबाचा बिमोड करण्यापर्यंतचा इतिहास आहे. दुसऱ्या खंडात १७०७ पासून १७६१ पर्यंतचा इतिहास आहे. (Maharani Tarabai)
मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेब बादशहा १६८१ मध्ये दक्षिणेत उतरला. त्यानंतर तब्बल २६ वर्षे मराठ्यांचे राज्य जिंकण्यासाठी त्याने जंगजंग पछाडले. पण शेवटी अपयशी ठरुन महाराष्ट्रातच त्याला दफनभूमीचा शोध घ्यावा लागला. मुघलांच्या बलाढ्य शक्तीसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे संरक्षण करण्याचे कार्य छत्रपती संभाजीराजे, छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराराणी यांनी केले. महाराणी ताराराणींना १७०० मध्ये ऐन तारुण्यात वैधव्य प्राप्त झाले. अशा परिस्थितीतही सलग सात वर्षे औरंगजेबाशी लढून त्यांनी त्याला हतबल करुन पराभूत केले. ताराबाईंच्या लष्करी नेतृत्वाचा व राज्यकारभार कौशल्याचा गौरव मोगलांच्या खाफीखान इतिहासकारांनी केला आहे. खाफीखानने म्हटले आहे की, ‘मराठ्यांच्या या राणीने लष्कराच्या नेतृत्वाचे व मोहिमांच्या संयोजनाचे गुण प्रकट केले. ही राणी बुद्धिमान तर आहेच पण शहाणीही आहे!’ (Maharani Tarabai)
जगाच्या इतिहासात मराठ्यांचे हे स्वातंत्र्ययुद्ध सर्वांत प्रदीर्घ काळ चालणारे ठरले आहे. या युद्धाच्या शेवटच्या पर्वाचे नेतृत्व महाराराणी ताराबाईंनी केले. त्यांच्याच कारकीर्दीत मराठ्यांच्या फौजा नर्मदा पार करुन माळव्यात शिरल्या. पुलकेशीच्या काळापासून म्हणजे सातशे वर्षांत दक्षिणेतील फौजानी नर्मदा पार केली नव्हती. मराठ्यांच्या फौजा केवळ माळव्यातच नव्हे तर गुजरात, तेलंगण, कर्नाटक अशा विस्तीर्ण प्रदेशात धुमाकूळ घालू लागल्या. मराठा साम्राजाची पायाभरणी ताराबाईंनी अशी केली. या पराक्रमी राणीचे चरित्र आतापर्यंत उपेक्षित राहिले होते. डॉ. पवार यांच्या चरित्रग्रंथाने इतिहासाचा प्रकाशझोत ताराराणींच्या कामगिरीवर पडत आहे. (Maharani Tarabai)
प्रकाशन समारंभाला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, जयंत आसगांवकर, डॉ. विनय कोरे, राजेंद्र पाटील यड्रावकर, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, डॉ. राहुल आवाडे, अशोकराव माने उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा :
बेळगावात महात्मा गांधींचा २५ फुटी पुतळा