प्रयागराज : प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याची सांगता बुधवारी झाली. महाशिवरात्रीदिवशी होणाऱ्या या शेवटच्या स्नानाची पर्वणी साधण्यासाठी रात्रीपासूनच भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. बुधवारच्या या स्नानाने गेले ४५ दिवस सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याची सांगता झाली. जगभरातील माध्यमांनी या धार्मिक आणि सांस्कृतिक मेळ्याची नोंद घेतली.(mahakumbh conclude)
बुध्वारी पहाटेपासूनच स्नानासाठी भाविकांचे लोंढेच्या लोंढे त्रिवेणी संगमाच्या दिशेने येत होते. रस्ते ओसंडून वाहत होते. सरकारी आकडेवारीनुसार, बुधवारी पहाटे २ वाजेपर्यंत ११.६६ लाखांहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले. पुढील दोन तासांत ही संख्या २५.६४ लाख आणि सकाळी ६ वाजेपर्यंत ४१.११ लाखांवर पोहोचली. सकाळी १० वाजेपर्यंत ८१.०९ लाख लोकांनी गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांचा संगम असलेल्या संगम येथे ‘स्नान’ पर्वणी साधली. (mahakumbh conclude)
महाकुंभ, १२ वर्षातून एकदा होणारा एक मोठा धार्मिक मेळावा. १३ जानेवारी (पौष पौर्णिमा) रोजी हा मेळा सुरू झाला. नागा साधू आणि तीन अमृत स्नानांच्या भव्य मिरवणुका पार पडल्या. अधिकृत आकडेवारीनुसार, प्रयागराजमधील यंदाच्या महाकुंभला आतापर्यंत ६५ कोटींहून अधिक भाविकांनी भेट दिली आहे.
४५ दिवसांच्या या महामेळाव्याला आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांकडून व्यापक कव्हरेज मिळाले आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलने, महाकुंभमेळ्यात अमेरिकेच्या संपूर्ण लोकसंख्येपेक्षा जास्त भाविकांनी या मेळ्यात भाग घेतला, असे म्हटले आहे. एका अंदाजानुसार सहा आठवड्यांच्या कालावधीत अर्धा अब्ज भाविकांनी येथे हजेरी लावली. (mahakumbh conclude)
त्याचप्रमाणे द हफिंग्टन पोस्टने महाकुंभमेळ्याचे वर्णन जगातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र म्हणून केले आहे. यात या उत्सवाशी संबंधित धार्मिक विधी आणि श्रद्धा यांचे तपशीलवार वर्णन केले आहे.
या महाकुंभमेळ्यादरम्यान काही दुर्घटनाही घडल्या. २९ जानेवारीला महाकुंभमेळ्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ३० लोक ठार आणि ९० जण जखमी झाले होते. तर फेब्रुवारीच्या सुरुवातीला, नवी दिल्लीतील रेल्वे स्थानकावर प्रयागराजला जाणाऱ्या गाड्या पकडण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत आणखी १८ जणांचा मृत्यू झाला.
परंतु या दोन्ही शोकांतिकानंतरही लाखो भाविकांचा ओघ प्रयागराजच्या दिशेने कायम राहिला. बुधवारी उत्सवाची सांगता झाल्यानंतर या परिसरातील साफसफाईचे मोठे आव्हान असणार आहे.
हेही वाचा :
जिल्हा परिषदेला ५७ कोटींचा चुना लावण्याचा प्रयत्न