कोल्हापूर : प्रतिनिधी : करवीरनिवासिनी अंबाबाईची शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी महाकाली रुपात पूजा बांधण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान तिरुपती बालाजी मंदिराकडून देवीला मानाचा शालू कोल्हापूरात आला आहे. बालाजी मंदिर ट्रस्टच्या ट्रस्टींनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपुर्त केला. (Mahakali)
देवीची आज महाकाली रुपात अलंकार पूजा बांधण्यात आली आहे. देवीने उग्र रुप धारण केली असून तिचे केस सोडलेले आहेत. गळात तिने मुंडमाला धारण केली आहे. देवी चतुर्भज असून खालच्या डाव्या हातात नरमुंड आहे. खालील हात अभयमुद्रादर्शक आहे. वरील डाव्या हातात खडग धरले असून उजवा हात आशीर्वाद देणार आहे. (Mahakali)
सृष्टिचा लय करणे हे महालकालीचे कार्य असून, सृष्टीच्या आरंभी हीच सर्वत्र व्याप्त होती. ब्रम्हदेवांनी मधु-कैटभांच्या वधासाठी श्री विष्णूंना जागृत करणेसाठी, योगनिद्रा महाकालीचीच प्रार्थना केली. तेव्हा विष्णूंच्या चेहरा, बाहू व ह्रदयातून हिचे तेज व स्वरूप प्रगटले. हीच महाकाली होय. अश्विन शुद्ध अष्टमीस हिची उत्पती मानली जाते. ही पहिली महाविद्या असून, हिचा महाकाल भैरव आहे, अश्विन कृष्ण अष्टमीला हिची उत्पती झाली. ही कालीकुलातील देवता उत्तराम्नायपीठस्था आहे. देवीच्या उपासनेने बाधा निवारण, सुख सौभाग्य व ब्रम्हज्ञान प्राप्ती, पराक्रमप्राप्ती सर्वत्र विजयप्राप्ती, सकल वैभवप्राप्ती होते. दक्षिणकाली, स्मशानकाली, संततिप्रदाकाली, स्पर्शमणिकाली, चिंतामणिकाली, भद्रकाली, कामकलाकाली, हंसकाली असे उपसनाभेद आहेत. आजची पूजा श्रीपूजक अविनाश मुनीश्वर, विनय चौधरी, उमेश सांगावकर, यांनी बांधली. त्यांना नारायण माजगांवकर, विजय माजगांवकर यांनी मदत केली. (Mahakali)