मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या महापुरूषांच्या स्मारकांचे काम गतीने पूर्ण करण्याबरोबरच संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज आणि आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (१० मार्च) केली. तसेच हरियाणातील पानिपत येथे मराठ्यांच्या युद्धाचे स्मारक बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. (Maha Budget)
राज्याचे सन २०२५-२६चे अंदाजपत्रक पवार यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केले. त्यावेळी पवार यांनी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचा निर्वाळा देत या योजनेसाठी चालू आर्थिक वर्षांत ३६ हजार कोटी प्रस्तावित केल्याचे श्री.पवार यांनी सांगितले. तथापि हा सन्माननिधी दरमहा २१०० रूपये करण्याबाबत कसलेही सूतोवाच त्यांनी केले नाही.(Maha Budget)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार सोमवारी (१० मार्च) राज्याचे बजेट सादर केले. नवे सरकार आल्यानंतर सादर होणारा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांसाठी काय असेल, याची उत्सुकता सर्व क्षेत्रांत लागून राहिली होती.
विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून दरमहा २१०० देण्याचे आश्वासन देणाऱ्या महायुती सरकारने २०२५-२६ हा आर्थिक वर्षांमध्ये मात्र त्याची अंमलबजावणी केलेली नाही. सोमवारी (१० मार्च ) सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये देण्याचे सरकारने आश्वासित केले असून त्यासाठी ३६ हजार कोटीची तरतूद केली आहे.
कोणतीही नवीन योजना लागू न करता पायाभूत सुविधा आणि दळणवळण सुविधा अधिक रक्कम करण्यावर भर देताना ४५ हजार ८९१ कोटी तुटीचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला.
अन्य राज्यांच्या तुलनेत वीजदर कमी होणार
पवार यांनी येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात वीजेचे दर कमी होतील अशी घोषणा केली. ते म्हणाले, ‘महावितरण कंपनीने पुढील पाच वर्षांसाठी वीजेचे दर निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे. ऊर्जा क्षेत्रातील नियोजन आणि कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या पाच वर्षांत राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होतील.’(Maha Budget)
मोटारवाहन करात वाढ; वाहने महागणार
मोटारवाहन कराची कमाल मर्यादा ही २० लाख रूपयांवरून ३० लाख रूपये करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या कमाल मर्यादेत प्रस्तावित वाढीमुळे सन २०२५-२६ मध्ये राज्याला सुमारे १७० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे. सध्या व्यक्तिगत मालकीच्या परिवहनेतर चारचाकी सीएनजी आणि एलपीजी वाहनांवर वाहन प्रकार आणि किमतीनुसार ७ ते ९ टक्के दराने मोटारवाहन कराची आकारणी केली जाते. या कराच्या दरांमध्ये १ टक्क्याने वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. राज्यात रूपये ३० लाखापेक्षा अधिक किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर ६ टक्के दराने मोटारवाहन कराची आकारणी करण्याचे प्रस्तावित आहे. या दरवाढीमुळे राज्या सन २०२५-२६ मध्ये सुमारे १५० कोटींचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे, असे अजित पवार म्हणाले.
ते म्हणाले, बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेन्स, कॉम्प्रेसर, प्रोजेक्टर्स आणि एस्कॅव्हेटर्स या प्रकारातील वाहनांना अनिवार्यपणे एकरकमी वाहनाच्या किमतीच्या ७ टक्के दराने मोटार वाहन कर आकारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. प्रस्तावित मोटार वाहन कर सुधारणेमुळे सन २०२५-२६ मध्ये राज्याला सुमारे १८० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे.
मुद्रांक शुल्क १०० ऐवजी ५००!
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम ४ नुसार एकाच व्यवहाराच्या पूर्ततेसाठी एकापेक्षा जास्त दस्तऐवजांचा वापर केल्यास, पूरक दस्तऐवजांना रुपये १०० ऐवजी रुपये ५०० इतके मुद्रांक शुल्क आकारण्याचे प्रस्तावित केल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
स्मारकांचे काम गतीने पूर्ण करणार

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील राष्ट्रीय स्मारकाचे काम प्रगतिपथावर आहे. ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. शिवाय नायगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची स्मारके उभारण्यात येतील. तुळापूर येथे सुरू असलेले छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करण्याबरोबरच संगमेश्वर येथे त्यांचे भव्य स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आग्रा येथे तर पानिपत येथे लढवय्या मराठा सैनिकांच्या बलिदानाप्रित्यर्थ स्मारक उभारण्याची घोषणाही पवार यांनी केली. पुणे शहरातील आंबेगांवात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यातील दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम गतीने होण्यासाठी राज्य शासनाकडून आणखी ५० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू या १४ किमी लांबीच्या सेतूचे कामही करण्यात येणार असल्याचे पवार म्हणाले. (Maha Budget)
अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करणार
मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानून अर्थमंत्री अजित पवार यांनी अभिजात मराठी भाषा सप्ताह दरवर्षी साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा केली. दरवर्षी ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान हा सप्ताह साजरा करण्यात येईल. मराठी भाषा आणि साहित्याविषयी काम करणाऱ्या संस्थांना यामध्ये सामावून घेण्यात येईल. तसेच अनुवाद अकादमीही स्थापण करण्यात येणार असून विविध पुरस्कारही देण्यात येतील, असे पवार यांनी सांगितले.
अर्थसंकल्पातील ठळक बाबी
- राज्याला जागतिक वस्त्रोद्योग केंद्र म्हणून विकसीत करणार(Maha Budget)
- मायक्राेसॉफ्ट कंपनीमार्फत १० हजार महिलांना प्रशिक्षण देणार
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याेजनेसाठी २०२५ साठी ३६ हजार कोटींचा निधी प्रस्तावित
- २४ लाख महिलांना लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट्य
- पर्यटनक्षेत्रांत एक लाख कोटीची गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट्य
- आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारणार
- संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारणार
- २०२५ चे औद्योगिक धोरण लवकरच जाहीर करणार, त्यातून ५० लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट
- इतर राज्यांच्या तुलनेत वीजदर कमी होणार, त्यामुळे राज्य प्रगतीच्या शिखरावर जाईल(Maha Budget)
- मुंबई परिसरातील ७ ठिकाणी व्यापारी केंद्रे उभारणार
- परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून १६ लाखांवर रोजगार निर्मिती
- समृद्धी, शक्तीपीठ महामार्गासह राज्यातील रस्त्यांचे जाळे मजबूत करणार
- समृद्धी महामार्गावर शेतमालासाठी सुविधा उभारणार
- दिघी, वेंगुर्ला, डोंबिवली, मीरा भाईंदर, ठाणे येथील जेट्टीची कामं प्रगतीपथावर. हवामान बदल व इतर नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करण्यासाठी किनारी जिल्ह्यांत ८ हजार ४०० कोटींचा बाह्य सहाय्य प्रकल्प राबवणार(Maha Budget)
- वाढवण बंदरामुळे ३०० दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक माल हाताळणीची क्षमता निर्माण होईल. जेएनपीटी बंदराच्या क्षमतेपेक्षा ती तीन पट आहे. या बंदराचा समावेश जगातील कंटेनर हाताळणी करणाऱ्या पहिल्या दहा बंदरांत होणार
- विमान चालन, रेल्वे, मेट्रो, महामार्ग, जलवाहतूक, बंदर विकास, सिंचन, उर्जा या क्षेत्रांत येत्या ५ वर्षांत विक्रमी गुंतवणूक
- मुंबई, नागपूर, पुणे महानगरातील नागरिकांना पर्यावरणपूरक वाहतूक उपलब्ध करून देण्यासाठी १४३.५७ किमी लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित. याचा फायदा रोज १० लाख प्रवासी घेत आहेत.येत्या वर्षात मुंबईत ४१.२ किमी, पुण्यात २३.२ किमी असे ६४.४ किमीचे मेट्रो मार्ग सुरू होणार
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या ६ हजार डिझेल बसेसचे रुपांतर सीएनजी व एलएनजीमध्ये करण्याची प्रक्रिया सुरू
- कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, अत्याधुनिक तंत्रज्ञान धोरण राबवणार आहे. शेतकऱ्यांची उत्पादकता वाढावी, मालाला हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी उपयुक्त प्रणाली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार
- शिवडी ते वरळी या १०५१ कोटी किमतीच्या उन्नत जोडरस्त्याचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करणार. स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे ते वर्सोवा यादरम्यानचे १४ किमी लांबीचे १८ हजार १२० कोटी खर्चाचे काम मे २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन
- अमृतकाल राज्य रस्ते विकास प्रकल्प प्रस्तावित. या आराखड्यात पर्यटन केंद्र, तीर्थक्षेत्र, धार्मिक स्थळ, गडकिल्ले, ५ हजारांहून जास्त लोकसंख्येच्या वसाहती, सर्व जिल्हा व तालुका मुख्यालये जोडण्यासाठी रस्त्यांचा समावेश करण्यात येणार
- काेयनानगर येथे स्कायवॉ निर्मिती करणार, जलपर्यटनाला चालणार देणार
- माळशेज घाटात काचेचा स्कायवॉक उभारणार
हेही वाचा :
शक्तीपीठ महामार्ग समर्थक आमदारांची नावे जाहीर करा
मुंबई पालिकेच्या ९० हजार कोटींच्या ठेवीवर मोदींचा डोळा