मेलबर्न : अमेरिकेच्या मॅडिसन कीज् हिने शनिवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत मॅडिसनने सलग तिसऱ्या जेतेपदाच्या प्रयत्नात असणाऱ्या बेलारुसच्या अग्रमानांकित आर्यना सबालेंकाचा ६-३, २-६, ७-५ असा पराभव केला.(Madison Keys)
जागतिक क्रमवारीत सबालेंका अग्रस्थानी असून मॅडिसन चौदाव्या स्थानी आहे. सबालेंकाने मागील सलग दोन वर्षे ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्याचप्रमाणे, मागील वर्षी अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेतही ती विजेती ठरली होती. दुसरीकडे, मॅडिसनने कारकिर्दीत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे, सहाजिकच अंतिम फेरीत सबालेंकाचे पारडे जड मानले जात होते. तथापि, मॅडिसनने सामन्यापूर्वीचे सर्व अंदाज फोल ठरवले. (Madison Keys)
अंतिम सामना २ तास २ मिनिटे रंगला. अंतिम सामन्यातील पहिलाच सेट ६-३ असा जिंकून मॅडिसनने दमदार सुरुवात केली. त्यानंतर लागलीच सबालेंकाने दुसरा सेट ६-२ असा जिंकून सामन्यात बरोबरी साधली. तिसरा सेट अतिशय चुरशीचा झाला. तब्बल ४२ मिनिटांमध्ये रंगलेल्या या सेटमध्ये दहाव्या गेमपर्यंत दोन्ही खेळाडूंत ५-५ अशी बरोबरी होती. त्यानंतर मॅडिसनने ११वा गेम जिंकून ६-५ अशी आघाडी घेतली. लागोपाठ बाराव्या गेममध्ये सबालेंकाची सर्व्हिस ब्रेक करून हा सेट ७-५ असा जिंकत मॅडिसनने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.(Madison Keys)
२९ वर्षीय मॅडिसन ही कारकिर्दीतील पहिलेच ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या सर्वाधिक वयाच्या महिला खेळाडूंत चौथ्या स्थानी आहे. सबालेंकाआधी मॅडिसनने उपांत्य फेरीमध्ये द्वितीय मानांकित पोलंडच्या इगा स्वियातेकवरही मात केली होती. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पहिल्या व दुसऱ्या मानांकित खेळाडूंना पराभूत करणारी मॅडिसन ही मागील वीस वर्षांमधील पहिलीच खेळाडू आहे. यापूर्वी, २००५ मध्ये अमेरिकेच्याच सेरेना विल्याम्सने अशी कामगिरी केली होती. या विजेतेपदामुळे आगामी महिला एकेरी क्रमवारीत ती पहिल्या दहा खेळाडूंमध्ये झेप घेईल. (Madison Keys)
बऱ्याच वर्षांपासून ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकण्याचे माझे स्वप्न होते. यापूर्वी मी एकदा ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचले होते. मी पुन्हा तशी कामगिरी करू शकेन का, आणि हा चषक उंचावू शकेन का, हे मला माहीत नव्हते. परंतु, माझ्या टीमने माझ्यावर विश्वास ठेवला आणि या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर मला मदत केली. त्यांनी आणि तुम्ही (प्रेक्षकांनी) दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी ऋणी आहे.
– मॅडिसन कीज्, ऑस्ट्रेलियन ओपन विजेती
Madi meets Daphne!
A lifetime of ups, downs, practice sessions, hardships, triumphs, near misses and close calls culminated in this moment for @Madison_Keys
Finally a Grand Slam champion!#AO2025 pic.twitter.com/AXJ3ErxyQ2
— #AusOpen (@AustralianOpen) January 25, 2025
हेही वाचा :
सात्विक-चिराग जोडीचे आव्हान संपुष्टात