महू/इंदूर : भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर चाहत्यांकडून ठिकठिकाणी करण्यात येणाऱ्या जल्लोषाला मध्य प्रदेशातील महूमध्ये हिंसेचे गालबोट लागले. यावेळी रॅली काढून दगडफेक केल्याप्रकरणी व वाहने जाळल्याप्रकरणी पोलिसांनी तेराजणांना ताब्यात घेतले आहे. (Madhya Pradesh)
इंदूर जिल्ह्यातील पाच ठिकाणी रविवारी (९ मार्च)रात्री झालेल्या हिंसाचारामध्ये चार जण जखमी झाल्याची माहिती इंदूरचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी दिली. यावेळी तीन कार आणि काही दुचाकींचे नुकसान झाले व त्या जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या घटनांनंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत १३ जणांना ताब्यात घेतले आणि बंदोबस्तामध्ये वाढ केली. सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी संशयितांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी नमूद केले. (Madhya Pradesh)
या हिंसाचाराचे व्हिडिओ पुरावे अद्याप उपलब्ध झाले नसले, तरी प्रत्यक्ष साक्षीदारांच्या जबाबानंतर आणखी एफआयआर नोंदवण्यात येतील, असेही जिल्ह्याधिकाऱ्यांनी सांगितले आहे. नागरिकांनी समाजमाध्यमांवरून अफवा पसरवू नयेत, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. एका मशिदीजवळून विजयी जल्लोषाची रॅली जात असताना दोन गटांमध्ये वाद होऊन त्याची परिणती हिंसाचारामध्ये झाल्याचे ते म्हणाले. महू शहरातील ताल मोहल्ला, सेवा मार्ग, पट्टी बाजार, माणेक चौक आणि जामा मशीद या ठिकाणी हिंसाचाराच्या घटना नोंदवण्यात आल्या. या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल व्हिडिओ मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या हिंसाचारानंतर इंदूर पोलिस मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
हेही वाचा :
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ५७ कोटींवर डल्ला मारण्याचा प्रयत्न
हॅरी ब्रुकची दुसऱ्यांदा ‘आयपीएल’मधून माघार