लाहोर : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा अवघ्या एका दिवसावर आलेली असताना न्यूझीलंड संघाला आणखी एक धक्का बसला आहे. न्यूझीलंड संघातील सर्वांत अनुभवी वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे या स्पर्धेत खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्याजागी काइल जेमिसनची संघात निवड करण्यात आली आहे. (Lockie Ferguson)
चॅम्पियन्स ट्रॉफीचा सलामीचा सामना न्यूझीलंड आणि यजमान पाकिस्तान यांच्यामध्ये १९ फेब्रुवारीला रंगणार आहे. फर्ग्युसनला फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस इंटरनॅशनल लीग टी-२० स्पर्धेमध्ये डेझर्ट वायपर्स संघाकडून खेळताना दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो पाकिस्तान-न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिरंगी मालिकेतही खेळू शकला नव्हता. त्यानंतर, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच्या सराव सामन्यात त्याने अफगाणिस्तानविरुद्ध तीन षटके गोलंदाजी करून फिटनेसचा अंदाज घेतला. तथापि, तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात समाविष्ट न करण्याचा निर्णय घेण्यात आला. फर्ग्युसन हा दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणारा न्यूझीलंडचा दुसरा वेगवान गोलंदाज आहे. मागच्या आठवड्यात न्यूझीलंडच्या बेन सिअर्सलाही मांडीचे स्नायू दुखावल्याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. (Lockie Ferguson)
फर्ग्युसनच्या अनुपस्थितीत मॅट हेन्री हा एकमेव अनुभवी वेगवान गोलंदाज न्यूझीलंड संघामध्ये उरला आहे. काइल जेमिसन, विल्यम ऑरुर्के, जेकब डफी आणि नॅथम स्मिथ हे अन्य वेगवान गोलंदाज प्रत्येकी १५पेक्षा कमी आंतरराष्ट्रीय वन-डे खेळले आहेत. फर्ग्युसनच्या जागी संघात आलेला ३० वर्षीय जेमिसन हा अलीकडेच पाठीच्या दुखापतीतून सावरला आहे. या दुखापतीमुळे त्याला सुमारे दहा महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने सुपर स्मॅश टी-२० स्पर्धेद्वारे पुनरागमन केले होते. त्याने आंतरराष्ट्रीय वन-डे कारकिर्दीत १३ सामन्यांत १४ विकेट घेतल्या. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलामीच्या सामन्यानंतर न्यूझीलंड २४ फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध, तर २ मार्च रोजी भारताविरुद्ध खेळणार आहे.