लंडन : भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये मंगळवारी विजयी सलामी दिली. लक्ष्यने पहिल्या फेरीत तैपेईच्या सू ली यँगविरुद्ध १ तास १५ मिनिटे रंगलेल्या लढतीमध्ये १३-२१, २१-१७, २१-१५ असा विजय मिळवला. भारताच्या एच. एस. प्रणॉयला मात्र पहिल्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. (Lakshya Sen)
जागतिक क्रमवारीत सू ली यँग ३७ व्या, तर लक्ष्य १५ व्या स्थानावर आहे. यँगने पहिला गेम २१-१३ असा जिंकून सामन्यात आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये मात्र लक्ष्यने खेळ उंचावला. या गेममध्ये दोन्ही खेळाडूंत प्रत्येक गुणासाठी चुरस होती. हा गेम २१-१७ असा जिंकून लक्ष्यने सामन्यात बरोबरी साधली. तिसऱ्या गेममध्येही सामन्याचे पारडे आलटून-पालटून दोन्ही खेळाडूंच्या बाजूने झुकत होते. या गेममध्ये एकावेळी लक्ष्य १४-१० असा आघाडीवर असताना यँगने सलग चार गुण जिंकत १४-१४ अशी बरोबरी केली. दोघांमध्ये १५-१५ अशी बरोबरी असताना पुन्हा लक्ष्यने जोरदार मुसंडी मारली आणि सलग सहा गुण मिळवले. हा गेम २१-१५ असा जिंकून लक्ष्यने विजयावर शिक्कामोर्तब केले. पुढील फेरीत लक्ष्यसमोर इंडोनेशियाच्या तृतीय मानांकित जोनातन ख्रिस्टी याचे खडतर आव्हान आहे. (Lakshya Sen)
पुरुष एकेरीत भारताच्या एच. एस. प्रणॉयला मात्र सलामीलाच पराभूत व्हावे लागले. फ्रान्सच्या टोमा पोपोव्हने ५३ मिनिटे रंगलेल्या लढतीत प्रणॉयवर २१-१९, २१-१६ अशी सरळ गेममध्ये मात केली. प्रणॉयने पहिल्या गेममध्ये कडवी लढत दिली. मात्र, हा गेम गमावल्यानंतर प्रणॉयला दुसऱ्या गेममध्ये पुनरागमन करता आले नाही. मिश्र दुहेरीतही भारताची सुरुवात निराशाजनक झाली. सतीशकुमार करुणाकरन-आद्या वरियाथ ही भारताची जोडी चीनच्या सातव्या मानांकित जोडीविरुद्ध सलामीलाच गारद झाली. गुओ शिन वा-चेन फांग हुई या जोडीने सतीश-आद्या जोडीला अवघ्या २९ मिनिटांमध्ये २१-६, २१-१५ असे पराभूत केले.(Lakshya Sen)
हेही वाचा:
मयंक आयपीएलच्या पूर्वार्धास मुकणार
ब्रेसवेलकडे न्यूझीलंडचे नेतृत्व