Home » Blog » कोरियन गारुड

कोरियन गारुड

कोरियन गारुड

by प्रतिनिधी
0 comments
Korean Drama file photo

-अमोल उदगीरकर

दक्षिण कोरिया आणि भारतामध्ये  अनेक बाबतीत साम्य आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्णपणे बदलत चाललेल्या जागतिक संरचनेची ही दोन्ही राष्ट्रे अपत्य आहेत. कोरियन राष्ट्राची पण भारतासारखीच फाळणी झाली. भारत पाकिस्तानसारखंच कोरियन राष्ट्राच्या फाळणीतून निर्माण झालेले उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया हे दोन्ही देश एकमेकांवर बंदुकांच्या संगिनी रोखून उभे आहेत. फाळणीनंतर भारत हा सेक्युलर, सुधारक, देशातल्या सर्व समूहांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या मार्गावर गेला. याउलट धर्माधिष्ठित पाकिस्तानची वाटचाल धार्मिक कट्टरवादाकडे सुरु झाली. उत्तर कोरियाची वाटचाल पण अनिर्बंध हुकूमशाहीकडे आणि युद्धखोरीकडे चालू झाली. पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमाला आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमाला उत्तर कोरियाने बरीच मदत केली हा योगायोग नसावा.

गेल्या काही वर्षात कोरियन सिनेमाने जगभरातल्या प्रेक्षकांना गारुड घातलं आहे. ‘ट्रेन टू बुसान’, ‘आय सॉ द डेव्हील’, मेमरीज ऑफ मर्डर’ हे सिनेमे बघितले नाहीत असा चित्रपटप्रेमी सापडणार नाही. साय या गायकाच्या ‘ओपा गंगम स्टाईल’ गाण्याने जगभरात धुमाकूळ घालून लोकप्रियतेचे उच्चांक गाठले होते. दक्षिण कोरियाच्याच बीटीएस या बॉय बँडला कोरियाच्या बाहेर पण अभूतपूर्व प्रसिद्धी मिळत आहे. त्यातच बोन्ग जु हो या दिग्दर्शकाच्या ‘पॅरासाईट’ सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचं ऑस्कर मिळालं आणि कोरियन सिनेमाच्या दुदुंभी सर्वत्र वाजल्या. पॉप कल्चरमध्ये हा दक्षिण कोरियाई दिग्विजय सुरु झाला असतानाच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘स्क्विड गेम्स’ या शो ला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळायला लागला. क्वचितच प्रेक्षकांचे आकडे जाहीर करणाऱ्या नेटफ्लिक्सने घोषणा केली की, ‘स्क्विड गेम्स’ हा त्यांचा सगळ्यात जास्त बघितलेला गेलेला शो बनण्याच्या मार्गावर आहे. कोरियन कलाकृतींमध्ये स्थानिक सांस्कृतिक संदर्भ ठासून भरलेले असतात. विदेशी प्रेक्षकांनी आपला शो बघावा यासाठी ते याबाबतीत तडजोडी करत नाहीत. पण संदर्भ जरी स्थानिक असले तरी कोरियन कलाकृतींमध्ये एक ‘जागतिक अपील’ असतं जे जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसाला भावतं. ‘पॅरासाईट’चं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सिनेमाच्या कथानकात असणारी वैश्विकता. सिनेमाची कथा जरी कोरियात घडत असली तरी ती भारतातल्या कुठल्याही श्रमिक पुरवठा केंद्र असणाऱ्या झोपडपट्टीत घडू शकते, इतकी सर्वव्यापी आहे. ‘स्क्विड गेम’ पण भांडवलशाहीमधल्या आर्थिक विषमतेवर आणि समानतेच्या संधी वर बोलतो.

सध्याचं आपल्या आजूबाजूचं जग पण ‘रिऍलिटी शो ‘ च्या जवळ जाणारं आहे. आपण सगळे या खेळातले पात्र आहोत आणि शेकडो कॅमेऱ्यांमधून तुमच्यावर नजर ठेवली जात आहे. तुम्ही कुठं जाताय, काय खाताय, काय पिताय, काय घालताय, कुणाशी आणि काय बोलताय याची बारीक नोंद सर्च इंजिन्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ठेवली जात आहे. ‘स्क्विड गेम्स ‘ मधल्या खेळाडूंनी जसं संमतीपत्र खेळाच्या आयोजकांना स्वखुशीने सही करून दिलं आहे, तसं आपणही आपलं स्वातंत्र्य आणि खाजगीपण या आय टी कंपन्यांकडे स्वखुशीने गहाण टाकलं आहे. आपण कुठेही असलो तरी सीसीटीव्ही कॅमेरे आपला पाठलाग करत असतातच. आजूबाजूची माध्यमं तारस्वरात आपल्याला सांगत आहेत की वेगाने आपण महासत्ता बनण्याकडे वाटचाल करत आहोत. आजूबाजूला भीषण दारिद्र्य दिसत असून, पण आपला मेंदू या महासत्ता प्रपोगंडासमोर शरणागती पत्कारत चाललाय. सोशल मीडियावर लोक आपण रोज किती सुंदर आहोत, आपण किती वेगवेगळ्या डिशेस खातो, आपण किती आनंदी आहोत, आपण आपल्या जवळच्या लोकांवर किती प्रेम करतो याचे थकवून टाकणारे अपडेट्स देत असताना, आपणच या जगातले सगळ्यात दुःखी माणूस असू असं पण हल्ली वाटतंय. कदाचित आपल्यालाच एक समूह म्हणून ‘scripted reality’ मध्ये राहण्याची सवय लागली असावी. मग नेमाडे ‘कोसला ‘ मध्ये लिहितात तसं -उदाहरणार्थ काही तरी झालं तरी हे आपल्याला खुंट्यावर आणून वैगेरे बांधतीलच. मग नेमकं अगोदरच खुंट्यावर येऊन उभं राहिलेलं बरं. ‘द ट्रुमन शो’ मधला ट्रुमन असो, ‘स्क्विड गेम ‘ मधला सेओंग असेल आणि या खऱ्या रिऍलिटी शॉ मध्ये जगणारे आपण यांना जोडणारा हा वैश्विक धागा.

कोरियन मेकर्सना हॉलीवूडने लोकप्रिय केलेल्या झोंबीपटांचं प्रचंड आकर्षण आहे. त्यांनी या जॉनरमध्ये फार वेगवेगळे प्रयोग केले आहेत. यात ‘किंगडम’ या सीरिजचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. माणसं झोंबी बनणं म्हणजे जणू आधुनिक जगाचंचं बाय प्रोडक्ट आहे असा एक समज या जॉनरचे सिनेमे आणि सिरीज बघून होऊ शकतो. ‘किंगडम’ सीरिजचं वेगळेपण आहे ते इथं. ‘किंगडम ‘ अशा काळात घडतेय ज्या काळात कोरियामध्ये राजेशाही आहे. कोरियाचा राजा एका गूढ आजारामुळे जनतेसमोर येत नाहीये. राजाला पडद्याआड ठेवून काही महत्वाकांक्षी लोकांनी कारभार हातात घेतला आहे आणि ते राजाच्या वारसदार असणाऱ्या युवराजाला आपल्या मार्गातून हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात सर्वत्र अनागोंदी माजली असताना हा कोवळा राजकुमार वडिलांच्या गूढ आजाराच्या मुळाशी पोहोंचण्याचा प्रयत्न करत असतानाच देशात झोंबी प्रकोप सुरु होतो. अगोदरच अनागोंदी माजलेला देश आणि तरुण राजपुत्र या झोंबी प्रकोपाला कसं तोंड देतात हे ‘किंगडम ‘ मध्ये बघता येतं. ‘किंगडम’ मध्ये काळाचा जो पट वापरला आहे तोच फार अनोखा आहे. त्यातून आपल्याला एक अनोळखी कोरिया उलगडत जातो. ‘ऑल ऑफ अस आर डेड’ या सिरीजमध्ये एका शाळेतल्या सायन्स लॅबमधला एक प्रयोग उलटतो आणि त्या शाळेत लोक झोंबी बनण्याची लाट येते. अख्खी शाळा झोंबी बनण्याच्या प्रक्रियेत गुरफटलेली असताना त्यातून सहीसलामत बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही मुलामुलींची गोष्ट. यातली शाळा हे खरं तर आपल्याच आजच्या जगाचं मायक्रो स्वरूप आहे. पात्र जरी शाळकरी मुलं असली तरी त्यांच्यात पण टिकून राहण्याची -जिवंत राहण्याची मूलभूत उर्मी विकसित झालेली आहेच. त्यातून उडणारा संघर्ष या सीरिजमध्ये केंद्रस्थानी आहे. तो जितका मनोरंजक आहे, तितकाच आपल्या आजच्या जगाबद्दल बरीच मूलभूत विधानं करणारा. ‘कोरियन झोंबी’ हा रोचक जॉनर आहे खरा .

कोरियन फिल्ममेकर्सना आर्थिक सामाजिक विषमता आणि झोम्बीपट यात एवढा रस का असावा ? याची उत्तर त्यांच्या अस्थिर इतिहासात आणि देशाच्या अनैसर्गिक फाळणीमध्ये असावीत. हुकूमशाही उत्तर कोरियामध्ये सिनेमा हा फक्त प्रपोगंडाचं एक एक्स्टेंशन असताना दक्षिण कोरियामध्ये वेगवेगळ्या विषयांवर सीरिज आणि सिनेमे बनत आहेत. जर कोरियाची फाळणीच झाली नसती तर कोरियन फिल्ममेकिंग एका वेगळ्या उंचीवर पोहोचलं असतं का ? भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली नसती तर आपली संयुक्त क्रिकेट टीम (त्यांचे वेगवान गोलंदाज आणि आपले फलंदाज ) कसली भारी राहिली असती असा एक काल्पनिक गेम अनेकांच्या मनात खेळला जातो. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्या फिल्ममेकिंगच्या बाबतीत हाच खेळ खेळला जात असावा.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00