कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्या कोल्हापूर पोलिसांनी मुसक्या आवळून मंगळवारी (२६ मार्च) सकाळी कोल्हापुरात आणले. त्याचा सहकारी परीक्षित यालाही अटक केली. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर कोरटकरला न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान कोरकटरच्याविरोधात शिवप्रेमींनी संताप व्यक्त करत पोलिस स्टेशनबाहेर मोठी गर्दी केली आहे. शिवप्रेमींच्या संतप्त भावना लक्षात घेऊन पोलिसांनी गनिमी काव्याने पोलिस स्टेशनच्या मागील दरवाजातून कोरटकरला न्यायालयात नेले. (Koratkar)
गेले महिन्याभर पोलिसांना गुंगारा देणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या तेलंगणातील मंचरियाल येथे मुसक्या आवळल्या. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी रात्रभर प्रवास करुन कोरटकला मंगळवारी सकाळी पावनेआठ वाजण्याच्या सुमारास जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आणले. यावेळी परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोरटकरला पोलिस ठाण्यात आणल्याचे कळताच शिवप्रेमी जुना राजवाडा पोलिस ठाण्यासमोर जमू लागले. (Koratkar)
कोर्टात नेताना पोलिसांकडून गनिमी कावा
जुना राजवाडा पोलिस ठाण्यातून कोरटकरला न्यायालयात अकरा वाजण्याच्या सुमारास नेणार आहेत, अशी माहिती वाऱ्यासारखी पसरल्यावर भवानी मंडपात शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. यावेळी शिवप्रेमींनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कोरटकरला कोल्हापुरी हिसका दाखवणार असा इशारा दिल्याने भवानी मंडपात मोठा फौजफाटा ठेवण्यात आला होता. मिडियाचे प्रतिनिधीही हजर होते. पण पोलिसांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या मुख्य दरवाजातून कोरटकरला न्यायालयात न नेता मागील बाजूने इंदुमती गर्ल्स हायस्कूलच्या पाठीमागील दरवाजातून कोरटकरला न्यायालयात नेते. पोलिसांनी गनिमी कावा केल्याने शिवप्रेमींनी इंदुमती गर्ल्स हायस्कूलकडे धाव घेतली पण तो पर्यंत पोलिसांची वाहने न्यायालयाकडे रवाना झाली होती. (Koratkar)
चंद्रपूरमध्ये दोन दिवस मुक्काम
कोरटकरला कोल्हापूरला आणल्यानंतर जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी त्याच्याकडे चौकशी केली. न्यायालयाने त्याचा जामिन फेटाळल्यानंतर तो दोन दिवस चंद्रपूरमध्ये एका हॉटेलमध्ये होता अशी माहिती पुढे आली. त्याची बडदास्त चंद्रपूरातील एका बुकीमालकाने केली होती. हॉटेलमध्ये त्याला काही अधिकारी भेटले असल्याची माहिती पुढे आली आहे. पण याबाबत पोलिसांनी अधिकृत कोणतीच माहिती दिलेली नाही. अंतरिम जामीनाच्या काळात तो नागपूरलाही आला होता. त्याने तेलंगणाला जाण्यासाठी स्वतंत्र कार बुक केली होती. त्या कारच्या चालकाची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी कोरटकरचा माग काढत त्याच्या मुसक्या आवळल्या. (Koratkar)
हेही वाचा :
फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार द्या
महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का?
औरंगजेबाच्या कबरीनंतर रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद