कोल्हापूर : प्रतिनिधी: इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना दिलेली धमकी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या नागपूरचे पत्रकार प्रशांत कोरटकर यांच्या अंतरिम जामिनांवर आणि त्यांनी प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहण्यासंबधी निर्णयाबाबत बुधवारी (दि.१२) जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. आज मंगळवारी (दि.११) झालेल्या सुनावणीत बचाव पक्षाच्या वकीलांनी कोल्हापूरात स्फोटक आणि तणावपूर्ण वातावरण असल्याने कोरटकरांना सुनावणीच्यावेळी व्हीसीद्वारे उपस्थित राहण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीला सरकारी वकील आणि इंद्रजीत सावंत यांच्या वकिलांनी जोरदार विरोध केला. (Koratkar)
जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.व्ही.कश्यप यांच्यासमोर आज मंगळवारी दुपारी सुनावणी झाली. तत्पुर्वी सकाळी मुंबईत उच्च न्यायालयात सुनावणी झाली. प्रशांत कोरटकर यांचा जामिन रद्द करावा अशी मागणी राज्य सरकारच्यावतीने केली होती. उच्च न्यायालयाने या खटल्याची सुनावणी कोल्हापूरात जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू असून राज्य सरकारची योग्य बाजू ऐकून निर्णय देण्यात यावा असा आदेश उच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर आज मंगळवारी दुपारी जिल्हा व सत्र् न्यायाधीश कश्यप यांच्यासमोर सुनावणी झाली. (Koratkar)
प्रशांत कोरटकला जिल्हा व सत्र् न्यायालयाने ११ मार्चपर्यंत अंतरिम जामिन दिला होता. मंगळवारी झालेल्या सुनावणीत जिल्हा व सत्र न्यायालयात बचाव पक्षाचे वकील सौरव घाग यांनी कोरटकरचा अंतरीम जामीन वाढवण्याचा अर्ज दाखल केला. त्यानुसार न्यायाधीश कश्यप यांनी एक दिवसाने अटकपूर्व जामीन वाढविला आहे. जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी बाजू मांडली की, कोरटकरकडे गुन्हयाबाबत चौकशी करणे गरजेचे आहे, कारण त्याने मोबाईलमधील डाटा इरेजर केला आहे. त्यामुळे त्याने न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडावे. (Koratkar)
इंद्रजित सावंत यांच्यावतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील ॲड. असिम सरोदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे युक्तीवाद केला. ते म्हणाले, ‘कोरटकरच्या विरोधात सरकारकडे भरपूर पुरावे आहेत. त्याच्याकडे अजून तपास करण्यासाठी तो पोलीसांच्या ताब्यात मिळणे गरजेचे आहे’. बचाव पक्षाचे वकील ॲड. सौरव घाग म्हणाले, कोरटकर तपास कामात सहकार्य करण्यास तयार आहेत, त्यांनी मोबाईलही जमा केला आहे. जर सरकारी पक्षाला त्यांनी डाटा डिलीट केला असे वाटत असेल तर सीडीआर काढून तपास करावा. यासाठी कोरटकर न्यायालयात येण्याची गरज नाही. सुरक्षेच्या कारणास्तव कोरटकर यांना प्रत्यक्षात न्यायालयात हजर न राहता व्हीसीव्दारे हजर राहण्याची परवानगी मिळावी. (Koratkar)
दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यावर बुधवारी याबाबत सुनावणी केली जाईल असे न्यायाधिश डी.व्ही. कश्यप यांनी सांगितले. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे यावेळी हजर होते. इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, दिलीप देसाई यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. (Koratkar)
खटल्याची पार्श्वभूमी
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी नागपूरचे पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी मोबाईलवर धमकी दिली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक उद् गार काढले. जुना राजवाडा पोलिसांनी कोरटकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. इंद्रजीत सावंत यांनी स्वत:चा मोबाईल पोलिसांना तपासासाठी जमा केला. धमकीचा फोन कोरटकरने केला होता हे मोबाईल तपासणीत स्पष्ट झाल्यावर कोरटकरचा ताबा घेण्याासाठी जुना राजवाडा व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे संयुक्त पथक नागपूरला गेले होते. मात्र तत्पूर्वी कोरटकरने कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयातून अटकपूर्व अंतरीम जामीन मिळवला. त्यामुळे ११ मार्चपर्यंत कोरटकरला दिलासा मिळाला होता. नागपूर सायबर पोलीसांनी कोरटकरचा जप्त केलेला मोबाईल व सीमकार्ड कोल्हापूर पोलीसांच्या ताब्यात दिले. हा मोबाईल राजवाडा पोलीसांनी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला होता. दरम्यान मोबाईलमधील डाटा डिलीट करूनच तो जमा केल्याचे फॉरेन्सिकच्या लक्षात आले. लॅबने तसे पोलीस अधिकाऱ्यांनाही कळविले आहे. Koratkar)
प्रजासत्ताकचा अर्ज नाकारला.
प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेच्यावतीने न्यायालयात अर्ज केला होता. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना देशभरातील लोक देव मानतात, त्यांची पूजा करतात. मात्र कोरटकर यांनी त्यांचा अवमान करून तो देशभरातील मराठी माणसाचा अवमान केला आहे. याबाबत कठोर कारवाई झाली पाहिजे असे मत मांडणारा अर्ज प्रजासत्ताकच्यावतीने ॲड. बाबा इंदूलकर यांनी न्यायालयात मांडला. मात्र न्यायालयाने तो नाकारला. (Koratkar)
‘चिल्लर’ माणूस पोलिसांना का सापडत नाही
कोरटकरने मला धमकावले हे माझ्यासाठी महत्वाचे नाही, तर त्याने मी ज्यांना देव मानतो त्या युगपुरुषांचा अवमान केला आहे. असा चिल्लर माणूस पोलीसांना का सापडत नाहीत, असा सवाल इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी न्यायालयाच्या बाहेर सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना केला. मुख्यमंत्री शिवप्रेमी आहेत. त्यांनी याबाबत लक्ष घालून पोलीसांना आदेश द्यावेत. मी काय केले नाही असे तो म्हणतो मग लपून का बसलाय ? असा सवाल सावंत यांनी केला. (Koratkar)
हेही वाचा :
या खेड्यात लोक करतात मूत्रदान!