नवी दिल्ली : भारताची बुद्धिबळपटू कोनेरू हम्पीने जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला गटाचे विजेतेपद पटकावले. अखेरच्या फेरीत तिने इंडोनेशियाच्या इरेन सुकंदरला पराभूत केले. ३७ वर्षीय कोनेरूने ११ फेऱ्यांमध्ये ८.५ गुण मिळवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. (Koneru Humpi)
अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे ही स्पर्धा रंगली. कोनेरूचे जलद बुद्धिबळ स्पर्धेचे हे दुसरे विश्वविजेतेपद आहे. यापूर्वी २०१९ मध्ये जॉर्जिया येथे झालेली ही स्पर्धा कोनेरूने जिंकली होती. दोनवेळा ही स्पर्धा जिंकणारी कोनेरू पहिलीच भारतीय बुद्धिबळपटू ठरली आहे. याबरोबरच, तिने चारवेळा या स्पर्धेच्या आघाडीच्या तीन बुद्धिबळपटूंमध्ये स्थान मिळवले आहे. “मी खूप आनंदी आहे. आजचा दिवस खूप कठीण असेल, टायब्रेकला सामोरे जावे लागेल, अशी माझी अपेक्षा होती. मी शेवटची लढत पूर्ण केली, तेव्हा मी विजयी झाल्याचे मला समजले,” अशी प्रतिक्रिया हम्पीने विजयानंतर दिली. या संपूर्ण वर्षामध्ये मी बरेच चढउतार पाहिले. काही स्पर्धांमध्ये तर मी अखेरच्या स्थानी होते. त्यामुळे, हा विजय माझ्यासाठी आश्चर्याचा सुखद धक्का आहे, असेही ती म्हणाली. कुटुंबियांकडून मिळालेल्या पाठिंब्याचाही तिने आवर्जून उल्लेख केला. (Koneru Humpi)
या स्पर्धेच्या महिला गटात भारताची डी. हरिका ८ गुणांसह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानावर राहिली. पुरुष गटामध्ये, रशियाच्या वोलोदार मुर्झिनने १० गुण मिळवत विजेतेपदावर नाव कोरले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरून (ट्विटर) कोनेरूचे अभिनंदन केले आहे. (Koneru Humpi)
👏 Congratulations to 🇮🇳 Humpy Koneru, the 2024 FIDE Women’s World Rapid Champion! 🏆#RapidBlitz #WomenInChess pic.twitter.com/CCg3nrtZAV
— International Chess Federation (@FIDE_chess) December 28, 2024
हेही वाचा :