कोल्हापूर : प्रतिनिधी : मार्चअखेर जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसे सरकारी कार्यालयाकडून थकबाकी वसूल करणाऱ्यांवर बडगा उचलला जात आहे. महापालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स, पिण्याच्या पाण्याची थकबाकीसाठी कडक कारवाई करण्यात येत आहे. थकीत पाणीबील वसुलीसाठी पाणी पुरवठा खात्याचा कर्मचारी कनेक्शन तोडत असताना एका भाडेकरुने त्याला थेट मारहाण केली. कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल भाडेकरुविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (KMC Employee beaten)
कोल्हापूर महापालिकेकडून घरफाळा आणि पाण्याच्या बिलाच्या थकबाकीदाराविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. महापालिकेने थकित पाणीबिलाच्या दंडात ८० टक्के सवलत दिली आहे. तरीही अनेक ग्राहक पाणीबिल भरत नाहीत. त्यांचे पाणी कनेक्शन करण्याचा आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे. आज, मंगळवारी सकाळी मंगळवार पेठेतील आहार हॉटेल परिसरात महापालिकेकडील पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी उमेशचंद्र जोतिराम साळोखे (वय ५४, रा. मरगाई गल्ली, शिवाजी पेठ) थकीत पाणीबिलाच्या वसुलीसाठी कनेक्शन कट करण्यासाठी गेले. (KMC Employee beaten)
पाणी कनेक्शन तोडत असताना रोहित घोरपडे यांनी उमेशचंद्र साळोखे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पीव्हीसी पाईपने मारहाण केली. त्यानंतर उमेशचंद्र साळोखे यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात रोहित विजय घोरपडे यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा नोंद केला आहे. संशयित रोहित घोरपडे हे आहार हॉटेलशेजारील सुधीर पेटकर यांच्या घरी भाड्याने राहतात.
हेही वाचा :
कुंभमेळ्यात सापडला पोटचा गोळा!