कथुआ : जम्मू आणि काश्मीरमधील कथुआमध्ये तीन दहशतवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलांकडून शोधमोहीम राबवण्यात येत आहे. कथुआमधील पंजतिर्थी-बारोटाच्या जंगलामध्ये हे तीन दहशतवादी लपले असून ते सातत्याने ठिकाण बदलत असल्यामुळे तीन दिवसांपासून त्यांचा शोध सुरू आहे. (Kathua)
पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी (३१ मार्च) रात्री चकमक झाली. याआधी २३ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय सीमेजवळील नर्सरी भागात झालेल्या चकमकीदरम्यान सर्व दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. त्यानंतर चार दिवसांनी कथुआच्या सन्याल बेल्ट वनक्षेत्रात झालेल्या चकमकीदरम्यान, दोन दहशतवादी ठार झाले होते, तर चार पोलिसांना वीरमरण आले होते. आता जंगलात लपलेले तीन दहशतवादी हे त्यांच्यापैकीच असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. (Kathua)
भारतीय लष्कर, पोलिस, राखीव सुरक्षा दल आणि एनएसजी यांच्याकडून एकत्रितपणे ही मोहीम राबवण्यात येत आहे. या शोधमोहिमेदरम्यान हवाई ड्रोनचा वापर करण्यात येत असून दहशतवाद्यांचा माग काढण्यासाठी कुत्र्यांचीही मदत घेण्यात येत आहे. सुरक्षा दलांनी या वनक्षेत्राभोवती कडे केले असल्याने त्यांना आता पळून जाण्यासाठी वाव उरलेला नाही. राजबाग भागातील रूई, जुथुना, घाटी व सन्याल वनक्षेत्रात ही मोहीम सुरू असून बिलावर भागातही शोध घेण्यात येत असल्याचे अधिकारी म्हणाले. (Kathua)
सोमवारी रात्री तीन संशयित रूई गावामध्ये वावरताना दिसले होते. ते काळ्या कपड्यांमध्ये होते आणि त्यांच्या हातात मोठ्या बॅग होत्या. गावातील एका घरात त्यांनी पाणी मागितले. घरातील वृद्धा पाणी आणण्यासाठी गेली असता, ते बळजबरीने घरात शिरले व त्यांनी स्वयंपाकघरातील काही अन्न घेतले. जाण्यापूर्वी त्यांनी महिलेला ५०० रुपयांच्या दोन नोटाही देऊ केल्या होत्या. मात्र, तिने त्या स्वीकारण्यास नकार दिला. स्थानिकांच्या मदतीशिवाय या दहशतवाद्यांना इतके दिवस लपून राहणे शक्य नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दहशतवाद्यांना मदत केल्याच्या संशयावरून पोलिसांनी आतापर्यंत सहाजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यामध्ये महिलांचाही समावेश आहे.
हेही वाचा :
सर्वोच्च न्यायालयाने प्रयागराज प्राधिकरणाचे उपटले कान
कोरटकरचा कारागृहातील मुक्काम वाढला