Home » Blog » Karnataka Honeytrap: केंद्रीय नेते, न्यायाधीशांसह ४८ जणांवर हनी ट्रॅप

Karnataka Honeytrap: केंद्रीय नेते, न्यायाधीशांसह ४८ जणांवर हनी ट्रॅप

उच्चस्तरीय चौकशीचे कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचे आदेश

by प्रतिनिधी
0 comments
Karnataka Honeytrap

बंगळुरू : “आमदार, काही केंद्रीय नेते आणि न्यायाधीशांसह ४८ जणांवर हनी ट्रॅप टाकण्यात आले. त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवण्यात आले आहेत,” असा गंभीर दावा कर्नाटकच्या खुद्द सहकार मंत्र्याने भर विधानसभेत केला. त्यामुळे सभागृहात गदारोळ उडाला. सहकार मंत्री राजन्ना यांनी मी स्वत:ही याची शिकार झालो असल्याचे कबूल केले. (Karnataka Honeytrap)

मुख्यमंत्रिपदाची आकांक्षा असलेल्या एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने हा प्रकार घडवून आणल्याची चर्चा यावेळी सुरू झाली. हा मुद्दा गंभीर आहे. त्यामुळे राजन्ना यांनी दाखल केलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे या आरोपांची उच्चस्तरी चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी दिले.

सहकार मंत्री के.एन. राजन्ना यांनी स्वतः हनीट्रॅप बळी असल्याचे कबूल केले. त्यानंतर हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला. सभागृहात जोरदार चर्चा सुरू झाली. “हा एक गंभीर मुद्दा आहे. जर आपल्याला आपल्या सदस्यांची प्रतिष्ठा वाचवायची असेल तर आपण अशा प्रकारांवर बंदी घातली पाहिजे. राजन्ना यांनी दाखल केलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे हनीट्रॅपच्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देत आहे,” असे परमेश्वर म्हणाले. (Karnataka Honeytrap)

“या प्रकरणात माझ्या एकट्यावर नाही; तर आमदार, केंद्रीय नेते आणि न्यायाधीशांसह ४८ जणांना हनीट्रॅप करण्यात आले आहे आणि त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवण्यात आले आहेत,” असा दावा राजन्ना यांनी केला.

भाजपचे माजी मंत्री व्ही. सुनील कुमार यांनी हा मुद्दा बुधवारी (१९ मार्च) सर्वप्रथम उपस्थित केला. त्यांनी काँग्रेस सरकारवर “‘नी ट्रॅप फॅक्टरी” चालवल्याचा आरोप केला. यात गुंतलेल्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ आमदार बसनगौडा पाटील यत्नाल यांनी आरोप केला की, नेतृत्वाच्या लढाईसाठी राजकीय विरोधकांना बदनाम करण्यासाठी हा घोटाळा काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने घडवून आणला आहे. (Karnataka Honeytrap)

जे लोक मुख्यमंत्रिपदाकडे डोळे लावून बसले आहे आहेत ते त्यांच्या राजकीय विरोधकांना बदनाम करण्यासाठी अशा कारवाया करत आहेत, असेही आम्हाला ऐकायला मिळते. भविष्यात, ते त्यांच्या गरजेनुसार कोणालाही लक्ष्य करू शकतात, असा इशारा यत्नाल यांनी कोणाचेही नाव न घेता दिला.

राजण्णा यांनी तुमकुरु जिल्ह्यातील एका मंत्र्याशी संबंधित एका विशिष्ट दाव्याकडे लक्ष वेधले. “मी आणि परमेश्वर हे तुमकुरुचे एकमेव मंत्री आहोत,” असे राजण्णा म्हणाले. काही लोकांकडे सीडी आणि पेन ड्राइव्ह होते असेही ते म्हणाले. लैंगिक छळाच्या तक्रारीचा सामना करणारे भाजप आमदार मुनीरत्न यांनी दावा केला की तेही राजकीय सूडबुद्धीचा बळी आहेत. “माझी नातवंडे लहान आहेत. ते त्यांच्या शाळेत गेल्यावर त्यांना कसे वाटेल याचा विचार करा,” असे ते म्हणाले. (Karnataka Honeytrap)

आरोपांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत ते म्हणाला: “जर माझी चूक असेल तर मला फाशी द्या, पण चारित्र्यहनन करू नका.”

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र म्हणाले की, न्यायाधीश किंवा एसआयटी या दोघांपैकी कोणीही याची चौकशी करू शकत नाही. ४८ जणांना अडकवण्यात आल्याच्या राजण्णाच्या दाव्याचा हवाला देत त्यांनी हे प्रकरण घडवून आणणाऱ्या व्यक्तीचे नाव उघड करण्याची विनंती केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोली, यांचे भाऊ रमेश जारकीहोली २०२१ मध्ये हनी-ट्रॅप घोटाळ्यात अडकले होते. त्यांनी खुलासा केला की एका वरिष्ठ मंत्र्याला अडकवण्याचे दोन अयशस्वी प्रयत्न झाले होते. “आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू; गृहमंत्र्यांशी चर्चा केली आहे. जर तक्रार केली असेल तर ती चौकशीसाठी मदत करू, ” असे ते म्हणाले. “हनीट्रॅपसाठी जबाबदार असलेल्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीवर मी ठाम आहे. प्रथम तक्रार दाखल करावी आणि त्यानंतर सखोल चौकशी व्हावी,” असे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले.

हेही वाचा :
देवेंद्र फडणवीस हे सुटाबुटातले `योगी`
जग अवकाशात, आपण कबरीच्या मागे

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00