मुंबई : प्रतिनिधी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून महिलेचा छळ सुरू असून मंत्र्यांनी स्वत:चा न्यूड फोटो पाठवून विनयभंगाचा प्रकार सुरू केला आहे, असा आरोप शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला. पिडित महिला विधानसभेसमोर उपोषणाला बसणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Jaykumar Gore)
खासदार राऊत म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतःचे न्यूड फोटो एका महिलेला पाठवल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. हे अत्यंत गंभीर प्रकरण असून स्वारगेटला जो प्रकार घडला तसाच प्रकार जयकुमार गोरे यांच्याबाबत समोर येत आहे. शिवकाळातील संबधित एका घराण्यातील कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्याने कसा छळ केला या संदर्भातील माहिती समोर आली आहे. ही महिला पुढल्या काही दिवसांमध्ये विधानभवनासमोर उपोषणाला बसणार असल्याचे वृत्त आहे. स्त्रीचा विनयभंग करणारा मंत्री मंत्रीमंडळात असून यामुळे महाराष्ट्र कलंकित होत आहे’ असा आरोपही त्यांनी केला. (Jaykumar Gore)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रीमंडळाचे पत्ते पुन्हा एकदा पिसले पाहिजे. पुन्हा एकदा सर्व मंत्र्यांची झाडाझडती घेतली पाहिजे. ही सर्व रत्न त्यांनी एकदा तपासली पाहिजे’, असा टोलाही राऊत यांनी लगावला. जयकुमार गोरे यांच्याबाबत समोर आलेला प्रकार महाराष्ट्राला काळिमा फासणारा आहे. एका स्त्रीचा विनयभंग करणारा मंत्री मंत्रीमंडळात असून यामुळे महाराष्ट्र कलंकित होत आहे. त्या कलंकित मंत्र्याला मंत्रीमंडळात का ठेवले आहे?’ असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला. (Jaykumar Gore)
भाजपमधील महिला मोर्चाच्या पदाधिकारी विरोधी पक्षाचा एखादा आमदार, खासदार, नेत्यावर आरोप केले की टीका करतात. पण जयकुमार गोरे, स्वारगेट प्रकरणात आश्रय देणाऱ्या देणारा आमदार किंवा धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला का? महिला आयोग, महिला नेत्या कुठे आहेत? असा सवालही राऊत यांनी केला. (Jaykumar Gore)
शिवसेना जयकुमार गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी करणार का? असे विचारले असता राऊत म्हणाले, ‘राजीनाम्याची मागणी कशाला करायला हवी. अशा मंत्र्याला लाथ मारली पाहिजे. महिलांचा विनयभंग करणारे मंत्री मंत्रीमंडळात तुमच्या मांडीला मांडी लावून बसणार असतील तर देवेंद्र फडणवीस कोणत्या तोंडाने महिलांच्या अत्याचाराविरुद्ध, सबलीकरणावर आणि लाडक्या बहिणींवर बोलणार आहेत हा प्रश्न आहे. हा नैतिकतेचा मुद्दा असून नैतिकता सरकारच्या आसपास मैलभरही फिरत नाही. आम्ही हे प्रश्न केंद्राकडे पाठवणार आहे. अमित शहा यांना पत्र लिहून आपण यात लक्ष घाला अशी मागणी करणार आहे, असेही राऊत यांनी सांगितले. (Jaykumar Gore)
काँग्रेसचे आमदार विजय वडेटट्टीवार यांनीही गोरे यांचे नाव न घेता पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान असणाऱ्या मंत्र्यांकडून महिलेचा छळ सुरू आहे, असा आरोप केला आहे.खासदार राऊत यांनी केलेल्या आरोपाचा खुलासाही मंत्री जयकुमार गोरे यांनी केला. २०१७ मधील हे प्रकरण असून न्यायालयाने या गुन्ह्यात २०१९ मध्ये निर्दोष मुक्तता केली असल्याचे सांगितले. तसेच माझ्यावर ज्यांनी आरोप केले आहेत त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपली बदनामी करण्यासाठी आरोप केले जात आहेत, असेही गोरे म्हणाले. (Jaykumar Gore)
हेही वाचा :
‘औरंगजेब’ वक्तव्यावर अबू आझमींची माघार
मुंडेंच्या राजीनाम्याने सरकारवरील रक्ताचे डाग धुऊन निघणार नाहीत…
दोन महिन्यांपूर्वी फोटो येऊनही फडणवीसांना झोप कशी लागली?