-डॉ. श्रीरंग गायकवाड
जनाबाई नामदेवांच्या घरच्या दासी होत्या, असं सांगतात. दासी संकल्पनेचा अर्थ काहीही असो. पण जनाबाईंना काबाडकष्ट करावे लागत होते, हे नक्की.
अशा कष्टकरी महिलेच्या प्रतिभेला अंकुर फुटले. नामदेवांसोबत झालेल्या अभ्यास, चिंतनातून जनाबाईंचं व्यक्तिमत्व प्रगल्भ झालं. प्रत्येक संताचं मूल्यमापन करण्याची नैतिक क्षमता त्यांच्याकडं आली. जनाबाईंनी लिहिलेल्या अभंगांमुळंच तर हे संत आपल्यापर्यंत पोहोचले. ज्ञानदेवादी भावंडांनीही जनाबाईंच्या प्रतिभेला नमस्कार केला. संतमेळ्यात जनाबाईंचं स्थान एवढं उंचावलं की त्या या संतमेळ्याच्या मार्गदर्शक, समीक्षक बनल्या. संत ज्ञानदेव-नामदेवांच्याही सल्लागार बनल्या. कीर्तनात त्या ‘हां आता ज्ञानदेवा, तुम्ही अभंग बोला’ असं अधिकारवाणीनं सांगू लागल्या. एवढंच नाही तर समतेच्या धाग्यानं समाज जोडण्यासाठी तीर्थाटनाला निघालेले ज्ञानदेव-नामदेव जनाबाईंशी विचारविनिमय करूनच निघतात.
प्रत्येकवेळी जनाबाईंवर निर्धास्तपणे भार टाकून ते आळंदी-पंढरपूर सोडतात. याचा अर्थ जनाबाई तेवढ्या सक्षम होत्या. वारकरी पंथाचं त्या नेतृत्व करू शकत होत्या. हिंदू धर्मातील कर्मकांडांनी कळस गाठलेल्या त्या यादव काळात बौद्ध, जैन, लिंगायत, महानुभव, नाथ आदी संप्रदायही निष्प्रभ झाले होते. अशा काळात वारकऱ्यांची समतेची विचारधारा नव्यानं रुजवण्याची गरज होती. गरज होती, समन्वयाची. नांदेवरायांनी ती जबाबदारी जनाबाईंवर टाकली आणि जनाबाईंनी ती अत्यंत समर्थपणे पार पाडली. त्यासाठी भारतभर मुळं रोवलेल्या नाथ संप्रदायाशी त्यांनी नातं जोडलं. ज्ञानदेवांचे थोरले बंधू समवयस्क निवृत्तीनाथ यांच्याशी संवाद वाढवला. गोरक्षनाथांना विस्तार केलेल्या नाथपंथाचं खतपाणी वारकरी संप्रदायाला घातलं. ‘मच्छींद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वोळला गहिनीप्रति, गहीनीप्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवे सार चोजविले’ अशी परंपरा ज्ञानेश्वरमाऊली सांगतात. ती परंपरा जनाबाईंनी अंगी मुरवून घेतली होती. म्हणून तर त्यांनी गोरक्षनाथांचा प्रसिद्ध पाळणा त्या लिहू शकल्या. त्यासाठी जनाबाई योग शिकून योगिनी बनल्या. कुंडलिनी शक्तीसारख्या योगाच्या शिखरावर त्या पोहोचल्या, पण तिथं फार काळ रमल्या नाहीत.
‘दळू कांडू खेळू सर्व पाप ताप जाळू’ म्हणत त्या सर्वसामान्यांना समजणाऱ्या वारकरी पंथात पुन्हा रममाण झाल्या. नाथपंथाच्या तत्त्वज्ञानाच्या प्रकाशात वारकरी पंथाला वाट दाखवणाऱ्या निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, विसोबा खेचर या विभूतींच्या त्या कायम संपर्कात राहिल्या, या समन्वयाचा नामदेवांच्या विस्तारकार्याला खूप उपयोग झाला.
ज्ञानदेवांच्या संगतीत तर जनाबाईंचं आयुष्य झळाळून गेलं. ज्ञान आणि नामभक्तीचा संगम जनाबाईंनी घडवला. विश्वबंधुतेचं पसायदान मागणाऱ्या ज्ञानदेवांप्रमाणे जनाबाई
आपल्या एका अभंगात ‘झाले सोयरे त्रिभुवन’ अशी ग्वाही देतात. संपूर्ण विश्वाशी ‘सोईरपण’ जोडण्याची जनाबाई ही इच्छा कालातीत आहे. या ज्ञानांचा देव असणाऱ्या ज्ञानदेवांनी आपल्या पोटी जन्म घ्यावा, अशी इच्छा जनाबाई एका अभंगात व्यक्त करतात. ‘रिंगण’च्या याच अंकात ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत प्रतिमा जोशी या इच्छेचं विश्लेषण करतात. म्हणजे असा ज्ञानवंत आमच्या म्हणजे वंचित, उपेक्षितांच्या, दलितांच्या घरात जन्माला यावा, जो आमचा उद्धार करेल. त्यानंतर सातशे वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले! प्रतिमाताईंचं हे विश्लेषण नवी दृष्टी देणारं आहे. संतांच्या कार्याचं महत्त्व सांगणारं आहे. पूर्वजन्मांच्या कथाही आपल्याला याच दृष्टीकोनातून समजून घेता येतील.
ज्ञानदेवादी जातीच्या ब्राम्हण भावंडांशी जनाबाईंचं जेवढं सख्य आहे, तेवढाच लळा त्यांनी इतर बहुजन संतांना लावला आहे. या सर्व संतांना कडेखांद्यावर घेतल्याचं ‘विठु माझा लेकुरवाळा’ असं लोभस आणि वारकरी संप्रदायाचं सार सांगणारं चित्र जनाबाईंनीच रेखाटलं आहे. शैव-वैष्णवांचा वाद मिटवण्यातही जनाबाईंनी पुढाकार घेतला आहे.
त्या काळात सगुण-निर्गुण, द्वैत-अद्वैताच्या भिंती उंच झाल्या होत्या. त्या भिंती जमीनदोस्त करून, परस्परविरोधाचं साचलेलं मळभ दूर करून विठ्ठलभक्तीचं सर्वांना सामावून घेणारं स्वच्छ मोकळं आभाळ जनाबाईंनीच दाखवलं. या शूद्र, दासी महिलेला आणि तिच्या सगुण सावळ्या विठ्ठलाला भेटण्यासाठी निर्गुणोपासक संत कबीर काशीहून पंढरपुरात आले. जनाबाईंना भेटल्यानंतर जनी म्हणजेच ‘काशी’ असल्याचे साक्षात्कारी बोलले. नामदेव-जनाबाईंनी त्यांना विठोबाला भेटवलं. चंद्रभागेच्या वाळवंटात नेलं. ज्याच्या आईवडिलांच्या सेवेवर प्रसन्न होऊन देव पंढरपुरात आले, त्या पुंडलिकाचं दर्शन घडवलं. सर्व संतमेळ्याची ओळख करून दिली. वारकरी विचारांचा अत्युच्च अविष्कार असणाऱ्या नामदेवांच्या कीर्तनाची अनुभूती दिली. यानंतर कबीर वारकरीच होऊन गेले. काशीहून त्यांची दिंडी पंढरपूरला नियमित येऊ लागली. ऐक्याचा हा ओघ अखंड वाहत राहिला.