Home » Blog » Jaffar Express Story: पाच मुलींचा बाप त्यांनी निर्दयीपणे मारला!

Jaffar Express Story: पाच मुलींचा बाप त्यांनी निर्दयीपणे मारला!

जाफर एक्सप्रेसमधील दोन दिवसांचा थरार…

by प्रतिनिधी
0 comments
Jaffar Express Story

बलुचिस्तान : डोंगराने वेढलेल्या त्या वैराण ठिकाणी दिवसभर गोळीबारांचे आवाज ऐकून प्रवासी थिजून गेले होते. आपण जिवंत बाहेर पडू, अशी कुणालाच शाश्वती वाटत नव्हती. काळोख गडद होऊ लागला. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए)चे हल्लेखोर निघून जाऊ लागले. त्यांनी एकमेकांना मिठ्या मारल्या. त्यांच्यापैकी ७० ते ८० लोक निघून गेलेही. २० ते २५ राहिले असावेत. (Jaffar Express Story)

…पण रात्री १०च्या सुमारास पुन्हा गोळीबार सुरू झाला. अंधाराचा फायदा घेत काही लोक पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. ते लक्षात येताच बीएलएच्या लोकांनी त्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. ते जागेवरच मरून पडले…

एका व्यक्तीला त्यांनी माझ्यासमोरच गोळ्या घातल्या. तो पाच मुलींचा बाप होता…

सुन्न करणारे ते दृश्य होते. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने हायजॅक केलेल्या जाफर एक्स्प्रेसमध्ये सुरू असलेला हा थरार मेहबूब सांगत होते. तेही याच ट्रेनने प्रवास करत होते. (Jaffar Express Story)

‘‘तुमच्या डोळ्यांसमोर जेव्हा एखाद्याची हत्या होते, तेव्हा तुम्ही काय करू शकता, तुमच्या हातात काय असते?’’, अशी हतबलता ते व्यक्त करतात.

‘‘माझ्या लहान मुली आहेत, मला मारू नका, अशी विनवणी चुलतभाऊ करत होता. मात्र त्यांनी (बीएलए) ऐकले नाही. त्याच्यावर निर्दयीपणे गोळ्या झाडल्या…’’ अल्लाहदित्ता हा आणखी एक प्रवासी सांगता होता.

मंगळवारी (११ मार्च) मेहबूब हुसेन ट्रेनने घरी जात होते. त्यावेळी गाडीच्या समोर स्फोट झाला.

मध्य पाकिस्तानच्या बोलन खिंडीत हा थरार घडत होता. परिसर इतका दुर्गम की येथे इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्क अजिबातच चालत नाही. स्फोटाच्या धडाक्यामुळे चालकाने गाडी थांबवली. पुन्हा गोळीबारांच्या फैरी झडू लागल्या. (Jaffar Express Story)

‘‘याच गाडीने मी प्रवास करत होतो, ’’ श्री. हुसेन सांगतात.

गाडीत सुमारे ४४० वर प्रवासी होते. क्वेटाहून पेशावरला ही गाडी जात होती. तेव्हा या अशांत बलुचि प्रांताच्या मध्यभागी सशस्त्र हल्लेखोरांनी ट्रॅकवर बॉम्बस्फोट केले, ट्रेनवर गोळीबार केला. नंतर डब्यांवरही हल्ला केला.

बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने तातडीने घेरावाची जबाबदारी स्वीकारली. ४८ तासांच्या आत बलुच राजकीय कैद्यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सोडले नाही तर गाडीतील प्रवाशांना ठार मारण्याची धमकी दिली.

बीएलएने या आधी या प्रदेशातील लष्करी छावण्या, रेल्वे स्थानके आणि गाड्यांवर हल्ले केले आहेत. मात्र अख्खी रेल्वे हायजॅक करण्याची ही पहिलीच घटना होती.

ही घेराबंदी ३० तासांहून अधिक काळ चालली. अधिकाऱ्यांच्या मते, आता ३०० प्रवाशांची सुटका करण्यात आली. ३३ बीएलए हल्लेखोर टिपण्यात आले. या धुमश्चक्रीत २१ओलीस प्रवासी आणि चार लष्करी कर्मचारी मारले गेले. अनेक प्रवाशांचा अद्याप पत्ता लागलेला नाही. ही बातमी बाहेरच्या जगासाठी होती. मात्र प्रत्यक्ष या थराराने प्रवाशांच्या जिवाचा थरकाप उडत होता…(Jaffar Express Story)

बुधवारी सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी पाकिस्तानचे निमलष्करी फ्रंटियर कॉर्प्स (एफसी)च्या सैनिकांनी बीएलए हल्लेखोरांवर गोळीबार सुरू केला, असे श्री. अल्लाहदित्ता सांगतात.

अचानक झालेल्या गोंधळात ते आणि इतर लोक सुखरुप सुटले.

‘‘फजरच्या अजानवेळी जेव्हा एफसीने गोळीबार केला तेव्हा आम्ही हल्लेखोरांच्या तावडीतून पळून गेलो,’’ असे ते म्हणाले.

एका पोलीस अधिकाऱ्यानेही ही घटना कथन केली. जेव्हा एफसीचा सैनिक डब्यात शिरला, तेव्हा हल्लेखोरांचे लक्ष ओलिसांवरून काही काळासाठी हटले.

पळून जाणाऱ्यांवर हल्लेखोरांनी गोळीबार केला. या पोलीस अधिकाऱ्याच्या साथीदाराला मागून गोळी लागली. (Jaffar Express Story)

‘‘जखमी अवस्थेत त्याने तू निघून जा असे सांगितले. मात्र मी नाही म्हटले. मी तुला माझ्या खांद्यावर घेऊन जाईन, असे त्याला सांगितले. आमच्या मदतीला दुसरा एकजण धावला. आम्ही टेकड्या चढून खाली आलो आणि गोळीबाराच्या रेंजच्या बाहेर गेलो,’’ काही मिनिटांसाठी हा थरार त्यांच्यापुढे अक्षरश: मृत्यू घेऊन आला होता.

मेहबूब, अल्लाहदिता, पोलिस अधिकारी आणि त्यांचे साथीदार हे सर्वजण एफसीने हल्लेखोरांना वेढल्यानंतर जिवंत पळून जाण्यात यशस्वी झाले. (Jaffar Express Story)

लष्करी आणि निमलष्करी दलाच्या सैनिकांनी हेलिकॉप्टरच्या मदतीने मंगळवारपासून अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी अथक प्रयत्न केले. त्यांनी ट्रेनला वेढा देत बुधवारी सर्व हल्लेखोरांना टिपले. आणि घटनास्थळ रिकामे केले, असे लष्करी प्रवक्त्याने सांगितले. दोन दिवसांचा हा थरार अनेकांच्या मनावर आयुष्यभर कोरला गेला.
(सौजन्य : बीबीसी)

हेही वाचा :
अंतराळवीर सुनीता विल्यम्सचा परतीचा प्रवास सुरू होणार
डॉक्टरसह कुटुंबाने घेतला गळफास

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00