बलुचिस्तान : पाकिस्तानात रेल्वे हायजॅक करणाऱ्या सर्व बलुची बंडखोरांचा खात्मा पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केला. बंडखोरांनी ओलीस ठेवलेल्या रेल्वे प्रवाशांपैकी ३०० प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. मंगळवार (११ मार्च) पासून सुरक्षा दल आणि बंडखोरांदरम्यान जोरदार चकमक सुरू होती. ओलीस ठेवलेल्या प्रवाशांची सुटका करण्यासाठी सुरक्षा दलांनी बंडखोरांच्या दिशेने गोळीबार केला. या चकमकीदरम्यान काही ओलिसांना प्राण गमवावा लागला. (Jaffar Express rescue)
बंडखोरांनी रेल्वेतील महिला आणि मुलांचा वापर ढालीसारखा करत गोळीबार सुरू ठेवल्याने त्यांची सुटका करण्यात मर्यादा येत होत्या. मात्र पाकिस्तानच्या सुरक्षा दलाने याही परिस्थितीत तीनशेवर प्रवाशांची सुखरूप सुटका केली. गेले दोन दिवस सुरू असलेले हे ओलीसनाट्य संपल्याचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी बुधवारी संध्याकाळी घोषित केले. (Jaffar Express rescue)
बलुचिस्तानच्या बोलन जिल्ह्याजवळ दहशतवाद्यांनी मंगळवारी (११ मार्च) संध्याकाळी जाफर एक्सप्रेस या रेल्वेचे अपहरण केले. क्वेटापासून सुमारे १५७ किलोमीटर अंतरावर असलेल्या मशकाफ बोगद्याजवळ एक्सप्रेसवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर ४०० हून अधिक प्रवाशांना ओलीस ठेवले. यामध्ये असंख्य सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. या घटनेने पाकिस्तानात खळबळ उडाली होती.
सुरक्षा दलांनी रेल्वेप्रवाशांच्या सुटकेची मोहीम युद्धपातळीवर राबवली. त्यात आतापर्यंत सुमारे १५५ प्रवाशांना हल्लेखोरांपासून वाचवल्याचा दावा केला आहे. त्यात महिला आणि मुलांचा समावेश आहे, असे वृत्त सरकारी ‘रेडिओ पाकिस्तान’ने सुरक्षा सूत्रांच्या हवाल्याने दिले. (Jaffar Express rescue)
सुरक्षा सूत्रांनी असेही म्हटले आहे की सुरक्षा दलांनी आतापर्यंत २७ हल्लेखोर मारले आहेत तर उर्वरित हल्लेखोरांना ठार मारण्याची मोहीम सुरू आहे.
या धुमश्चक्रीत जखमी झालेल्या ३७ जणांना वैद्यकीय उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे.
“जाफर एक्सप्रेसवरील भ्याड हल्ल्यासाठी जबाबदार असलेले हल्लेखोर अफगाणिस्तानातील त्यांच्या सूत्रधारांच्या संपर्कात आहेत,” असे वृत्तही रेडिओ पाकिस्तानने दिले आहे.
हल्लेखोर आत्मघातकी
“रेल्वेतील निष्पाप ओलिसांच्या अगदी जवळ आत्मघातकी हल्लेखोर तैनात करण्यात आले आहेत. आत्मघातकी हल्लेखोरांनी स्फोटक जॅकेट घातले आहेत,” असे सुरक्षा सूत्रांच्या हवाल्याने वृत्त देण्यात आले. सुरक्षा दलापुढे आपला टिकाव लागणार नाही, याचा अंदाज आल्याने हल्लेखोर निष्पाप लोकांचा वापर मानवी ढाल म्हणून करत असल्याचे अहवालात म्हटले आहे. (Jaffar Express rescue)
त्यात असेही म्हटले आहे की आत्मघातकी हल्लेखोरांनी ‘‘तीन वेगवेगळ्या ठिकाणी महिला आणि मुलांना ओलीस ठेवले आहे.’’ त्यामुळे सुरक्षा दलांना कारवाई करतेवेळी अत्यंत सावधगिरी बाळगावी लागत आहे. (Jaffar Express rescue)
हा परिसर दुर्गम आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. तथापि, बोलन पासच्या धादर भागात ओलीसांना सोडवण्यासाठी मोठी कारवाई सुरू केली आहे, असे सुरक्षा दलांनी सांगितले. एकूण मृतांची संख्या अद्याप निश्चितपणे सांगता येत नाही, परंतु अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारात लोकोमोटिव्हचा चालक आणि आठ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह किमान १० जणांना आपले प्राण गमवावे लागले.
हेही वाचा :
या खेड्यात लोक करतात मूत्रदान!