Home » Blog » मध्य पूर्वेत युद्धाचा भडका! जगाचं टेन्शन वाढलं

मध्य पूर्वेत युद्धाचा भडका! जगाचं टेन्शन वाढलं

Iran Attacks Israel | इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा

by प्रतिनिधी
0 comments
Israel

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : ईराणने मंगळवारी (दि.१) इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागल्यामुळे मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ईराणने २०० क्षेपणास्त्रे डागल्याचे इस्रायलने म्हटले आहे, तर आपण ४०० क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा ईराणने केला आहे. इस्रायलवरील हल्ला ही आत्मसंरक्षणार्थ केलेली कारवाई असल्याचे इराणने सांगितले आहे, तर ईराणने फार मोठी चूक केली असून त्यांना जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा इस्रायलचे अध्यक्ष बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली आहे.

ईरानने मंगळवारी रात्री इस्रायलच्या तेल अवीव, जेरुसलेमसह इतर शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. ईराणने डागलेली १८० क्षेपणास्त्रे निकामी केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इस्रायली लष्कराने आपल्या सर्व नागरिकांना बंकरमध्ये लपण्याचा सल्ला दिला. ईरानचे सर्वोच्च नेते खोमनेई यांनी हल्ल्याचे आदेश दिले. हल्ल्यात मोसादचे मुख्यालय उद्ध्वस्य झाल्याचा दावा इराकी टीव्हीने केला आहे.

पाच महिन्यापूर्वी म्हणजेच एप्रिलमध्ये इराणने इस्रायलवर जवळपास ११० बॅलिस्टीक मिसाईल्स आणि ३० क्रूझ मिसाईल्सने हल्ला केला होता. त्या तुलनेत ताजा हल्ला अनेक पटींनी मोठा आहे. स्थानिक वेळेनुसार, रात्री पावणेआठच्या सुमारास (भारतीय प्रमाणवेळेनुसार, रात्री १० वाजून १५ मिनिटांनी) तेल अवीव आणि आसपासच्या परिसरामध्ये आकाशामध्ये काही क्षेपणास्त्रे दिसून आली.

दुसरीकडे आपला बदला पूर्ण झाला असून जोपर्यंत इस्रायल हल्ला करणार नाही, तोपर्यंत आपण पुढचे पाऊल उचलणार नसल्याचे ईराणने म्हटले आहे. त्याचवेळी आपल्या जमिनीवर कुणी हल्ला केला, किंवा हल्ला करणा-यांना मदत केली, तर त्यांनाही किंमत चुकवावी लागेल, असा अप्रत्यक्ष इशारा ईराणने अमेरिकेला दिला आहे.

ईराण आणि इस्रायलमधील युद्धाची शक्यता बळावत चालली असून यामुळे जगावर अण्वस्त्र हल्ल्याचे संघटही घोंघावत आहे. ईराणकडेही अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता असल्याचे म्हटले जाते, परंतु त्यासंदर्भातील अधिकृत नोंद नाही. इस्रायलवरील हल्ल्यानंतर ईराणचे सर्वोच्च नेते खोमनेई सुरक्षित अज्ञात स्थळी आहेत. आणखी काही दिवस ते सुरक्षित ठिकाणीच राहतील, असे सांगण्यात येते.

या हल्ल्यानंतर ईराण आणि इस्रायल यांच्यात मानसिक पातळीवरील युद्धही सुरू झाले असल्याचे पाहावयास मिळते. क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे इस्रायलचे मोठे नुकसान झाले असून त्यांची आयर्न डोम ही अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली अपयशी ठरल्याचा दावा ईराणकडून करण्यात येत आहे. तर जगातील सर्वश्रेष्ठ सुरक्षा प्रणालींमधील एक असलेल्या आयर्न डोमने इराणी क्षेपणास्त्रे निकामी केली आणि हवेतच मारून टाकली, असे इस्रायलने म्हटले आहे. या दाव्या- प्रतिदाव्यांवरून सोशल मीडियावर दोन्ही देशांच्या समर्थकांमध्येही तुंबळ लढाई सुरू असल्याचे पाहावयास मिळते.

इस्रायलवरील हल्ल्याचा मोठा परिणाम जागतिक बाजारपेठेवर झाला असून अमेरिकन आणि युरोपियन शेअर्सचे भाव वेगाने कोसळले. सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणा-या सोन्याच्या दराने उसळी घेतली असून ते २६०० डॉलर प्रतितोळा अशा विक्रमी किंमतीवर पोहोचले. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी मध्य पूर्वेतील या संघर्षाचा निषेध केला असून ही संघर्ष थांबला पाहिजे, असे म्हटले आहे.

अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्रायल-ईराण संघर्षाला विशेष महत्त्व आले आहे. अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हारीस यांनी इस्रायलच्या मागे ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली असून माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र आपण अध्यक्ष असतो, तर ही वेळच येऊ दिली नसती, असे म्हटले आहे.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00