– प्रा. विराज जाधव
निवृत्तीनंतर तुमच्या जीवनशैलीत कोणताही बदल न करता आणि वाढणाऱ्या महागाईदराचा विचार करून तुम्हाला आरामदायी जीवन जगण्यासाठी किती पैसे लागतील याचे कॅल्क्युलेशन कसे करायचे हे मागील लेखामध्ये पाहिले. या लेखात आपण या रक्कमेपर्यंत कसे पोहोचू शकतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सेवानिवृत्तीसाठी मोठी रक्कम जमा करायची असेल तर तुम्हाला आजपासूनच गुंतवणूक सुरू करावी लागेल. जी गुंतवणूक सुरू करणार आहात ती वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांमध्ये (ॲसेट क्लासमध्ये) गुंतवावी लागेल. याला मल्टीॲसेट पोर्टफोलिओ असे म्हणतात. यामध्ये म्युच्युअल फंड, मुदत ठेवी, सोने, रिअल इस्टेट म्हणजे मालमत्ता, इक्विटी म्हणजेच शेअर्स, बाँड्स आणि रोख रक्कम यांचा समावेश असू शकतो. या सर्व गुंतवणुकीतील एकूण वाढ तुम्हाला सेवानिवृत्ती निधी उभा करण्यासाठी उपयोगी पडेल. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविध ॲसेट क्लास असणे महत्त्वाचे आहे. आज आपण बघणार आहोत की फक्त म्युच्युअल फंडमधील इक्विटी फंडमध्ये एसआयपी (SIP) करून आपण सेवानिवृत्ती निधी कसा उभा करू शकतो.
मागील लेखामध्ये आपण अंदाज केला होता की तुम्ही आणखी २५ वर्षे काम करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला निवृत्त व्हायचे आहे. निवृत्तीनंतर तुम्ही आणखी २० वर्षे जगाल असे तुम्हाला वाटते. समजा, तुमचा सध्याचा मासिक खर्च ३०,००० रुपये आहे असे गृहीत धरून तुमची सध्याची जीवनशैली न बदलता आणि वाढणारा महागाई दराचा विचार करून भविष्यातील रुपयाचे मूल्याचे सूत्र वापरून आपण असे कॅल्क्युलेशन केले की निवृत्तीच्या वेळी सुमारे ४.३५ कोटी रुपये लागतील ज्याला सेवानिवृत्ती निधी असे म्हटले जाते. या रकमेपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याकडे २५ वर्षे आहेत आणि म्हणजे ३०० महिने आहेत.
या व्यतिरिक्त, आपल्याला आणखी काही गोष्टी गृहीत धराव्या लागतील:
- तुमच्याकडे नोकरी आहे जिथून तुम्हाला दर महिना पगार म्हणून रक्कम मिळते.
- निवृत्तीच्या वर्षापर्यंत ही नोकरी तुमच्याकडे असेल.
- तुम्हाला दरवर्षी पगारवाढ मिळेल.
- दरवर्षी जानेवारी महिन्यात तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक १० टक्क्यांनी वाढवत रहाल.
- इक्विटी म्युच्युअल फंडातील एसआयपी द्वारे केलेल्या गुंतवणुकीवर दरवर्षी १२ टक्के CAGR परतावा मिळेल.
हा जानेवारी महिना आहे आणि तुम्ही तुमची ३००० ची एसआयपी (SIP) करत आहात आणि तुम्ही ही रक्कम पुढील २५ वर्षे म्हणजे ३०० महिने काढणार नाही. आपण असे गृहीत धरले आहे की दरवर्षी जानेवारीमध्ये मासिक एसआयपीची रक्कम १० टक्क्यांनी वाढवू. याचा अर्थ असा की जी एसआयपी (SIP) पहिल्या वर्षी ३००० प्रति महिना होती ती दुसऱ्या वर्षी वाढून ३३०० प्रति महिना होईल. या कॅल्क्युलेशनप्रमाणे पाहिले तर २५ वर्षानंतर तुमच्याजवळ १.१८ कोटी रुपयांपर्यंत सेवानिवृत्ती निधी जमा झाला असेल.
महिन्याला ३००० ची गुंतवणूक तुम्हाला ४.३५ कोटी रुपयांपर्यंत नेऊ शकत नाही. मग आता काय करायचे? आपले लक्ष्य गाठण्यासाठी आपण काय केले पाहिजे? आपल्याकडे तीन मार्ग आहेत :
- तुम्हाला तुमचा कालावधी २५ वर्षांवरून ३० वर्षे किंवा ३५ वर्षांपर्यंत वाढवावा लागेल, परंतु नोकरीची इतकी वर्ष शिल्लक असतीलच असे नाही.
- आपण आपला परताव्याचा दर १२ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवू शकतो परंतु इक्विटी मार्केट मधून जास्त परताव्याची अपेक्षा करणे धोकादायक होऊ शकते.
- तुम्ही तुमची बचत म्हणजेच गुंतवणूक वाढवू शकता. याचा अर्थ असा आहे की आपण आपले जीवन आता थोडे संयम ठेवून जगले पाहिजे जेणेकरून आपल्याला भविष्यात आरामदायी जीवन जगता येईल आणि आपल्याला आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही. आपण हा पर्याय निवडू शकतो आणि त्यावर काम करू शकतो.
समजा आपण दरमहा एसआयपीची (SIP) रक्कम ३००० ऐवजी, दरमहा ६००० केली आणि दरवर्षी जानेवारीमध्ये ही रक्कम १५ टक्क्यांनी वाढवली तर २५ वर्षानंतर किती सेवानिवृत्ती निधी जमा होतो ते पाहू. या कॅल्क्युलेशनप्रमाणे पाहिले तर २५ वर्षानंतर तुमच्याजवळ ४.०६ कोटी रुपयांपर्यंत सेवानिवृत्ती निधी जमा झाला असेल ज्यासह तुम्ही निवृत्तीनंतरची २० वर्षे समाधानी आणि आरामदायक जीवन जगू शकता.
पण दरमहा ६,००० ची एसआयपी (SIP) करणे आणि दरवर्षी जानेवारीमध्ये ही रक्कम १५ टक्क्यांनी वाढवणे हे बऱ्याच लोकांसाठी, विशेषत: ज्यांनी नुकतेच त्यांचे करिअर सुरू केले आहे त्यांच्यासाठी कठीण काम वाटू शकते. तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात केली आहे आणि नुकतेच पैसे कमवायला सुरुवात केली आहे आणि अशा परिस्थितीत तुम्हाला सेवानिवृत्तीसाठी एवढी मोठी रक्कम गुंतवावी लागली तर ते योग्य वाटत नाही. मात्र यामुळे निराश होण्याची गरज नाही.
जर तुम्ही तुमची कारकीर्द नुकतीच सुरू करत असाल, तर तुमचे वय २४ किंवा २५ वर्षे असेल, याचा अर्थ असा की तुम्ही ६० व्या वर्षी निवृत्त झालात, तरीही तुमच्याकडे ३५ वर्षे शिल्लक आहेत. जर तुम्ही या ३५ वर्षांत दर महिन्याला फक्त २,००० ची एसआयपी सुरू केली तरी पण तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात सेवानिवृत्ती निधी जमा करू शकता.
जेवढ्या लवकर तुम्ही तुमची गुंतवणूक लवकर सुरू कराल तेवढे दोन मोठे फायदे तुम्हाला मिळतील ते म्हणजे कालावधी आणि संपत्ती. चांगला परिणाम मिळविण्यासाठी तुम्ही थोड्या प्रमाणात सुरुवात करू शकता आणि हळूहळू वाढवू शकता. पण जर तुम्ही तुमच्या करिअरच्या मध्यभागी असाल आणि तुम्हाला काही काळानंतर निवृत्त व्हायचे असेल, म्हणजे १० किंवा १५ वर्षांनी म्हणा, तर तुमच्याकडे कदाचित जास्त पैसे गुंतवण्याशिवाय फारसा पर्याय नाही. या संदर्भात तुम्ही आर्थिक सल्लागाराची देखील मदत घेऊ शकता.
ही सर्व चर्चा तुम्हाला आर्थिक नियोजनाचे महत्त्व कळावे, काही तत्त्वे समजावून सांगण्यासाठी होत आहे हे लक्षात ठेवा. म्हणूनच ते अगदी सोपे केले गेले आहे, अनेक मुद्दे विचारात घेतले नाहीत. उदाहरणार्थ, तुम्हाला कौटुंबिक मालमत्ता वारसाहक्काने मिळाली असेल ज्यातून तुम्हाला भाडे मिळत असेल, तुम्हाला कुठूनतरी पैसे मिळाले असतील, काही नोकऱ्यांमध्ये पेन्शन उपलब्ध आहे, तर काही नोकऱ्यांमध्ये पीएफ उपलब्ध आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तुमची निवृत्ती सुरळीत पार पडू शकते.
या लेखमालेचे उद्दिष्ट फक्त जनसामान्यामध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करणे आहे. इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड आणि तुम्ही त्यात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP द्वारे गुंतवणूक करू शकता. तथापि, गुंतवणुकीच्या इतर अनेक पद्धती आहेत आणि इतर अनेक प्रकारचे म्युच्युअल फंड देखील आहेत.म्हणूनच पुढील काही प्रकरणांमध्ये आपण म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबद्दल सखोल माहिती घेऊ आणि त्यात गुंतवणूक कशी करावी हे समजून घेऊ.