संपत पाटील; चंदगड : चंदगड मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी वेगवेगळे उमेदवार दिले. महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेश नरसिंगराव पाटील, भाजपचे चंदगडचे निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. महाविकास आघाडीच्या डॉ. नंदिनी बाभुळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून उमेदवारी दिल्याने त्यांच्या विरोधात बंड करत काँग्रेसचे अप्पी पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. त्यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. माघारीच्या दिवशी दोघांनीही माघार न घेतल्याने महायुती व महाविकास आघाडीतील बंडखोरी दोन्ही आघाड्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
शिवाजीराव पाटील यांना भाजपमधून उमेदवारी मिळेल, अशा विश्वास होता. त्यांनी निवडणुकीची तयारी केली होती. लोकसंपर्क ठेवत त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र, राज्य पातळीवर शिवसेना व राष्ट्रवादीत दोन गट पडून शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून अपेक्षेप्रमाणे राजेश पाटील यांच्या नावाला पसंती देण्यात आली. शिवाजीराव पाटील यांनी मागील २०१९ सारखी यावेळीही बंडखोरी केली. यातच त्यांना माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांचा पाठींबा असल्याने त्यांची बाजू भक्कम झाली आहे. सद्यस्थितीत मोठ्या गावांतील मतदारांवर भर दिला जात आहे.
येत्या १५ दिवसांत गावागावात पोहोचण्यासाठी त्यांनी यंत्रणा सक्रीय केली आहे. राजेश पाटील महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर ते मतदारांसमोर जात आहेत, महायुतीमध्ये असलेले संग्रामसिंह कुपेकर यांनी राजेश पाटील यांना पाठिंबा दिला आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपकडून लढताना संग्राम कुपेकर यांनी ३३,२१५ एवढी मते मिळवली होती. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीमधून डॉ. नंदिनी बाभुळकर यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीतील स्थानिक नेतेमंडळीकडून प्रारंभीपासून विरोध होता. याबाबत त्यांनी महागाव येथे त्यांना डावलून मेळावा घेत त्यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवत वरिष्ठांना कळविला होता. मात्र हा विरोध डालवून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अखेर डॉ. बाभुळकर यांना तिकीट मिळाल्याने त्यांच्या विरोधात काँग्रेसचे विनायक उर्फ अप्पी पाटील व गोपाळराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
गोपाळराव पाटील यांनी अर्ज माघारी घेत कार्यकत्यांशी केलेल्या चर्चेअंती अप्पी पाटील यांना पाठिंबा दिला. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर खांडेकर, बळीराजा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील व कॉम्रेड संपत देसाई यांनी त्यांना पाठिंबा जाहीर करत मताधिक्य देण्यासाठी कार्यकत्यांनी कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे अपक्ष अप्पी पाटील यांचे हात बळकट झाले आहेत. चंदगड मतदारसंघात मात्र सद्यस्थितीला पंचरंगी लढतीचे चित्र आहे.
२०१९ मध्ये पडलेली मते
- राजेश पाटील : ५५ हजार ५३८
- शिवाजी पाटील : ५१ हजार १७३
- विनायक पाटील : ४३ हजार ९७३