महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा १० गडी राखून पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत पुनरागमन करत १-१ अशी बरोबरी साधली आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात भारताचा १८० धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ३३७ धावा करत १५७ धावांची आघाडी घेतली. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारताचा दुसरा डाव १७५ धावांवर संपला. त्यामुळे सामन्यात विजय मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला अवघ्या १९ धावांचे लक्ष्य मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या उस्मान ख्वाजा आणि मॅकस्विनी यांनी विकेट न गमवता ऑस्ट्रेलियाला सामन्यात विजय मिळवून दिला. (IND vs AUS Test)
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर भारताचा पहिला डाव अवघ्या १८० धावांवर आटोपला. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर यशस्वी एलबीडब्ल्यू बाद झाला. त्याला खातेही उघडता आले नाही. यानंतर केएल राहुल आणि शुभमन गिल यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी झाली. स्टार्कने ही भागीदारी तोडली. त्याने राहुलला (३७) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर भारताचे फलंदाज ठराविक अंतरावर बाद झाले. विराट कोहली(७), शुभमन गिल (३१) आणि कर्णधार रोहित शर्मा (३) बाद झाला. यानंतर ऋषभ पंतने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, कमिन्सने त्यालाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पंतने २१ धावा केल्या. यावेळी भारताने १९ धावांत आपले चार फलंदाज गमवले.
यानंतर अश्विनने नितीश रेड्डीसोबत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सातव्या विकेटसाठी ३२ धावांची भागीदारी केली. स्टार्कने पुन्हा एकदा भारताला अडचणीत आणत अश्विनला (२२) धावा केले. हर्षित राणा आणि जसप्रीत बुमराह खाते न उघडताच बाद झाले. शेवटची विकेट म्हणून नितीश (४२) स्टार्कचा सहावा बळी ठरला. स्टार्कशिवाय पॅट कमिन्स आणि बोलंड यांना प्रत्येकी दोन बळी मिळाले. स्टार्कने ४८ धावांत सहा विकेट घेतल्या, हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. (IND vs AUS Test)
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३७ धावा केल्या. उस्मान ख्वाजाच्या रूपात बुमराहने ऑस्ट्रेलियाला पहिला झटका दिला. यानंतर मॅकस्विनी (३९), स्टीव्ह स्मिथ (२) आणि मार्नस लॅबुशेन (६४) बाद झाले. मॅकस्विनी आणि स्मिथला बुमराहने बाद केले, तर लॅबुशेनला नितीश रेड्डीने बाद केले. यानंतर दुसऱ्या सत्रात ट्रॅव्हिस हेडने ऑस्ट्रेलियासाठी निर्णायक खेळी केली. यावेळी त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले. यावेळी त्याने १४१ चेंडूत १७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १४० धावांची खेळी केली. मिचेल मार्श नऊ धावा करून बाद झाला, तर ॲलेक्स कॅरी १५ धावा करून बाद झाला. पॅट कमिन्सच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का बसला. बुमराहने पॅट कमिन्सला (१२) क्लीन बोल्ड केले. यानंतर मिचेल स्टार्कही (१८) बाद झाला. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या. यासह नितीश रेड्डी आणि अश्विनला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने शनिवारी १२८ धावांमध्ये पाच फलंदाज गमावले होते. यात यशस्वी जैस्वाल (२४), केएल राहुल (७), शुभमन गिल (२८), विराट कोहली (११) रोहित शर्मा (६) बाद झाले. भारताने आज सकाळी फलंदाजीला सुरूवात केली. परंतु, अवघ्या ४७ धावांत भारताने उर्वरित पाच फलंदाज गमावले. रविवारी ऋषभ पंतच्या रूपाने टीम इंडियाला पहिला आणि एकूण सहावा धक्का बसला. तो २८ धावा करून तंबूत परतला. अश्विन विशेष कामगिरी करू शकला नाही. तो सात धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हर्षित राणा खाते न उघडता कमिन्सचा बळी ठरला. नितीश रेड्डीने पुन्हा उपयुक्त खेळी खेळली. पण तो ४२ धावांवर बाद झाला. बोलंडने सिराजला हेडकरवी झेलबाद करून भारताचा डाव १७५ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार कमिन्सने पाच, तर बोलंडने तीन विकेट्स घेतल्या. तर, स्टार्कने दोन विकेट घेतल्या.
मालिकेतील तिसरा सामना १४ डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये खेळवला जाणार आहे.
Australia win the second Test and level the series.#TeamIndia aim to bounce back in the third Test.
Scoreboard ▶️ https://t.co/upjirQCmiV#AUSvIND pic.twitter.com/Tc8IYLwpan
— BCCI (@BCCI) December 8, 2024
हेही वाचा :
- असुनी नाथ
- महाराष्ट्रातील निकालाचे आकडे आश्चर्यकारक
- Maharashtra Assembly : सत्ताधाऱ्यांचे गुलाबी, भगवे फेटे; विरोधकांचा बहिष्कार