कोल्हापूर : प्रतिनिधी : सात वर्षाच्या बालकाचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. दत्तात्रय उर्फ मारुती तुकाराम वैद्य (वय ४५ रा. सोनाळी, ता. कागल) असे आरोपीचे नाव आहे. २०२१ मध्ये वरद रवींद्र पाटील (वय ७, रा. सोनाळी ता. कागल) याचा खून झाला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश के.बी. अग्रवाल यांनी ही शिक्षा सुनावली.(Imprisonment for life)
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सोनाळी गावातील वरद पाटील या बालकाचा खून झाला होता. मुरगूड पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी आरोपी दत्तात्रय उर्फ मारुती तुकाराम वैद्य याला अटक केली होती. त्याच्या विरोधात कोर्टात आरोपपत्र सादर झाल्यानंतर न्यायाधीश अग्रवाल यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यांनी दत्तात्रय वैद्य याला आजन्म कारावासाची शिक्षा दिली. आरोपीला फाशी द्यावी, अशी मागणी सोनाळी ग्रामस्थांनी केली होती.(Imprisonment for life)
गुन्ह्यातील फिर्यादी रवींद्र पाटील आणि आरोपी दत्तात्रय वैद्य हे मित्र आहेत. १७ ऑगस्ट २०२१ रोजी रवींद्र पाटील कुटुंबासमवेत मेव्हणे प्रथमेश म्हातुगडे यांच्या सावर्डे बद्रुक येथील घराच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी गेले होते. रवींद्र पाटील यांच्यासमवेत त्यांचा मित्र दत्तात्रय वैद्यही होता. वास्तुशांतीनिमित्त रात्री जेवणाचा कार्यक्रम सुरू असताना दत्तात्रय वैद्य याने वरदला गोड बोलून आनंदा धोंडीराम जाधव यांच्या शेतात नेले. तेथे त्याचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी वैद्य याने वरदचा मृतदेह गावाबाहेरील झुडुपात लपवून ठेवला. आपण हे कृत्य केले नाही असे भासवण्यासाठी त्याने वरदचा शोध सुरू केला.(Imprisonment for life)
वरदचे वडील, आई आणि नातेवाईकांनी शोध घेतला, पण वरद सापडला नाही. त्यानंतर त्यांनी मुरगूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्याद दिली त्यावेळी दत्तात्रय वैद्यही रविंद्र पाटील यांच्यासमवेत होता. तपास करत होते तेव्हा रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सावर्डे गावातील खडके गल्ली तालीम मंडळ चौकात एक लहान मुलगी आपल्या पाळीव कुत्र्याला फिरायला घेऊन गेली असता वरद आणि दक्ष माने खेळत होते. त्याच्यासोबत दत्तात्रय वैद्यही होता अशी माहिती चौकशीत समजली. त्यामुळे वैद्य याच्या विरोधात संशय बळावला. पोलिसांनी वैद्यला ताब्यात घेऊन चौकशी केला असता त्याने खुनाची कबुली दिली. या गुन्ह्याचा तपास मुरगूडचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे, उप निरीक्षक किशोरकुमार खाडे यांनी केला होता. वैद्य याला अटक करुन पोलिसांनी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्याची सुनावणी श्रीमती के.बी. अग्रवाल यांच्यासमोर झाली. या खटल्यात विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव आणि ॲड. विवेक शुक्ल यांनी काम पाहिले. या खटल्यात साक्षीदार म्हणून लहान मुलगी सुहासिनी लोहार, दक्ष माने यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी आरोपीला वैद्य याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.
हेही वाचा :
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी
सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा