दुबई : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत मालिकावीर ठरणाऱ्या जसप्रीत बुमराहने आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीतील अग्रस्थान कायम राखले आहे. नव्याने जाहीर झालेल्या क्रमवारीत बुमराहच्या खात्यात ९०८ गुण आहेत. कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीत भारताच्या रवींद्र जडेजा ४०० गुणांसह पहिल्या स्थानी आहे. (ICC Ranking)
या महिन्याच्या सुरुवातीस संपलेल्या बॉर्डर-गावसकर मालिकेमध्ये बुमराहने ३२ विकेट घेतल्या होत्या. या कामगिरीमुळे आयसीसीने डिसेंबरमधील ‘प्लेअर ऑफ दि मंथ’ म्हणूनही बुमराहची निवड केली होती. सध्याच्या क्रमवारीत ८५० गुणांचा टप्पा पार करणारा बुमराह हा एकमेव गोलंदाज आहे. त्याच्याखालोखाल दुसऱ्या स्थानी असणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सच्या खात्यात ८४१ गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेचा कॅगिसो रबाडा खात्यात ८३७ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. या क्रमवारीत बुमराहव्यतिरिक्त जडेजा हा एकमेव भारतीय गोलंदाज अव्वल दहामध्ये असून तो ७४५ गुणांसह नवव्या स्थानावर आहे. (ICC Ranking)
अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत जडेजा वगळता अन्य कोणत्याच भारतीय खेळाडूला अव्वल दहामध्ये स्थान पटकावता आलेले नाही. फलंदाजांच्या क्रमवारीत यशस्वी जैस्वाल आणि रिषभ पंत हे दोघे भारतीय पहिल्या दहामध्ये आहेत. जैस्वाल ८४७ गुणांसह चौथ्या, तर पंत ७३९ गुणांसह नवव्या स्थानावर आहे. इंग्लंडचा जो रूट पहिल्या स्थानावर असून त्याच्या खात्यात ८९५ गुण आहेत. (ICC Ranking)
सांघिक कसोटी क्रमवारीत भारत १०९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (वर्ल्ड चॅम्पियनशीप) अंतिम फेरीत स्थान पटकावणारे ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका हे संघ पहिल्या दोन स्थानांवर आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ १२६ गुणांसह पहिल्या, तर आफ्रिकेचा संघ ११२ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. वन-डे व टी-२० च्या सांघिक क्रमवारीत मात्र भारताच्या संघाने अग्रस्थान कायम राखले आहे. वन-डे क्रमवारीत भारताच्या खात्यात ११८, तर टी-२० क्रमवारीत २६८ गुण आहेत. (ICC Ranking)
हेही वाचा :
पंत बनला ‘लखनौ’चा कर्णधार