नवी दिल्ली : भारतीय संघाच्या जर्सीवरील लोगोबाबत आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची ग्वाही बीसीसीआयचे नवनियुक्त सचिव देवजीत सैकिया यांनी दिली. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या लोगोमध्ये यजमान देश म्हणून पाकिस्तानचा उल्लेख आहे. त्यामुळे, हा लोगो असणारी जर्सी भारतीय संघ परिधान करणार नाही, अशी भूमिका घेण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला होता. (ICC Guideline)
पाकिस्तानमध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही आयोजनापूर्वीच विविध मुद्द्यांमुळे गाजते आहे. भारताने ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्यामुळे तोडगा म्हणून भारताचे सामने दुबईमध्ये खेळवण्याचे निश्चित झाले. १६ किंवा १७ फेब्रुवारी रोजी पाकमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास भारताचा कर्णधार रोहित शर्मा उपस्थित राहण्याबाबतही अद्याप अनिश्चितता आहे. त्यातच, हा लोगोचा मुद्दा उपस्थित झाला होता. सैकिया यांनी मात्र हा वाद शमवण्याच्या दिशेने पाऊल टाकणारे विधान केले आहे. भारतीय संघ जर्सीवरील लोगोबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करेल, असे सैकिया म्हणाले. (ICC Guideline)
या स्पर्धेसाठी मागील आठवड्यातच रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जाहीर करण्यात आला होता. १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेमध्ये भारताचा सलामीचा सामना २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशशी होणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी या स्पर्धेत भारत व पाकिस्तान हे संघ आमनेसामने येतील. (ICC Guideline)
हेही वाचा :
बुमराह अग्रस्थानी कायम