Home » Blog » Bjp Politics: भाजपने काँग्रेसची जागा घेतली कशी?

Bjp Politics: भाजपने काँग्रेसची जागा घेतली कशी?

by प्रतिनिधी
0 comments

सार्थक बागची, आशिष रंजन : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीने घवघवीत यश मिळवले. यामध्ये भाजपचा संपूर्ण राज्यात असणारा प्रभाव दिसून आला. भाजपच्या प्रभावामध्ये हिंदुत्वाची विचारसरणी, कल्याकणारी योजना आणि प्रादेशिक नेत्यांबरोबर आघाड्या करण्याची व्यूहात्मक खेळी यांचे यश दिसून येते. (Bjp Politics)

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे, भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला मिळालेल्या यशामुळे मतदार आणि निरीक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला; त्याही पेक्षा महायुतीला मिळालेल्या जागांच्या संख्येवरून अनुभवी राजकीय विश्लेषक आणि राजकीय नेत्यांचाही अंदाज चुकल्याचे दिसून येते. भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांनी लढवलेल्या जागांच्या प्रमाणात विजयी जागांचे प्रमाण (स्ट्राइक रेट) खूपच अधिक असल्याचे दिसून आले. भाजपने ८५ टक्के स्ट्राइक रेटसह १३२ जागा जिंकल्या; शिवसेनेने ७२ टक्के स्ट्राइक रेटसह ५७, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ६९ टक्क्यांच्या स्ट्राइक रेटसह ४१ जागांवर विजय मिळवला.(Bjp Politics)

ओबीसींचे नियोजनपूर्वक एकत्रिकरण

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, किसान सन्मान निधी आणि यांसारख्या अन्य लोकप्रिय कल्याणकारी योजनांचा या विजयामध्ये निश्चितच वाटा आहे. त्याचबरोबर, राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना, त्याविरोधात महायुतीने ओबीसी मतदारांचे नियोजनपूर्वक आणि योग्यपद्धतीने एकत्रिकरण केले, त्याचे व्यवस्थापन केले, त्याचाही त्यांना फायदा झाला.(Bjp Politics)

‘शत प्रतिशत भाजप’ उद्दिष्टाच्या दिशेने

या लेखामध्ये आपण भाजपच्या महाराष्ट्रातील उदयाविषयी चर्चा करणार आहोत. काही वर्षांपूर्वी राजकीय विश्लेषकांकडून भाजपच्या प्रभावाचा उल्लेख ‘डळमळीत’ प्रभावी अशा पद्धतीने करण्यात येत होता. आता महाराष्ट्राच्या राजकारणावर भाजपची वज्रमूठ घट्ट झाली आहे, हेच दिसून येत आहे. निवडणुकीच्या दीर्घकालीन आकडेवारी पाहता, महाराष्ट्रातील सर्वांत प्रभावशाली पक्ष म्हणून भाजपने काँग्रेसचे स्थान पूर्णपणे हिसकावून घेतले आहे. त्यांनी त्यांच्या मित्रपक्षांना हिंदूत्व विचारधारेच्या छताखाली योग्य पद्धतीने आणले आहे. राज्याच्या राजकारणात भाजप पूर्णपणे वर्चस्ववादी असल्याचे दिसून येते. त्यामुळे, राज्यातील कोणत्याही विरोधी पक्षाला विचारधारा आणि राजकीय अवकाशामध्ये भाजपबरोबरच स्पर्धा करावी लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये ‘शत प्रतिशत भाजप’ हे उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने भाजपने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.(Bjp Politics)
महाराष्ट्रातील १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सात टक्के मते मिळाली होती. त्या तुलनेत गेल्या तीन विधानसभा निवडणुका पाहिल्या, तर भाजपला २५ टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. सन २०१४ मध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवत असतानाही २८ टक्के मतांपर्यंत पोहोचला होता. भाजपसाठी हा सर्वोच्च आकडा आहे. सन २०२४मध्ये भाजपला २७ टक्के मते मिळाली. त्यांनी निवडणूक लढवलेल्या जागांवरील मतांचे प्रमाण ५२ टक्के आहे. चार दशकांमध्ये राज्यात कोणत्याही पक्षाला एवढी मते मिळालेली नाहीत.

काँग्रेस सिस्टिमचा प्रभाव
भाजपच्या प्रभावाचा विचार करताना, एका नव्या प्रतलावरही भाजपने प्रभावाचे नवा टप्पा गाठल्याचे दिसून येते. त्यामध्ये राज्यात पूर्वी प्रभावी असणाऱ्या पक्षाची सध्याची अवस्था काय, हे पाहणेही गरजेचे आहे. राजकीय विश्लेषक रजनी कोठारी यांनी ‘काँग्रेस सिस्टीम’ ही संकल्पना मांडली होती. देशातील काही राज्यांबरोबरच महाराष्ट्रामध्येही ‘काँग्रेस सिस्टीम’ प्रचंड प्रभावी असल्याचे म्हटले होते. यामध्ये प्रभावशाली राजकीय नेत्यांना राज्यातील योग्य स्थानांवर प्रस्थापित करता येऊ शकते. त्यामुळे, देशभरात पक्ष संघटनेमध्ये अनागोंदी असली, तरीही महाराष्ट्राच्या सत्तेवरील काँग्रेसची पकड कायम राहू शकत होती.
‘लास्ट फोर्ट्रेस ऑफ काँग्रेस डॉमिनन्स : महाराष्ट्र सिन्स १९९०’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकामध्ये राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर आणि राजेश्वरी देशपांडे यांनी याविषयी विश्लेषण केले आहे. त्यामध्ये ब्राह्मणेतर जनसमूह आणि ब्राह्मणेतर चळवळीचा पक्षामध्ये झालेला प्रवेश, जिल्हा स्तरावरील महत्त्वाकांक्षी नेत्यांना राज्यातील सत्तारचनेमध्ये मिळणारे स्थान, काळजीपूर्वक आखली जाणारी निवडणूक रणनीती, पक्षाबाहेरील नेते व कार्यकर्त्यांना आकर्षित करण्याची क्षमता, कल्याणकारी योजनांचा समतोल साधणारी धोरणे आणि समाजातील वंचित घटकांच्या हिताचा विचार करणारे धोरण यांचा विचार करण्यात येत होता. तसेच, पक्षाचा राजकीय-आर्थिक प्रभाव जनतेच्या राजकीय आकांक्षा आणि स्पर्धात्मक राजकारणाच्या बंधनांचे मिश्रणांतून बहुजन समाजाची विचारधारा आकाराला आली होती.(Bjp Politics)

काँग्रेसची घसरण, भाजपचा चढता आलेख

काँग्रेसच्या प्रभावाचा विचार करताना, १९८५मधील विधानसभा निवडणुका सर्वांत महत्त्वाच्या आहेत. त्या निवडणुकीत काँग्रेसला ४४ टक्के मते मिळाली होती. त्याचबरोबर काँग्रेसला १००पेक्षा जास्त जागा मिळालेली ती अखेरची निवडणूक होती. त्यानंतर पक्षाची घसरण सुरू झाली आणि केवळ २००४मध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली. त्यानंतर काँग्रेसला कधीही ४० टक्क्यांपर्यंतच्या आकड्याच्या जवळही जाता आलेले नाही. सन २००४मधील लोकसभा निवडणुकीमध्ये, निवडणूक लढवलेल्या जागांवर काँग्रेसला ४० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली होती. त्याउलट, २०१४नंतर सातत्याने भाजपच्या मतांमध्ये वाढ होत असून, २०२४मध्ये भाजपने ५० टक्क्यांचा आकडाही पार केला. सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला निवडणूक लढवलेल्या जागांवर ४५ टक्के मते मिळाली, तर या वेळी त्यामध्ये सात टक्क्यांची वाढ झाली. भाजपला २०१४मध्ये १२२, २०१९मध्ये १०५, तर २०२४मध्ये १३२ जागा मिळाल्या आहेत. या सलग निवडणुकांमध्ये भाजपने १०० जागांचा टप्पा पार केला आहे.(Bjp Politics)
राज्यातील काँग्रेसचा एकेकाळचा प्रभाव आणि आता भाजपचा सत्तास्थापनेसाठीचा मार्ग यांमध्ये काही समानता असून, काही फरकही आहेत.

मराठा वर्चस्वाला आव्हान
भाजप हा पूर्वी व्यापाऱ्यांचा, उच्चवर्णीयांचा आणि शहरी मतदारांचा पक्षा म्हणून ओळखला जात होता. आता भाजप संपूर्ण राज्यात पसरला असून, सर्व जातींमध्ये भाजपचे मतदार आहेत. यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील हिंदूत्वाचे राजकारण आणि ओबीसींमधील कमी प्रभावशाली जातींचे ध्रुवीकरण या दोन घटकांचा खूप मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातील राजकारणावर मराठा समाजाचे वर्चस्व होते. या प्रभावाविरोधात वसंतराव भागवत यांनी कमी प्रभाव असणाऱ्या माळी, धनगर, वंजारी या जातींचे ‘माधव’ समीकरण मांडले. त्यातून राज्यात भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासारखे नवे नेते उदयाला आले आणि ते प्रभावशाली मराठा नेतृत्वाला आव्हान देऊ शकले.
याचबरोबर, भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये दीर्घकाळ युती होती. या स्थिर आघाडीचाही भाजपला फायदा झाला. त्यामुळे भाजपला हिंदूत्वाच्या राजकारणाचा प्रसार करताना, राज्याच्या राजकारणात अस्तित्व वाढविणे आणि ग्रामीण भागामध्ये मतपेढी वाढविण्यासाठी फायदा झाला. शिवसेनेचा मराठवाड्यात प्रभाव होता, तर उत्तर महाराष्ट्र व विदर्भामध्ये भाजपचा प्रसार झाला होता. दोन्ही पक्षांना हिंदूत्वाच्या प्रसारासाठी मदत होणार होती. सन २०२४च्या निवडणुकीत भाजपला त्यांच्या जुन्या बालेकिल्ल्यांमध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्र व विदर्भामध्ये पुन्हा घवघवीत यश मिळाले.

पवारांच्या बालेकिल्ल्यातही यश
पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. या भागातही भाजपला दुहेरी आकडा गाठता आला, हे भाजपचे मोठे यश मानावे लागेल. अजित पवार यांच्या साथीने त्यांना हे यश मिळवता आले. मराठवाड्यामध्ये भाजपला यश मिळाले, त्याचे प्रमाण कमी-जास्त असले, तरीही मराठा आरक्षणाची चळवळ या भागामध्ये प्रभावशाली असताना आणि त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसलेला असताना, मिळालेले हे यश महत्त्वाचे मानता येईल.

‘डीएमके’ आणि ‘मामू’ समीकरणे
काँग्रेस आणि भाजप यांच्या यशातील मुख्य फरक म्हणजे हिंदूत्वाच्या विचारसरणीवर मिळालेले निवडणुकीतील यश. बहुजन समाजाची विचारसरणी ही काँग्रेसच्या प्रभावाच्या केंद्रस्थानी होती. काँग्रेसचे मोठे नेते यशवंतराव चव्हाण यांनी या विचारसरणीचा प्रसार केला होता. यामध्ये काही भागांमध्ये दलित, मुस्लिम, कुणबी (डीएमके) या समाजांना एकत्र आणले होते, तर काही भागामध्ये मराठा, आदिवासी, मुस्लिम (मामू) समाजांचे समीकरण तयार झाले होते. ब्राह्मणेतर विचारसरणीतून ही समीकरणे तयार झाली होती आणि ब्राह्मण समाजाच्या विरोधामध्ये या विस्तृत सामाजिक समीकरणांची निर्मिती झाली होती. त्याउलट, भाजपची विचारसरणी हिंदूत्वाची आहे. यामध्ये हिंदू दलित, ओबीसी, ब्राह्मण आणि मराठा समाजासारख्या प्रभावशाली जाती आहेत. यामध्ये मुस्लिम आणि आदिवासींचा समावेश नाही. हे दोन्ही समाज आजही काँग्रेसच्याच पाठीशी आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आदिवासी समाजापर्यंत पोहोचणे आणि त्यांना विचारसरणीच्या चौकटीत आणणे, यासाठी समांतर प्रयत्न सुरूच आहेत. त्यामुळे, भाजपच्या मतपेढीच्या समीकरणांतून प्रामुख्याने मुस्लिम समाजाला बाजूला ठेवण्यात येते. सन २०१४पासूनच्या भाजपच्या वाढत्या प्रभावाच्या तिन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही. राज्यातील लोकसंख्येपैकी १२ टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे, त्यामुळे भाजपचा हा निर्णय चिंतेचा वाटतो. एमआयएमसारख्या पक्षांच्या प्रवेशानंतरही राज्याच्या विधिमंडळातील मुस्लिम समाजाचे प्रमाण कमी होत आहे, ही गोष्टही विसरून चालता येणार नाही. आता विरोधकांच्या राजकारणामध्ये मुस्लिमांना स्थान मिळाले नाही, तर मुस्लिमांचे प्रतिनिधित्व आणखी कमी होण्याची भीती आहे.

कल्याणकारी योजनांचा फायदा

कल्याणकारी योजना आणि सरकारी स्रोतांचे फेरवितरण या मुद्द्यांचाही भाजपच्या उदयामध्ये वाटा आहे, या गोष्टीकडे लक्ष वेधण्यात येते. दुष्काळी भागामध्ये २०१४ ते २०१९ या काळामध्ये जलयुक्त शिवार ही योजना राबवण्यात आली. २०२४मध्ये लाडकी बहीण योजना राबवण्यात आली. अशा योजनांमध्ये भाजपकडून कल्याणकारी योजनांचा वापर समर्थक मतदारांमध्ये वाढ करण्यासाठी परिणामकारकपणे केला. थेट लाभार्थ्यांपर्यंत फायदा पोहोचविणे आणि केंद्रीकृत वितरण व्यवस्था यांमुळे भाजपला लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे सोपे झाले, त्याचबरोबर त्यांचे रुपांतर भाजपच्या मतदारांमध्ये करता आले.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लाडकी बहीण योजना राबवली आणि एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावाची भूमिका बजावली, तर या योजनेचा फायदा भाजपला झाला. आता राज्याचे मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले आहे. भाजपकडून मतदार मजबूतपणे आपल्या बाजूने एकवटण्यासाठी प्रयत्न केले, त्यामध्ये तीन घटक महत्त्वाचे ठरले.

भाजपचे मज‘बूथ’ संघटन
यातील पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे भाजपचे राज्यातील मजबूत संघटन. यामध्ये बूथ स्तरावरील सूक्ष्मनियोजन उच्च दर्जाचे होते. ‘मेरा बूथ सब से मजबूत’ यांसारख्या मोहिमेमध्ये प्रत्येक बूथ शक्तिकेंद्र करण्याचा प्रयत्न झाला. त्यामध्ये बूथविस्तारकापासून पन्नाप्रमुखापर्यंत सर्वांनी भूमिका बजावली. त्यामुळे, पक्षाचे संघटन अभूतपूर्व स्तरापर्यंत विस्तारले. शिवसेनेचेही असेच कटिबद्ध असणारे केडर आहे, असा युक्तिवाद काही जण करू शकतात. मात्र शिवसेनेच्या भौगोलिक विस्ताराला मर्यादा आहेत. भाजपच्या राज्यभरातील विस्ताराशी त्याची तुलना होऊ शकत नाही. त्यातच भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या कार्याची जोड मिळाली. महाराष्ट्राचे राजकारण सर्वसाधारणपणे राजकीय नेते आणि त्यांच्या गटांच्या भोवती फिरत आले आहे. मात्र, भाजपने त्यात बदल घडवून आणला आणि पक्षकेंद्रीत संघटनेमध्ये ते बदलले.
प्रादेशिक नेत्यांचा समावेश
भाजपसाठी महत्त्वाचा असणारा दुसरा घटक म्हणजे त्यांनी दुसऱ्या पक्षातून आलेल्या प्रादेशिक नेत्यांना अतिशय यशस्वीपणे आपल्यामध्ये सामावून घेतले. काही वेळा आपल्याच पक्षामध्ये (विखे पाटील, अशोक चव्हाण किंवा मधुकर पिचड) आणि काही वेळा मित्रपक्षांमध्ये त्यांना सामावून घेतले. यातून भाजपला मराठा वर्ग आपल्या बाजूने वळवून घेण्यामध्ये यश आले. शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानसारख्या संघटनांच्या मदतीने ग्रामीण भागातील गरीब मराठा युवकांना हिंदूराष्ट्र निर्माण करण्यासारख्या विस्तृत मुद्द्यांवरून एकत्रित आणण्यात त्यांना यश आले. अंतिमतः त्यातून भाजपमध्ये व्यापक सामाजिक समीकरण निर्माण होण्यास मदत झाली.

अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण
यातील तिसरा आणि सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे भाजपचे राजकीय अर्थव्यवस्थेवर असणारे नियंत्रण आणि त्या नियंत्रणातून करण्यात आलेले राज्याच्या स्रोतांचे फेरवितरण. यातून निवडणुकीपूर्वी ओबीसी समाजातील सर्व छोट्या जातींसाठी विकास मंडळे देऊन त्यांना फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न भाजपने केला. अशाच पद्धतीने मराठा समाजातील तरुणांसाठीही भाजपने प्रयत्न केले. सन २०१४मध्ये भाजपची पहिल्यांदा सत्ता आली होती आणि त्या वेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या माध्यमातून नरेंद्र पाटील यांच्यासारख्या नेत्याला कॅबिनेट दर्जा दिला होता. या माध्यमातून निर्माण झालेल्या नेटवर्कचा उपयोग भाजपने आपल्या संघटनात्मक यंत्रणेच्या मदतीने घेतल्याचे दिसून येते.

स्थानिक नेते आणि भाजपच्या संघटनेत एकवाक्यता
स्थानिक नेते आणि भाजपचे मजबूत संघटन यांच्यामध्ये एकवाक्यता निर्माण झाली आणि त्याचा फायदा भाजपला झाला, याची दोन ठळक उदाहरणे पाहता येतील. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते व आठ वेळचे आमदार बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला. विखे-पाटील यांच्या स्थानिक नेटवर्कचा फायदा भाजपला झाला. दुसरीकडे नांदेड जिल्ह्यामध्ये सहकार, शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यांमध्ये अशोक चव्हाण यांचा मोठा प्रभाव आहे. त्यांच्या या ताकदीचा फायदा भाजपच्या संघटनेला झाला. या मतदारसंघातील लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला असला, तरीही सर्व सहा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी झाले. या जिल्ह्यातही भाजपचे संघटन महत्त्वाचे ठरले.

सामाजिक न्यायावर हिंदुत्वाची मात
भाजपची राज्याच्या सत्तेवर घट्ट पकड निर्माण झाली आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या भविष्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची ठरणार आहे. पूर्वी राज्याच्या स्रोतांवर असणारे नियंत्रण, व्यापक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी आणि प्रादेशिक नेत्यांमध्ये सत्तावाटप यांचे समीकरण काँग्रेसने साधले होते. भाजपच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये काही प्रमाणात त्यामध्ये साम्य दिसून येते. मात्र, काही मुद्द्यांमध्ये फरक दिसून येतो. पूर्वी सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर बहुजन समाजाचे राजकारण सुरू असायचे, आता हिंदूत्वाच्या मुद्द्यावर बहुजन समाजाचे सामाजिक एकीकरण करण्याचा प्रयत्न दिसून येतो. यातही व्यक्तीकेंद्री राजकारणावरून पक्षकेंद्री राजकारणामध्ये स्थित्यंतर झाल्याचे दिसून येते. ही गोष्ट महाराष्ट्रातील भविष्यातील राजकारणाचा स्वभावधर्म ठरविण्यासाठी निर्णायक ठरू शकते.

(सार्थक बागची अहमदाबाद विद्यापीठात सहायक प्राध्यापक आहेत.)

(आशिष रंजन डेल्स (डाटा ॲक्शन लॅब फॉर इमर्जिंग सोसायटीज) या संस्थेचे सहसंस्थापक आहेत.)

…………
फ्रंटलाइन नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या लेखाचा अनुवाद साभार. मूळ लेखाची लिंक :
https://frontline.thehindu.com/politics/maharashtra-assembly-election-bjp-mahayuti-victory-congress-hindutva-maratha-reservation-bahujan-samaj-ma-dha-va/article68963808.ece

हेही वाचा :

दोन्ही पवारांची भेट आणि मोदी-शाहांची असुरक्षितता
मंत्रीमंडळातील एकमेव अल्पसंख्याक मंत्री हसन मुश्रीफ

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00