नवी दिल्ली : प्रतिनिधी : अग्नीपूजनानंतर देशभर रंग, फुले उधळून होळी धुमधडाक्यात सुरू झाली आहे. राजकारणी, फिल्मी स्टार, खेळाडू सेलिब्रेटीसह सर्वसामान्य होळीत रंगले आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुण्यात रंगाची होळी खेळली जात असताना पश्चिम महाराष्ट्रात धुळवड साजरी केली जात आहे. धुळवडीसाठी मांसाहाराचा जंगी बेत आखला जात असल्याने मटण, चिकण, मासे खरेदीसाठी ग्राहकांच्या सकाळपासून रांगा लागल्या होत्या. (Holi Celebration)
गुरुवारी होळी प्रज्वलीत करुन सण साजरा झाला. ग्रामीण भागात पालख्या नाचवल्या गेल्या. कोकणात शिमग्याचा धुमशान सुरू होती. मुंबईहून आलेले चाकरमणी मोठ्या संख्येने आल्याने ग्रामीण भागात होळीचा रंग वेगळाच होता. पालखी नाचवण्याचा सोहळा पाहण्यासाठी गर्दी झाली होती. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पालखी नाचवली तर मंत्री उदय सामंत यांनी ताशा वाजवून होळीचा आनंद लुटला. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवडीचा सण असल्याने पश्चिम महाराष्ट्रात मासांहाराचा बेत सर्वत्र पहायला मिळाला. मटण, मासे, चिकन खरेदीसाठी मार्केटमध्ये ग्राहकांच्या रांगा लागल्या होता. (Holi Celebration)
मुंबई पुण्यासह देशभर रंग, फुले आणि आबिर उधळून होळीला सुरुवात झाली. सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. उत्तरभारतात ढोलाच्या तालावर रंग उधळून नृत्याचा आनंद सुरु होता. गल्लीबोळासह फॉर्म हाऊसवर होळीची धूम पहायला मिळाली. होळी आणि रमजान महिना एकत्र आल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. रासायनियक रंगाऐवजी इको फ्रेंडली रंग वापरावेत असे आवाहन करण्यात आहे. अनेक ठिकाणी फुलांच्या पाकळ्या, इको फ्रेंडली रंगाने होळी खेळली गेली. (Holi Celebration)
उत्तर प्रदेशातात मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये गोरख मंदिरात जाऊन होळीचा आनंद लुटला. मथुरा, वृंदावन आणि बरसाना येथे पारंपरिक होळी खेळण्यात आली. बरसानात लठमार होळी, मथुरा वृदांवनमध्ये फुलांची होळी खेळण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. राजस्थानमध्ये पारंपरिक होळीबरोबर शाही होळीचा थाटही पहायला मिळाला. शाही थाटाच्या होळीमध्ये विदेशी पर्यटकही सहभागी झाले होते. बिहारमध्ये ढोलक आणि मंजीरे या वाद्यावर थाप मारुन फगुआ गाणी गात रंगाची उधळण पहायला मिळाली. पंजाबमध्ये ढोलाच्या तालावर भांगडा नृत्य करत रंगाची मनसोक्त उधळण केली जात आहे. एकंदरीत संपूर्ण देशभर होळीचा माहोल दिसून आला. (Holi Celebration)
हेही वाचा :
‘बदलापूर’प्रकरणी एफआयआर का नाही?