कोलकाता : कर्णधार अंकित कुमारच्या शतकामुळे हरियाणाने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये मुंबईविरुद्ध पहिल्या डावात ५ बाद २६३ धावा केल्या. मुंबईचा पहिला डाव ३१५ धावांवर संपला असून दुसऱ्या दिवसअखेर मुंबईचा संघ ५२ धावांनी आघाडीवर आहे. (Haryana)
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने पहिल्या दिवशी ८ बाद २७८ धावा केल्या होत्या. शनिवारी ८५ धावांवर नाबाद असणारा तनुष कोटियन रविवारी शतक पूर्ण करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, सुमीत कुमारने त्याचा ९७ धावांवर त्रिफळा उडवला. कोटियनने १७३ चेंडूंमध्ये १३ चौकारांसह ९७ धावा केल्या. त्यानंतर, मोहित अवस्थी आणि रॉयस्टन डायस या अखेरच्या जोडीने मुंबईचे त्रिशतक पूर्ण केले. निशांत सिंधूने डायसला बाद करून मुंबईचा डाव संपवला. हरियाणातर्फे अंशुल कंबोज आणि सुमीत यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. (Haryana)
त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या हरियाणाला अंकित आणि लक्ष्य दलाल यांनी ८७ धावांची सलामी दिली. लक्ष्य ३४ धावांवर बाद झाल्यानंतर अंकितने यशवर्धन दलालसोबतही दुसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी रचली. अंकितने कर्णधारास साजेशी खेळी करत २०६ चेंडूंमध्ये १३६ धावा करताना २१ चौकारही ठोकले. त्याला हरियाणाच्या मधल्या फळीकडून मात्र अपेक्षित साथ लाभली नाही. अखेर ७० व्या षटकात शम्स मुलाणीने अंकितला बाद केले. खेळ थांबला, तेव्हा रोहित शर्मा २२, तर अनुज ठकराल ५ धावांवर खेळत होते. मुंबईकडून मुलाणी आणि कोटियन यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. (Haryana)
उपांत्यपूर्व फेरीच्या अन्य सामन्यांमध्ये, जम्मू आणि काश्मीरचा पहिला डाव २८० धावांत आटोपल्यानंतर केरळने दुसऱ्या दिवशी ९ बाद २०० धावा केल्या. केरळचा संघ अद्याप ८० धावांनी पिछाडीवर आहे. तिसऱ्या सामन्यात, विदर्भाने तमिळनाडूविरुद्ध पहिल्या डावामध्ये ३५३ धावा केल्या. विदर्भातर्फे करुण नायरने शतक झळकावताना २४३ चेंडूंमध्ये १८ चौकार व एका षटकारासह १२२ धावा फटकावल्या. प्रत्युत्तरादाखल दुसऱ्या दिवशी तमिळनाडूची अवस्था ६ बाद १५९ अशी झाली होती. विदर्भाकडे अद्याप १९४ धावांची आघाडी आहे. चौथ्या सामन्यात, सौराष्ट्राचा पहिला डाव २१६ धावांत संपल्यानंतर गुजरातने रविवारी ४ बाद २६० धावा करून ४४ धावांची आघाडी घेतली. (Haryana)
संक्षिप्त धावफलक : मुंबई – पहिला डाव ८८.२ षटकांत सर्वबाद ३१५ (तनुष कोटियन ९७, शम्स मुलाणी ९१, अजिंक्य रहाणे ३१, अंशुल कम्बोज ३-७१, सुमीत कुमार ३-८१) विरुद्ध हरियाणा – पहिला डाव ७२ षटकांत ५ बाद २६३ (अंकित कुमार १३६, यशवर्धन दलाल ३६, लक्ष्य दलाल ३४, शम्स मुलाणी २-५९, तनुष कोटियन २-५७).
हेही वाचा :