शारीरिक आरोग्याकडे लक्ष असलेच पाहिजे; मात्र त्याहीपेक्षा मानसिक आणि भावनिक आरोग्य राखणे अधिक गरजेचे आहे. याचे भान असायलाच हवे. सुटीचा खरा आनंद घेण्यासाठी याचे भान ठेवले पाहिजे.
सध्या सुट्यांचा हंगाम आहे. सुटी म्हटलं की मनात आपसुकच आनंदलहरी उमटत असतात. पण व्यक्तिपरत्वे या भावना बदलू शकतात. सोशल मीडियाचा प्रभाव आज इतका आहे की, काहीजणांना प्रत्यक्ष सामाजिक संवाद टाळायचा असतो. या परिस्थितीत ही कसरत कशी करायची, असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो.
अवास्तव अपेक्षा ठेवू नका
इतरांच्या सहकार्याने सुटीत भरपूर आनंद उपभोगायचा अशी अवास्तव अपेक्षा ठेवली तर कदाचित आपल्या पदरी निराशा येऊ शकते. सर्व गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे होतील, असे नाही. भेट देऊ ती ठिकाणे परिपूर्ण असतीलच असे नाही. अपेक्षाभंगाचे दुःख घेण्यापेक्षा संतुलित दृष्टिकोन ठेवला तर मानसिक स्वास्थ्य मिळायला मदत होईल.
सीमारेषा आखून घ्या
कौटुंबिक कार्यक्रमात नातेवाईकांसोबत एकत्र असणे कधीही चांगलेच असते. मात्र यावेळी होणाऱ्या सामाजिक संवादादरम्यान आपल्या सीमारेषा आखून घेणे कधीही चांगले. कारण रोजच्या ताणतणावातून सुटका करून चार आनंदाचे क्षण मिळावेत यासाठी आपण एकत्र आलेले असतो. अशावेळी निश्चितच शांततेची अपेक्षा असते. आपल्या कम्फर्ट झोननुसार सहकाऱ्याची निवड करावी जेणेकरून सोबतीचा त्रास होणार नाही.
संवादी रहा
संवादी राहणं कधीही चांगले. कुटुंब आणि मित्रांशी बोलण्यामुळे भावनातिरेक संतुलित राहतो. संभाषण सुरू ठेवल्यामुळे बदलत्या वातावरणाशी जुळवून घेता येते. एखाद्याच्या हितसंबंधांबद्दलच्या संभाषणांत गुंतल्याने आरामदायक वातावरण तयार होऊ शकते आणि आत्मविश्वास वाढू शकतो. तसेच, परस्परसंवादामुळे संबंध दृढ होतात. तणाव आणि चिंतेपासून काही काळ का होईना मुक्ती मिळते. त्यामुळे मनही प्रफुल्लित राहते.
लिमिटेड कोड्रिंक्स
मित्रमंडळी किंवा नातेवाईक एकत्र आले की कॅफीन, अल्कोहोल आणि धूम्रपान या सामान्य बाबी आल्याच. पण त्यांचा अतिरेक चिंतेत भर टाकू शकतो. असे उत्तेजक घटकांचे सेवन मर्यादित ठेवा. त्यामुळे मज्जासंस्थेचे काम सुरळीत चालते. धोका कमी होतो. केमिकलविरहीत खाद्यपदार्थ आणि पेये यांचा समावेश केल्याने मन शांत राहते, शरीराला आराम मिळतो.
तुलना टाळा
इतरांशी तुलना करण्याची सवय आपल्याच मुळावर उठते. त्रास होतो. इतरांशी तुलना कधीच करू नये. इतरांशी तुलना टाळल्याने मानसिक आणि भावनिक सकारात्मकता वाढते. अपुरेपणाची भावना कमी होते. स्व-स्वीकृती ही चिंता व्यवस्थापन करण्याची गुरुकिल्ली आहे.
माइंडफुलनेसचा सराव
मनःशांतीसाठी आरामदायी आणि सजग सराव करावा. त्यामुळे मनावरील दडपण आणि तणाव कमी होतो. खोल श्वास घेण्यासारख्या सरावांमुळे गोंधळाची अवस्था कमी होते. सकारात्मकता वाढायला मदत होते.
सोबत हुशारीने निवडा
चहाचा कप उचलला आणि तोंडाला लावला, अशा पद्धतीने सोबती किंवा सहकाऱ्याची निवड करणं सोप्पं नसतं. आपल्या कम्फर्ट झोननुसार सूज्ञपणे सोबतीची निवड करायला शिकले पाहिजे. कारण एखाद्याच्या जास्त जवळ जाणं कदाचित त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे आनंददाची होण्यापेक्षा ती नकोशी वाटू शकते. मानसिक स्वास्थ्यापेक्षा अस्वास्थ्यच वाढते. त्यामुळे चाणाक्षपणे मित्र किंवा सहकारी निवडता आला पाहिजे.