नवी दिल्ली : लिंबू सरबत, कोकम आणि सोडा ही भारतीय पेय आजही लोकप्रिय आहेत. त्यातही गोटी (गोली) सोड्याचा विशिष्ट आवाज आणि चव बराच काळ जिभेवर रेंगाळत राहते. याच गोटी सोड्याने अमेरिका, ब्रिटनसह युरोप आणि आखातातही चांगलेच मार्केट घेतले आहे. (Goti Soda)
या देशांमध्ये हा गोटी सोडा चांगलाच भाव खात आहे. खानपानाची आवड असलेल्यांच्या जिभेचा कब्जाच या सोड्याने घेतला आहे, अशी परिस्थिती आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (APEDA) पारंपारिक भारतीय गोटी सोडा वेगळ्या पद्धतीने लाँच करण्याची घोषणा केली. त्याचे नाव गोली पॉप सोडा असे ठेवले आहे. पारंपरिक पद्धतीने वापरल्या जाणाऱ्या या पेयाला आजही प्रतिष्ठा आहे. त्याच्या नाविन्यपूर्ण पुनर्वितरणामुळे आणि धोरणात्मक आंतरराष्ट्रीय विस्तारामुळे जागतिक स्तरावर हा सोडा उल्लेखनीय पुनरागमन करत आहे.(Goti Soda)
फेअर एक्सपोर्ट्ससोबतच्या धोरणात्मक भागीदारीअंतर्गत, भारताने आखाती प्रदेशातील सर्वात मोठ्या रिटेल साखळ्यांपैकी एक असलेल्या लुलू हायपरमार्केटला गोटी सोड्याची डिलिव्हरी सुनिश्चित केली आहे, असे ‘अपेडा’ने म्हटले आहे.
“एकेकाळी घरगुती वापरात असलेले हे प्रतिष्ठित पेय, त्याच्या नाविन्यपूर्ण पुनर्वितरण आणि धोरणात्मक आंतरराष्ट्रीय विस्तारामुळे जागतिक स्तरावर उल्लेखनीय पुनरागमन करत आहे,” असे अपेडाने म्हटले आहे. या उत्पादनाने आधीच जागतिक बाजारपेठेत जोरदार प्रवेश केला आहे, अमेरिका, यूके, युरोप आणि आखाती देशांमध्ये तो चांगलाच लोकप्रिय झाला आहे.(Goti Soda)
४ फेब्रुवारी २०२५ रोजी एबीएनएनने आयोजित केलेल्या गोली पॉप सोडाच्या अधिकृत जागतिक लाँचिंग समारंभाला ‘अपेडा’ने पाठिंबा दिला. या कार्यक्रमाने उच्च-गुणवत्तेच्या उत्पादनांना चांगलेच प्रोत्साहन मिळत आहे.
शिवाय, अपेडाने १७ ते १९ मार्च २०२५ दरम्यान आयोजित ‘आंतरराष्ट्रीय अन्न आणि पेय कार्यक्रम (IFE) लंडन २०२५’ मध्ये गोली पॉप सोडा देखील सादर केला आहे.(Goti Soda)
या कार्यक्रमामुळे भारतीय उद्योजक आणि निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी व्यापारवृद्धी करता येणार आहे. तसेच नवीन व्यावसायिक सहकार्यांचा शोध घेण्यासाठी आणि जागतिक स्तरावर भारताच्या विविध कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी एक मौल्यवान व्यासपीठ उपलब्ध झाले.
जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनाची मागणी वाढल्यामुळे स्थानिक भारतीय चवीचे पदार्थ दिग्गज आंतरराष्ट्रीय उत्पादनांशी स्पर्धा करू शकतात, हे सिद्ध होत आहे. साहजिकच देशांतर्गत निर्यातीसाठी नवीन मार्ग खुले होत आहेत, हे स्पष्ट होते.
(इनपुट : द स्टेट्समन)
हेही वाचा :
नितीश यांच्या इफ्तार पार्टीवर मुस्लिम संघटनांचा बहिष्कार
कुणाल कामरांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी तोडफोड