नवी दिल्ली : प्रतिनिधी : सोन्याच्या दराला झळाळी आली आहे. बुधवारी (१९ फेब्रुवारी) सोन्याचा दहा ग्रॅमचा दर ८६ हजार ७३३ रुपयांवर पोचला. दहा ग्रॅम सोन्याच्या दरात १०४३ रुपयांची वाढ झाली. चांदीच्या दरातही वाढ झाली. एका किलोमागे १५४३ रुपये वाढ झाली आहे. चांदीचा प्रतिकिलो दर ९७ हजार ५६६ रुपयांवर पोचला आहे. एक जानेवारीपासून बुधवारअखेर दीड महिन्यात सोन्याच्या प्रति दहा ग्रॅम दरात १० हजार ५७१ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
३१ डिसेंबर २०२४ रोजी सोन्याचा प्रति दहा ग्रॅमला दर ७६ हजार १६२ रुपये होता. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम ८६ हजार ७३३ रुपयांवर पोचला आहे. हा दर सर्वोच्च दर आहे. इंडिया बुलियन ॲण्ड ज्वेलर्सने दिलेल्या माहितीनुसार, १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच्या दरात १०४३ रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर ८६ हजार ७३३ रुपयांप्रमाणावर पोचला आहे. यापूर्वी सोन्याचा दर ८५ हजार ६९० रुपयांपर्यंत होता. २२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम चा दर ७९ हजार ४४७ तर १८ ग्रॅमचा दर ६५ हजार ५० रुपये होता.
चांदीच्या दरातही प्रतिकिलो १५४३ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर प्रतिकिलो ९७ हजार ५६६ रुपयांवर पोचला आहे. काल चांदीचा भाव ९६ हजार २३ होता. यापूर्वी चांदीचा सर्वोच्च दर २३ ऑक्टोबर २०२४ झाला होता. त्यावेळी चांदीचा दर प्रतिकिलो ९९ हजार १५१ रुपयांपर्यंत पोचला होता.
यावर्षी सोन्याचा दर ९० हजार रुपयांपर्यंत पोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकन राष्ट्रपती ट्रम्प यांनी जे आर्थिक निर्णय घेतले आहेत त्याचा परिणाम शेअर बाजारावर पडला असल्याने गुंतवणूकदारांचा सोने खरेदीवरील विश्वास वाढला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला. महागाई वाढल्याने सोन्याच्या दरात वाढ होत आहे.
हेही वाचा :