ब्युनॉस आयरिस : भारताच्या विजयवीर सिधू आणि सुरुची सिंह या नेमबाजांनी आयएसएसएफ वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेमध्ये बुधवारी सुवर्णपदक जिंकले. या दोघांच्या सुवर्णयशामुळे या स्पर्धेत भारताने मिळवलेल्या सुवर्णपदकांची संख्या चारवर पोहोचली असून भारताने गुणतक्त्यात अग्रस्थानी झेप घेतली आहे. (Gold medal)
विजयवीरने २५ मीटर रॅपिड फायर पिस्टल प्रकारामध्ये पुरुष गटात सुवर्णपदक मिळवले. या प्रकारात त्याने प्राथमिक फेरीमध्ये ५७९ गुण मिळवून अंतिम फेरी गाठली. प्राथमिक फेरीअखेर तो तिसऱ्या स्थानावर होता. भारताचे गुरप्रीत सिंग (५७५ गुण) आणि अनीश (५७० गुण) अनुक्रमे दहाव्या व तेराव्या स्थानावर राहिल्याने अंतिम फेरी गाठू शकले नाहीत. त्यामुळे अंतिम फेरीत भारताच्या सर्व आशा विजयवीरवर होत्या. अंतिम फेरीमध्ये विजयवीरची सुरुवात संथ झाली. पहिल्या टप्प्याअखेर तो ९ गुणांसह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी होता. दुसऱ्या एलिमिनेशन टप्प्यामध्ये मात्र त्याने खेळ उंचावला. या टप्प्याअखेर २९ गुणांची कमाई करत त्याने सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याने इटलीच्या रिकार्डो मॅझेटीला केवळ एका गुणाने मागे टाकले. मॅझेटीला २८ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर चीनचा युहाओ यँग २३ गुणांसह ब्राँझपदक विजेता ठरला. २२ वर्षीय विजयवीरचे हे पहिलेवहिले वर्ल्ड कप पदक आहे. (Gold medal)
महिला गटात १० मीटर एअर पिस्टल प्रकारामध्ये १८ वर्षीय सुरुचीने २४४.६ गुणांसह सुवर्णपदकावर नाव कोरले. या प्रकारात प्राथमिक फेरीपासूनच सुरुचीने आघाडी घेतली होती. प्राथमिक फेरीमध्ये ५८३ गुणांची कमाई करत सुरुची अग्रस्थानी राहिली. दोन ऑलिंपक पदके जिंकणारी मनू भाकेर, तसेच सुरभी राव या भारतीय नेमबाज प्राथमिक फेरीचा अडथळा पार करू शकल्या नाहीत. मनू व सुरभी या प्रत्येकी ५७४ गुणांसह प्राथमिक फेरीत अनुक्रमे तेराव्या व चौदाव्या स्थानी राहिल्या. अंतिम फेरीच्या पहिल्या टप्प्यामध्ये चीनच्या वेई क्विआन आणि रॅन्शिन जिआंग यांनी सुरुचीपेक्षा सरस कामगिरी केली होती. दुसऱ्या एलिमिनेशन टप्प्यामध्ये मात्र सुरुचीने अचूक लक्ष्यवेध घेत या दोघींनाही मागे टाकले. या टप्प्यातील चौदापैकी ११ शॉट्सवर सुरुचीने दहापेक्षा अधिक गुण मिळवले. अखेर वेई क्विआन २४१.९ गुणांसह रौप्य, तर रॅन्शिन जिआंग २२१ गुणांसह ब्राँझपदकाची मानकरी ठरली. (Gold medal)
भारताने या स्पर्धेत आतापर्यंत चार सुवर्ण, एक रौप्य व एक ब्राँझ अशी सहा पदके जिंकली आहेत. सुरुची व विजयवीरबरोबरच सिफत कौर समारा आणि रुद्रांक्ष पाटील या भारतीय नेमबाजांनीही या स्पर्धेत सुवर्णवेध घेतला आहे.
हेही वाचा :
विराट कोहली १३,००० पार