मुंबई : घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी अर्शद खान या व्यावसायिकाला गुन्हे शाखेने अटक केली. इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून त्याने ४६ लाख रुपये घेतल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या होर्डिंग दुर्घटनेत १७ जणांचा बळी गेला होता. (Ghatkopar Hording)
अर्शद खान हा गोवंडीतील व्यावसायिक आहे. इगो मीडियाचे संचालक भावेश भिंडे आणि जान्हवी मराठे यांच्याकडून एक कोटीवर रक्कम घेतली होती. या वर्षी जुलैमध्ये त्याचे नाव समोर आल्यापासून खान फरार होता. त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला होता. (Ghatkopar Hording)
खान याच्यावर इगो मीडियाचा संचालक भावेश भिंडे तसेच रेल्वेचे निवृत्त अधिकारी कैसर खालिद यांच्या कुटुंबीयांशी संबंध असल्याचा आरोप आहे.
इगो मीडियाच्या बँक खात्यांच्या आर्थिक ट्रेलची तपासणी करणाऱ्या एसआयटीला असे आढळून आले की, कथित बेकायदेशीर होर्डिंगचे व्यवस्थापन करणाऱ्या इगो मीडियाने २०२१ ते २०२२ दरम्यान १० वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ३९ व्यवहार झाले. त्याद्वारे ४६.५ लाख रुपये पाठवण्यात आले होते. नंतर हे पैसे अर्शद खानने घेतले होते. मात्र, आपण भिंडे यांना ब्रँडेड वस्तू आणि चष्मा पुरवल्याचे खान यांनी म्हटले आहे, त्यासाठी त्यांनी भिंडे यांच्याकडून पैसे घेतले होते. ही रक्कम खान यांच्या दोन जवळच्या नातेवाईकांनाही देण्यात आली आहे. मात्र ती का देण्यात आली ते स्पष्ट झालेले नाही.
रेल्वे मैदानाच्या हद्दीत लावलेल्या इगो मीडियाच्या मालकीचे होर्डिंग १३ मे रोजी जोराच्या वाऱ्यामुळे कोसळले. १२० बाय १४० आकाराच्या अवाढव्य होर्डिंगखाली चिरडून किमान १७ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच ७० हून अधिक जण जखमी झाले. पोलिसांनी आतापर्यंत भावेश भिंडे, जान्हवी मराठे, सागर पाटील आणि मनोज संघू या चौघांना अटक केली आहे.
हेही वाचा :
वकिलासह तिघांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू
विमान क्रॅश; १७९ प्रवासी ठार