मुलहेम : रक्षिता रामराज, तरुण मण्णेपल्ली या भारतीय बॅडमिंटनपटूंनी जर्मन ओपन स्पर्धेच्या अनुक्रमे महिला व पुरुष एकेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याचबरोबर मिश्र दुहेरीमध्येही भारताच्या ध्रुव कपिला-तनिशा क्रॅस्टो या जोडीने उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. (German Open)
महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत रक्षिताने हाँगकाँगच्या लो सिन यान हॅप्पी हिला २१-१७, २१-११ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. तिने हा सामना अवघ्या ३५ मिनिटांत जिंकला. उपांत्यपूर्व फेरीत रक्षितासमोर जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असणाऱ्या डेन्मार्कच्या मिला ब्लिचफेल्टचे खडतर आव्हान आहे.
पुरुष एकेरीत तरुण मण्णेपल्लीने आठव्या मानांकित कॅनडाच्या ब्रायन यँगला २१-१४, १५-२१, २१-१७ असा पराभवाचा धक्का दिला. ही लढत १ तास १ मिनिटे रंगली. पहिला गेम जिंकून तरुणने आघाडी घेतल्यानंतर यँगने दुसरा गेम जिंकत सामन्यामध्ये बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये यँग आघाडीवर असताना तरुणने कडवी लढत देऊन पिछाडी भरून काढली.(German Open)
अखेर हा गेम २१-१७ असा जिंकून तरुणने विजयावर शिक्कामोर्तब केले. उपांत्यपूर्व फेरीत तरुणची लढत फ्रान्सच्या तृतीय मानांकित तोमा पोपोव्हशी होईल. पोपोव्हने दुसऱ्या फेरीत भारताच्याच प्रियांशू राजावतवर १६-२१, २१-१८, २१-४ अशी मात करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. या सामन्यातील पहिला गेम जिंकून प्रियांशूने आश्वासक सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र, पोपोव्हने जोरदार पुनरागमन करत उर्वरित दोन गेम जिंकून ५५ मिनिटांमध्ये विजय निश्चित केला.(German Open)
मिश्र दुहेरीमध्ये ध्रुव-तनिशा जोडीला आठवे मानांकन आहे. दुसऱ्या फेरीत त्यांनी यजमान जर्मनीच्या जोन्स जॅन्सन-थक फाँग एनग्युएन या जोडीचा अवघ्या ३२ मिनिटांत २१-१०, २१-१९ असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत ध्रुव-तनिशा जोडीचा सामना चीनच्या जिया शुआन गाओ-मेंग यिंग वू या जोडीशी होईल.(German Open)
हेही वाचा :
पाकिस्तान-बांगलादेश सामना पाण्यात
केविन पीटरसन ‘दिल्ली कॅपिटल्स’चे ‘मेंटॉर’