प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज महाकुंभमेळ्यात कोट्यवधी भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. मात्र मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने हे पाणी प्रचंड घाण झाले आहे. या नदीतील पाण्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) राष्ट्रीय हरित लवादाला (एनजीटी) अहवाल सादर केला आहे. नदीच्या पाण्यात विष्ठेतील कोलिफॉर्म (मानवी आणि प्राण्यांच्या विष्ठेतील सुक्ष्मजंतू) जास्त असल्याचे आढळून आले आहे. (Ganga pollution)
‘द हिंदू’ ने दिलेल्या वृत्तानुसार प्रयागराजमध्ये मोठ्या संख्येने भाविक स्नान करत असल्याने विष्ठेचे प्रमाण वाढले आहे, असे ‘सीपीसीबी’च्या अहवालाचा हवाला देत एनजीटीच्या आदेशात म्हटले आहे. १४ जानेवारी २०२५ रोजी प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यास सुरुवात झाली आहे. आजअखेर मोठ्या संख्येने भाविकांनी प्रयागराजच्या पवित्र संगमावर स्नान केले आहे. उत्तर प्रदेश प्रशासनाने महाकुंभसाठी अत्याधुनिक साधनांचा वापर केला आहे. पण भाविकांची प्रचंड संख्या पाहता यंत्रणा कोलमडून गेल्याचे चित्र दिसून येत आहे. दीड महिन्याच्या महाकुंभ स्नानाची अंतिम पर्वणी महाशिवरात्रीला २६ फेब्रुवारी रोजी आहे. (Ganga pollution)
“ज्या ठिकाणी पाण्याचे नमुने घेतले त्याची चाचणी केली असता ते आंघोळीसाठी योग्य नाही असे आढळले आहेत. प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यादरम्यान, शुभस्नानाच्या दिवसासह, नदीत मोठ्या संख्येने लोक स्नान करत असल्याने, अखेर विष्ठेचे प्रमाण वाढले,” असे १७ फेब्रुवारी रोजीच्या एनजीटीला सादर केलेल्या सीपीसीबीच्या अहवालात म्हटले आहे. (Ganga pollution)
महाकुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेश प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी केली आहे. देश-विदेशातून भाविक प्रयागराजकडे येत आहेत. त्यामुळे फक्त पवित्र स्नानाच्या दिवशीच नव्हे तर प्रत्येक दिवशी लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे रेल्वे आणि प्रवासी वाहतूक कोलमडली आहे. प्रशासनाने प्रयागराज शहरात येणारे रस्तेही बंद केले आहेत. तरीही वीस ते पंचवीस किलोमीटर पायी चालत येऊन भाविक प्रयागराजच्या संगमावर आणि अनेक घाटावर स्नान करत आहेत. देशविदेशातील राजदूत, अधिकारी, अनेक राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधीसह व्हीआयपी मंडळी प्रयागराजमध्ये रोज येत आहेत. त्यामुळे प्रशासनावरील ताणही वाढत आहे.