कोल्हापूर : प्रतिनिधी : बनावट धनादेश आणि स्टॅम्प तयार करुन जिल्हा परिषदेला ५७ कोटीचा चुना लावण्याचा प्रयत्न एका कंपनीने केला आहे. जिल्हा परिषदेला फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ज्या खात्यावर ५७ कोटी रुपये जमा झाले होते ते खाते गोठवण्यात आले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (Fraud in ZP)
जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी कृष्णात लक्ष्मण पाटील (वय ५२ रा. नेर्ली, ता. करवीर) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एका अज्ञात व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांच्या खात्याचा बनावट धनादेश आणि स्टॅप बनवून धनादेशावर खोटी स्वाक्षरी करुन ५७ कोटी चार लाख ४० हजार ७८६ रुपये रक्कमेचा धनादेश फोकस इंटरनॅशनल, जीसीएसएसपी प्रायव्हेट लिमिटेड ट्रिनिटी यांच्या बँक अकाउंटवर जमा केला. ही प्रक्रिया १८ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी या कालावधीत घडली. (Fraud in ZP)
या कालावधीत जिल्हा परिषदेला सुट्टी होती. सुट्टीनंतर जिल्हा परिषद वित्त अधिकाऱ्याने बँकेचे स्टेटमेंट तपासले असता ५७ कोटींची रक्कम परस्पर दुसऱ्या खात्यावर जमा झाल्याचे लक्षात आले. त्यांनी ताबडतोब जिल्हा परिषदेतील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेकडे धाव घेतली. ज्या खात्यावर रक्कम झाली ते खाते केडीसी बँकेने गोठवले आणि परत रक्कम जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतर बँकेने या घटनेचा तपास करण्यासाठी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस उप निरीक्षक अभिजीत पवार या गुन्हाचा तपास करत आहेत. (Fraud in ZP)
या घटनेने जिल्हापरिषदेतील सावळा गोंधळ उघडकीस आली आहे. ५७ कोटीचा धनादेश परस्पर कंपनीच्या खात्यावर कसा जमा होतो असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्या कंपनीच्या खात्यावर धनादेश जमा झाला ती कंपनी कोणाचीही आहे याचा तपासही पोलिसांनी सुरू केला आहे.