कोल्हापूर : प्रतिनिधी : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत अखेरच्या बारा मिनिटात चार गोल झाल्यानंतर संध्यामठ तरुण मंडळ आणि झुंजार क्लब यांच्यातील सामना २-२ असा बरोबरीत राहिला. टायब्रेकरमध्ये संध्यामठ संघाने बाजी मारत झुंजार क्लबवर ५-४ अशी मात करत पुढील फेरीत प्रवेश केला. पाटाकडील तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर खेळवली जात आहे. (Football Match)
संध्यामठ आणि झुंझार क्लब यांच्यात सामन्यात पूर्वार्धात गोल होऊ न शकल्याने गोलफलक कोरा होता. सामना बरोबरीकडे झुकणार असे वाटत असतानाच ६९ व्या मिनिटाला झुंझार क्लबच्या स्वप्निल तेलवेकरने मैदानी गोल केला. बरोबरी साधण्यासाठी संध्यामठकडून चढायाचा धडाका वाढला असतानाच झुंझार संघाने ७७ व्या मिनिटाला दुसरा धक्का दिला. त्यांच्या सुजित आर.ने गोल केला. सामना झुंजार क्लब जिंकणार असे वाटत असताना सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला संध्यामठच्या खेळाडूंला डी मध्ये रोखल्याने पंचानी पेनल्टी किक बहाल केली. कपिल शिंदेने अचूक पेनल्टी मारत सामना २-१ अशा स्थितीत आणला. त्यानंतर पंचानी चार मिनिटे जादा वेळेची घोषणा केली. त्यामध्ये संध्यामठच्या अशिष पाटीलने झुंजार क्लबच्या गोलक्षेत्रात धडक मारत गोल करत सामना २-२ असा बरोबरीत आणला. (Football Match)
पूर्णवेळेत सामना बरोबरीत राहिल्यानंतर पंचानी टायब्रेकरचा अवलंब केला. संध्यामठकडून अशिष पाटील, विश्वजीत भोसले, दिग्विजय बसर्गे, श्रीधर परब, कपिल शिंदे यांनी गोल केले. झुंजार क्लबकडून सुजीत आर, अक्षय पाटील, समर्थ नवाळे, निखिल डकरे यांनी गोल केले. शाहू भोईटेचा फटका बदली गोलरक्षक कपिल शिंदेने रोखला. संध्यामठ संघांने हा सामना ५-४ अशा फरकाने जिंकला. (Football Match)
शुक्रवारचा सामना : खंडोबा तालीम मंडळ वि. पाटाकडील तालीम मंडळ ब, दुपारी ४.०० वा.
हेही वाचा :
लिव्हरपूलचा अपराजित ‘पीएसजी’ला धक्का
मुश्फिकूर रहीम वन-डेतून निवृत्त