मधुकर नेराळे यांच्या निधनामुळे तमाशा कला अभ्यासक, गायक तसेच तमाशा संघटक काळाच्या पडद्याआड गेला आहे. मधुकर नेराळे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे झाला. त्यांचे घराणे मूळचे ओतूरचे कार्डिले घराणे. त्यांच्या आजोबांचे कर्जतजवळील नेरळ येथे तेलाच्या व्यवसायानिमित्त दीर्घकाळ वास्तव्य होते. त्यामुळे नेराळे या आडनावाने त्यांचे घराणे ओळखले जाऊ लागले. मधुकर नेराळे यांच्या आई-वडिलांनी १९४५ साली मुंबईत येऊन लालबाग येथे भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. जुन्नर, नारायणगाव ही तमाशाची पंढरी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे मधुकर नेराळे यांचे वडील पांडुरंग यांना तमाशाची आवड निर्माण झाली. लालबाग मार्केटमध्ये मुख्य रस्त्याच्या बाजूला झाडाझुडपांची जागा भाड्याने घेऊन जागेची साफसफाई करून १९४९ पासून त्या जागेवर कनात लावून तमाशाचे खेळ सुरू केले. बहुसंख्य गिरणी कामगार असलेल्या या भागात न्यू हनुमान थिएटर उभे राहिले. सुमारे ४५ वर्षे हे न्यू हनुमान थिएटर संगीत बारीच्या तमाशा कलावंतांसाठी, ढोलकी फडाच्या तमाशा कलावंतांसाठी, लोककलावंतांसाठी आधार केंद्र बनले.
मराठी शालेय शिक्षण सुरू असतानाच पांडुरंग नेराळे यांनी आपल्या मुलाला शास्त्रीय गायनाची आवड आहे असे पाहून पंडित राजारामजी शुक्ला यांची गाण्याची शिकवणी लावली. १९५८ साली मधुकर नेराळे यांचे पितृछत्र हरपले. नाउमेद न होता त्यांनी न्यू हनुमान थिएटर सुरूच ठेवले. तिथल्या रंगमंचावर सर्व नामांकित तमाशा कलावंतांनी हजेरी लावली.
इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मधुकर नेराळे यांचे औपचारिक शिक्षण थांबले, तसेच शास्त्रीय गायनाचे शिक्षणही थांबले. नंतरच्या काळात मधुकर नेराळे यांनी न्यू हनुमान थिएटरच्या व्यवस्थापनासोबतच स्वतःला तमाशा कलावंत, संगीतबारी कलावंत, शाहिरी कलावंत यांच्या संघटनात्मक कार्यामध्ये स्वतःला झोकून दिले. तमाशा कला – कलावंत विकास मंदिर, अ. भा. मराठी शाहिरी परिषद, संगीतबारी थिएटर मालक संघटना, अ. भा. मराठी नाट्य परिषद, पवळा प्रतिष्ठान, शाहीर अमरशेख पुरस्कार समिती अशा वेगवेगळ्या संघटनांमध्ये पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केले.
जसराज थिएटर या स्वतःच्या नाट्य संस्थेमार्फत १९६९ साली मधुकर नेराळे यांनी वगसम्राट दादू इंदुरीकर आणि प्रभा शिवणेकर यांनी गाजविलेले वगनाट्य `गाढवाचं लगीन` रंगमंचावर आणले. त्याचे शेकड्यावर प्रयोग केले. गाढवाचं लग्न, आतून कीर्तन वरून तमाशा, राजकरण गेलं चुलीत, उदं ग अंबे उदं, एक नार चार बेजार अशी नाटके, लोकनाट्य त्यांनी रंगभूमीवर आणली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित तमाशा शिबिरांचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. रंगभूमी परिनिरीक्षण मंडळावर सदस्य म्हणून काम केले. यमुनाबाई वाईकर, सत्यभामाबाई पंढरपूरकर, पांडुरंग घोटकर, मधू कांबीकर, राजश्री नगरकर, छाया खुटेगावकर, लक्ष्मीबाई कोल्हापूरकर अशा अनेक कलावंतांना राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम सादर करण्याची संधी मधुकर नेराळे यांच्यातर्फे प्राप्त झाली. मुंबईत तमाशाची १९ थिएटर होती. ती सर्व बंद झाली. १९९५ साली न्यू हनुमान थिएटरही बंद झाले.
महाराष्ट्र शासनाचा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार, प्राचार्य पी. बी. पाटील सोशल फोरमचा शांतिनिकेतन पुरस्कार, सांगलीचा कर्मयोगी पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.