-प्रा. विराज जाधव
आपल्याकडे भरपूर शिकलेले लोक मोठ्या संख्येने आहेत. पण आर्थिक साक्षर लोकांची संख्या आजही खूप कमी आहे. भारतीय लोकसंख्येचा मोठा भाग अजूनही विमा संरक्षण, म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट; त्यातील सुरक्षित गुंतवणूक आणि त्यापासून मिळणारा लाभ यांपासून अनभिज्ञ आहे. ते वित्तीय नियोजनाच्या परिघाबाहेर आहेत.
नुकताच एका नामांकित कॉलेजमध्ये स्टॉक मार्केटमधील गुंतवणूक या विषयावर प्राध्यापकांसाठी आयोजित केलेल्या सेमिनारमध्ये बोलत होतो. बोलता बोलता आर्थिक साक्षरतेचा विषय निघाला. एक डॉक्टरेट प्राध्यापक चिडून उभे राहिले. म्हणाले, सर आपल्याकडील माणसं आर्थिक साक्षर नाहीत असं कसं तुम्ही म्हणू शकता ? महाशय खूप चिडलेले दिसत होते. त्यांना विचारलं, सर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करता का? प्राध्यापक म्हणाले, हो करतो. त्यांना म्हटलं, तुम्ही इन्व्हेस्ट केलेल्या कोणत्याही पाच स्टॉक्सची नावे सांगू शकाल का? ते म्हणाले की नाही मी स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाही.
मी निफ्टी आणि बैंकनिफ्टी फ्युचर आणि ऑप्शनमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. तेव्हा मला त्यांना सांगावे लागले की, निफ्टी आणि बैंकनिफ्टी फ्युचर आणि ऑप्शनमध्ये तुम्ही रोजची खरेदी विक्री करता त्याला इन्वेस्टमेंट म्हणत नाहीत तर ट्रेडिंग असे म्हणतात. मग त्यांना ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटमधला फरक समजावून सांगितला. मग कुठे ते महाशय शांत झाले. सांगण्याचा उद्देश हाच की आपल्याकडे भरपूर शिकलेले लोक मोठ्या संख्येने आहेत. पण आर्थिक साक्षर लोकांची संख्या आजही खूप कमी आहे. भारतीय लोकसंख्येचा मोठा भाग अजूनही विमा संरक्षण, म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट; त्यातील सुरक्षित गुंतवणूक आणि त्यापासून मिळणारा लाभ यांपासून अनभिज्ञ आहे.
ते वित्तीय नियोजनाच्या परिघाबाहेर आहेत. संपत्तीचा योग्य पद्धतीने उपयोग कसा करावा, हे समजण्याची क्षमता म्हणजे आर्थिक साक्षरता. नियमित उत्पन्नाच्या साहाय्याने काय काय करू शकतो ? जवळचे पैसे कोठे आणि कसे गुंतवायचे ? गुंतवणुकीला किती परतावा मिळू शकेल? इत्यादींबाबत जाणीव आणि जागरूकता असणे म्हणजे आर्थिक साक्षरता, पैसे कोठे व कसे खर्च करायचे आणि गुंतवायचे यांचे ज्ञान असणे म्हणजे आर्थिक साक्षरता. आर्थिक स्वावलंबनासाठी, जीवनशैली समृद्ध करण्यासाठी, भविष्यकालीन आर्थिक सुरक्षेसाठी; समाधानी जीवन जगण्यासाठी आर्थिक साक्षरतेची गरज आहे. चांगली आर्थिक साक्षरता वर्तमान जीवन सुखकर बनवून भविष्य सुरक्षित करते. आर्थिक साक्षरता ही चॉईस राहिली नसून काळाची गरज झाली आहे.
लहान-मोठ्या, स्त्री-पुरुष सगळ्यांसाठी ती महत्त्वाची असल्यामुळे आर्थिक साक्षरतेला पर्याय नाही. आर्थिक साक्षर नसलेली व्यक्ती उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक करते. नियोजनाअभावामुळे गुंतवणूक कमी होते. खर्च जास्त असतो. यातून कर्ज निर्माण होते, बँकेतील क्रेडिट स्कोअर कमी होतो. अशी व्यक्ती कर्जाच्या दुष्टचक्रात अडकत जाते.
बँकेत खाते उघडण्यापासून ते बचत करण्याची पद्धत, विविध प्रकारच्या कर्जाचे व्यवहार, करांमधील बचत, विमा प्रीमियम, गुंतवणुकीचे विविध पर्याय व त्यातून मिळणारा परतावा, शेअर्स खरेदी-विक्री, लाभांश, मंदीचे संधीत रूपांतर कसे करावे ? इत्यादीबाबत माहितीचा समावेश आर्थिक साक्षरतेत होतो. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटना, शासनाची धोरणे, आरबीआयचे निर्णय याचा आपल्या उत्पन्नावर, बचतीवर, गुंतवणुकीवर व गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्यावर थेट प्रभाव आणि परिणाम होत असतो. याची दखल घेऊन गुंतवणूक करणे गरजेचे आहे. बऱ्याच लोकांची नेहमी एक तक्रार असते की ही सर्व माहिती आम्हाला कुठे मिळेल, कोण देईल आणि आमच्या रोजच्या व्यापामधून एवढी माहिती मिळवत बसायला आणि त्याचे विश्लेषण करायला आमच्याकडे वेळ नाही.
अशा परिस्थितीत तुम्ही एखाद्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्या असे आवर्जून सांगेन. सर्वसामान्य नागरिक पैसा मिळविण्यासाठी खूप शारीरिक कष्ट उपसतो; पण त्यातून मिळणारा पैसा कसा उपयोगात आणावा ? कोठे गुंतवावा? यांचे त्याला फारसे ज्ञान नसते. देशाच्या विकासात मोठा वाटा असणारा स्त्रीवर्ग आर्थिक साक्षर झाल्यास त्या दोन कुटुंबे साक्षर करतात. त्या आर्थिक निर्णय स्वतः घेऊ लागतात. ग्रामीण व शहरी भागात अर्थार्जन करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण वाढत आहे. उत्पन्नाची गुंतवणूक योग्य ठिकाणी करण्यासाठी त्यांना आर्थिक साक्षरतेची गरज आहे. त्यामुळे बचत करणे, गुंतवणूक करणे, आर्थिक जोखीम कमी करणे, वित्तीय निर्णय संपूर्ण माहितीसह घेणे, आर्थिक व्यवहार सोपे करणारे आवश्यक ज्ञान व माहिती देणारी यंत्रणा शालेय जीवनापासूनच उपलब्ध करून देण्याची नितांत आवश्यकता आजच्या काळात आहे. औपचारिक शिक्षण आणि आर्थिक साक्षरता यांचा संबध अधिक दृढ झाल्यास आर्थिक साक्षरता ही संकल्पना अधिक यशस्वी होईल.