कोल्हापूर : प्रतिनिधी : फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेच्या वाटा जाणतेपणाने चोखाळाव्यात, यासाठी स्पार्क चित्रपट महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज व्यक्त केला. (Film festival)
शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए. फिल्म मेकिंग अभ्यासक्रमांतर्गत आजपासून दोनदिवसीय स्पार्क चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला. या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते. (Film festival)
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, कोल्हापूर ही भारतीय चित्रपटसृष्टीची जन्मभूमी आहे. हा वारसा जपण्याबरोबरच या ठिकाणी कालसुसंगत राहण्यासाठी फिल्म मेकिंगचा अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरू केला. चित्रपट क्षेत्राशी निगडित करिअरच्या आणि कौशल्याच्या वेगळ्या वाटा या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी खुल्या होतील. कमीत कमी साधनस्रोतांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त उत्तम काम करता आले पाहिजे. स्पार्क चित्रपट महोत्सवामध्ये कोल्हापुरात निर्माण होऊन विविध राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटविणाऱ्या लघुपट, माहितीपटांचा समावेश करण्यात आला आहे. या निमित्ताने या चित्रपटकर्त्यांशी संवादातून विद्यार्थ्यांना चांगले काम करण्याची प्रेरणा मिळावी आणि भविष्यात त्यांच्या हातूनही उत्तमोत्तम चित्रकृती घडाव्यात, अशी अपेक्षा आहे. फिल्म मेकिंगचे विद्यार्थीच या पुढील काळात सदर अभ्यासक्रमाचे खरे दूत असतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Film festival)
उद्घाटन सत्रात बी.ए. फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘मेटाफोर’ या लघुपटाचे सादरीकरण करण्यात आले. त्याचे कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. यावेळी अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर सह-समन्वयक दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांनी आभार मानले. (Film festival)
यावेळी डॉ. सुमेधा साळुंखे, डॉ. जयप्रकाश पाटील, माहिती अधिकारी वृषाली पाटील, दिग्दर्शक संजय दैव, रोहित कांबळे, राजेंद्र मोरे, मेधप्रणव पोवार, नितेश परुळेकर, स्वप्नील पाटील, अनिल वेल्हाळ, जयसिंग चव्हाण, चंद्रशेखर गुरव, विशाल कुलकर्णी, प्रशांत भिलवडे, अवधूत कदम, सागर वासुदेवन्, दादू संकपाळ, दिग्विजय कोळेकर, मतीन शेख यांच्यासह चित्रपट रसिक नागरिक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Film festival)
हेही वाचा :
कुसुमाग्रजांची कविता शाश्वत सत्य मांडणारी
प्रांत, भाषेची बंधने तोडून यशस्वी उद्योजक होणे शक्य
वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायला हवा