मुंबई : विशेष प्रतिनिधी : बदलापूरमधील मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा बनावट एन्काउंटर केल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने सोमवारी (७ एप्रिल) आणखी एक मोठा दणका दिला. या प्रकरणी सरकारच्या भूमिकेवर कडक ताशेरे ओढत संबंधित पाच पोलिसांवर तातडीने हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयडी) नेमण्याचे आदेशही दिले.(Fake encounter)
न्या. रेवती मोहिते- डेरे आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले.
सरकारच्या भूमिकेमुळेच आपल्याकडे हे आदेश देण्याशिवाय पर्याय उरलेला नसल्याचेही स्पष्ट करीत करताना त्याला आव्हान देण्यासाठी स्थगिती देण्याची विनंतीही फेटाळून लावली.
बदलापुरातील शाळेतील मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अक्षय शिंदेला गेल्या वर्षी ७ सप्टेंबरला तळोजा जेलमधून पोलिस व्हॅनमधून घेऊन जात असताना मुंब्रा येथे त्याचा एन्काउंटर करण्यात आला. बंदोबस्तातील पोलिसाची रिवॉल्व्हर हिसकावून त्याने गोळीबार केला. त्यामुळे प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात शिंदे मारला गेला असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. मात्र याबाबत ठाणे महानगर दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या चौकशी अहवालात हा बनावट एन्काउंटर असून त्यासाठी बंदोबस्तातील पाचही पोलिस जबाबदार असल्याचा अहवाल दिला होता. त्यानुसार उच्च न्यायालयाने याबाबत संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सरकारला दिले होते. (Fake encounter)
मात्र या प्रकरणाचा सीआयडीकडून तपास सुरू असल्याचे सांगून सरकारकडून विलंब लावला जात होता. तसेच मयत अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी खटला मागे घेण्याची लेखी विनंती न्यायालयात केली होती. मात्र कोर्टाने ती फेटाळून लावत सुनावणीवेळी ते हजर राहण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले होते. याप्रकरणी सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी न्या. रेवती ढेरे- पाटील व न्या.गोखले यांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
संबंधित पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे, असे नमूद करून हे प्रकरण आपल्याला चालवायचे नाही, त्यामुळे ते प्रकरण मागे घेण्याची विनंती अक्षय शिंदेंच्या आई-वडिलांनी केली होती. त्यामुळे हे प्रकरण आम्ही बंद करून शकलो असतो. हे प्रकरण बंद करणे आमच्यासाठी सोपे होते. परंतु, घटनात्मक न्यायालय म्हणून आम्ही शांत बसू शकत नाही किवा या प्रकरणाकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असे खंडपीठाने खडसावले. (Fake encounter)
सर्व कागदपत्रे एसआयटीकडे सोपवा
या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी मुंबई क्राईम ब्रँचचे सह पोलीस आयुक्त लख्मी गौतम यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करावी. तसेच राज्य गुन्हे अन्वेषण गुन्हे विभागाने आतापर्यंतच्या तपासाची सगळी कागदपत्रे एसआयटीकडे सोपवावीत, असे आदेशही न्यायालयाने दिले. (Fake encounter)
या पोलिसांवर होणार गुन्हा दाखल
दंडाधिकाऱ्यांनी अहवालात ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे, सहायक निरीक्षक नीलेश मोरे, हवालदार अभिजीत मोरे आणि हरीश तावडे, तसेच वाहन चालक सतीश खाटळ यांना शिंदेच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन तपास केला जाईल.
हेही वाचा :
मोदी सरकारचा सामान्यांना झटका
भ्रमाचा भोपळा फुटला; आता मोदी कुठायत?