संजीव चांदोरकर
२१ हजार रुपये गुंतवा आणि लाखो रुपये कमवा… (Facebook Fraud)
फेसबुकच्या फीडमध्ये सतत ह्याच योजनेच्या लिंक्स येऊ लागल्या आहेत. काहींनी फोन करून तर काहींनी मेसेज पाठवून हे काय सुरु आहे हे समजावून सांगण्याची विनंती केली होती.
पैसे मागणाऱ्या कोणालाही ज्यांच्याकडून पैसे घ्यायचे आहेत त्यांचा विश्वास कमवण्याचे महत्त्व माहीत असते. वरील योजनेच्या फेसबुक पोस्टवर हा विश्वास कमवण्यासाठी सगळे काही केले गेले आहे. (Facebook Fraud)
सुधा मूर्ती , नारायण मूर्ती , अजीम प्रेमजी यांचे चेहरे आहेतच. त्याचबरोबर त्यांची या योजनेची भलावण करणारी वाक्ये ऐकवली जात आहेत. त्यांच्या ओठांच्या हालचाली देखील मॉर्फ केल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडिया मधील एक मोठी बातमी त्यासोबत पुढे येते. कमेंट बॉक्समध्ये अनेक जण नावासहीत निवेदन करतात. मी या योजनेत पैसे गुंतवले आणि मला दुसऱ्या दिवसापासून अमुक पैसे मिळायला लागले असे सांगत आहेत. (Facebook Fraud)
क्वांटम एआय चा भूलभुलैय्या
भारतीयांची गरिबी दूर करण्यासाठी ही कल्पक योजना आखली गेली आहे असा दावा आहे. त्याला “क्वांटम ए आय” असे भारदस्त नाव दिले गेले आहे. हे तंत्रज्ञान स्वतःहूनच शेअर मार्केट मधील वेगाने भाव वाढणारे शेअर्स तुमच्यातर्फे खरेदी करते आणि विक्री करून तुम्हाला नफा मिळवून देते असे स्पष्टीकरण दिले जात आहे.
“वर्षभरात तुमच्या ठेवी दुप्पट करून देतो” वाल्या योजना गवतासारख्या उगवल्या आहेत. फक्त काही महिन्यांपूर्वी मुंबईत टोरेस कंपनीचा काही शे कोटींचा भ्रष्ट व्यवहार उघडकीस आला. डिजिटल युगात तर अशा फसवणूक करणाऱ्या योजनांचा पूर यायची भीती होती. ती सार्थ ठरत आहे. अतिशय कमी भांडवल घालून फेसबुक पेज बनवणे, वेबसाईट बनवणे, गुगल फॉर्म बनवणे घर बसल्या करता येते. (Facebook Fraud)
जेवढे लोक गळाला लागतील तो निव्वळ नफा. कारण काही काळाने दुकान बंद करून पळ काढायचा. देशातून पळून जायचे हे त्यांच्या डोक्यात स्पष्ट असते.
घामाच्या पैशाचे मोल
शंभर रुपये बाजूला काढण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात याची उजळणी प्रत्येकाने स्वतःशी करावी. आपल्या घामाच्या पैशाचे / बचतीचे मोल आपण नाहीतर अजून कोण जाणणार. खरेतर मोल पैशात मोजता येणारे नाही. (Facebook Fraud)
असे जर असेल तर या व अशा योजनांचे अर्थकारण, बिझनेस मॉडेल किंवा त्यातील फोलपणा समजून घेण्याची जबाबदरी छोट्या गुंतवणूकदारांची आहे. त्याचा शिक्षणाशी , किंवा फायनान्स विषयाच्या ज्ञानाशी काहीही संबंध नाही. अगदी कॉमन सेन्सवर आधारित प्रश्न उपस्थित करता येतील.
काही साधे प्रश्न
ही जी व्यक्ती / कंपनी मला मी घातलेले पैसे दामदुप्पट करून द्यायचे आश्वासन देत आहे. ती व्यक्ती / कंपनी स्वतःच्या पदरचे पैसे घालून माझी भर नक्कीच करणार नाही. मग कोठून आणत असेल पैसे ? (Facebook Fraud)
एकतर आपला विश्वास संपादन करण्यासाठी पहिले काही दिवस आपल्यासारख्या इतर कोणाकडून घेऊन आपल्याला देईल. मग आपण चक्रात अडकून अजून पैसे घालू आणि फसू. किंवा आपण ते पैसे कोठे तरी गुंतवत आहोत असे सांगेल. त्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या पैशातून आपल्याला पैसे देईल. पण कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक केल्यावर १०० टक्के एवढा नफा / परतावा मिळतो ?
असे प्रश्न मनात आले पाहिजेत. त्याच्या जोडीला आजूबाजूच्या लोकांशी बोलणे, घरातील स्मार्टफोन, इंटरनेट वापरू शकणाऱ्या मुलामुलींना यात सामील करून नक्की काय सुरु आहे, याची माहिती घेणे हे तर नक्कीच करता येईल. (Facebook Fraud)
केंद्रीय संस्थांची जबाबदारी
सतत खाली जाणारे राहणीमान टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी कोठूनही मिळतील तेथून चार पैसे जास्त मिळवण्यासाठी लोक जीव पाखडतात. तुटपुंज्या बचती हातात असलेले, नुकसान सोसण्याची जोखीम घेण्याची क्षमता नसणारे, नवीन अंगावर कोसळणारे डिजिटल तंत्रज्ञान अवगत नसणारे कोट्यवधी छोटे गुंतवणूकदार नागरिक असणाऱ्या आपल्या देशात आहेत. अशा देशात…..
….. सायबर गुन्हे / नागरिकांची फसवणूक होऊ न देण्याची जबाबदरी केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक, सेबी आणि संबंधित संस्थांनी पालकत्वाच्या भूमिकेतून अधिक सक्रियपणे / प्रोऍक्टिव्हली काम करण्याची नितांत आवश्यकता आहे. फक्त वित्त साक्षरता, सतर्कता अभियान चालवणे पुरेसे नाही.