अकोला/नांदेड : प्रतिनिधी : अकोला व नांदेड येथे निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या नावाखाली कर्नाटकात जोरदार वसुली सुरू झाली आहे. महाराष्ट्रात निवडणुका आहेत आणि कर्नाटकात वसुली होत आहे. या लोकांनी कर्नाटकातील दारू दुकानदारांकडून ७०० कोटी रुपये वसूल केले, असा आरोप करताना महाराष्ट्राला या घोटाळेबाजांचे एटीएम होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
मोदी म्हणाले, की जिथे काँग्रेसचे सरकार बनते, ते राज्य काँग्रेसच्या राजघराण्याचे एटीएम बनते. आजकाल हिमाचल प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक हे काँग्रेसच्या राजघराण्याचे ‘एटीएम’ बनले आहेत. येथील वसुली दुपटीने वाढली आहे. घोटाळ्यांच्या माध्यमातून निवडणूक लढवणारा काँग्रेस पक्ष निवडणूक जिंकल्यानंतर किती घोटाळे करेल याची तुम्ही कल्पना करू शकता. महाराष्ट्राचा आशीर्वाद भाजपवर आहे. महाराष्ट्रात आपल्याला अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल. महाआघाडीच्या बड्या घोटाळेबाजांचे महाराष्ट्र आम्ही एटीएम होऊ देणार नाही. महाराष्ट्राची सेवा करण्याचा आनंद वेगळाच आहे. केंद्रात माझे सरकार येऊन केवळ पाच महिने झाले आहेत. या पाच महिन्यांत आम्ही महाराष्ट्रात अनेक योजना सुरू केल्या आहेत.