Home » Blog » Doping Ban : यानिक सिनरवर तीन महिन्यांची बंदी

Doping Ban : यानिक सिनरवर तीन महिन्यांची बंदी

‘डोपिंग’प्रकरणी ‘वाडा’ची कारवाई स्वीकारली

by प्रतिनिधी
0 comments
Doping Ban

माँट्रियल : जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणारा इटलीचा टेनिसपटू यानिक सिनरला तीन महिने स्पर्धात्मक टेनिसपासून दूर राहावे लागणार आहे. उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी (डोपिंग) जागतिक उत्तेजक द्रव्य सेवन प्रतिबंधक संस्थेने (वाडा) केलेली तीन महिन्यांच्या बंदीची कारवाई सिनरने मान्य केली आहे. (Doping Ban)

इटलीच्या २३ वर्षीय सिनरच्या बंदीचा कालावधी ९ फेब्रुवारी ते ४ मे असा असेल. मागील महिन्यात सिनरने वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले होते. पुढील फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा १९ मेपासून सुरू होणार असून बंदीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सिनर त्यामध्ये सहभागी होऊ शकेल. मार्च, २०२४ मध्ये केलेल्या चाचणीत सिनरने क्लॉस्टेबॉल या बंदी घालण्यात आलेल्या उत्तेजक द्रव्याचे सेवन केल्याचे आढळले होते. याप्रकरणी, इंटरनॅशनल टेनिस इंटेग्रिटी एजन्सी (आयटीया) या संस्थेतर्फे मागील वर्षी ऑगस्टमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या समितीने सिनरला दोषमुक्त ठरवले होते. क्लॉस्टेबॉलमध्ये स्नायूबांधणीसाठी वापरण्यात येणाऱ्या मेटाबोलाइटचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे या समितीने सिनरवर कोणतीही कारवाई केली नव्हती. (Doping Ban)

आयटीयाच्या या निर्णयाविरुद्ध वाडाने मागील वर्षी सप्टेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे (कॅस) दाद मागितली होती. सिनरवर एक ते दोन वर्षांची बंदी घालण्यात यावी, अशी मागणी वाडाने केली होती. याप्रकरणी पुढील सुनावणी १६ व १७ एप्रिल रोजी होणार होती. तथापि, त्यापूर्वीच सिनरने तीन महिन्यांची कारवाई स्वीकारल्याने ही सुनावणी होणार नाही. या बंदीमुळे सिनर अमेरिकेतील इंडियाना वेल्स ओपन आणि मायामी ओपन या स्पर्धांमध्ये खेळू शकणार नाही. बंदीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ७ मेपासून रंगणाऱ्या इटालियन ओपन स्पर्धेत तो खेळू शकेल. (Doping Ban)

दरम्यान, जागतिक क्रमवारीत सिनर सध्या ११,८३० गुणांसह अव्वलस्थानी असून दुसऱ्या स्थानावरील अलेंक्झांडर झ्वेरेवपेक्षा त्याच्याकडे ३,००० हून अधिक गुणांची आघाडी आहे. झ्वेरेव ८,१३५ गुणांसह दुसऱ्या, तर स्पेनचा कार्लोस अल्कारेझ ७,५१० गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आगामी तीन महिन्यांत होणाऱ्या स्पर्धांमध्ये झ्वेरेव व अल्कारेझ यांनी प्रभावी कामगिरी केल्यास सिनरचे अग्रस्थान धोक्यात येऊ शकते.

हेही वाचा :

दहा महिन्याच्या वेळापत्रकाने खेळाडूंना दुखापती
दक्षिण कोरियाचा भारतावर विजय

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00