मुंबई : विशेष प्रतिनिधी : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेचे पडसाद गुरुवारी (२० मार्च) अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी याबाबत नेमलेल्या विशेष तपास पथकाच्या ( एसआयटी) अहवाल उघड करण्याचे मागणी करत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. तर ठाकरे गटाच्या आमदारांनी अहवाल सरकारने जाणीवपूर्वक दडपून ठेवला असल्याचे सांगत याप्रकरणी राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप केला. या विषयावरून दोन्ही सभागृहात जोरदार गोंधळ होऊन सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले.(Disha Salian)
विधान परिषदेत मंत्री गिरीश महाजन व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात आणि त्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब व भाजपाच्या चित्रा वाघ यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. परब यांनी मनीषा कायंदे या सरड्याप्रमाणे रंग बदलतात, त्यांना पाहून सरडाही लाजेल, संजय राठोड जयकुमार गोरे व किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या आरोपाची दाखले देत त्यावेळी चित्रा वाघ का गप्प होत्या? राठोडला मंत्रीपदावर पुन्हा कसे घेण्यात आले ? अशी विचारणा केली. (Disha Salian)
त्यावर चित्रा वाघ यांनी संतप्त होत राठोडना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्लीनचीट दिली होती. तुमच्यात हिम्मत असेल तर त्यांना जाऊन विचारा, असे आव्हान दिले. त्याचप्रमाणे तुमच्यासारखे ५६ जण पायात भिंगरी बांधून फिरवत असते, अशी आगपाखड केली. त्यांच्यातील वादामुळे सभागृह ह प्रचंड तापले होते.
२०२० मध्ये दिशा सलियन हिचा मृत्यू झाला होता. त्यामागे आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप राणे पिता- पुत्र आरोप करत होते. त्यावेळी दिशा सलियन हिचे वडील सतीश सलियन यांनी आपल्या मुलीचा मृत्यू अपघाती झाल्याचे सांगून त्यामध्ये राजकारण करून आम्हाला तोडू नका अन्यथा कोर्टात बदनामीबद्दल केस करू, असा इशारा दिला होता. राणेंच्या मागणीप्रमाणे त्यावेळी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी जून २०२२ मध्ये विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती. मात्र त्याचा अहवाल अद्याप सादर करण्यात आलेला नाही. तसेच सीबीआयनेही या प्रकरणी ठाकरे यांचा सहभाग नसल्याचा निर्वाळा दिला होता. मात्र आता देशाच्या वडिलांनी या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल करत आपल्या मुलीचा वर सामूहिक अत्याचार करून खून करण्यात आला असल्याची शक्यता वर्तवली आहे. (Disha Salian)
याप्रकरणी आदित्य ठाकरे, अभिनेता सूरज पांचोली व डिनो मोरेया, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर संशय व्यक्त केला असून त्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून करण्यासाठी उच्च न्यायालयात बुधवारी याचिका दाखल केली आहे. अधिवेशनात आज त्याचे पडसाद उमटणे साहजिकच होते विधानसभेत ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन ‘ अन्वये या विषयावर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये भाजपा सदस्य अमित साटम यांनी दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आणि प्रकरणी राज्य सरकारने तपासासाठी राज सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीची स्थापना होऊन दीड वर्ष होऊन गेले. मात्र अद्यापही तपास का पूर्ण झालेला नाही, त्याचा अहवाल केव्हा उघड करणार आहात ?अशी विचारणा केली तर मंत्री नितेश राणे यांनी याप्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करून चौकशी करण्याची मागणी केली.
त्यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबत न्यायालयात प्रकरण प्रलंबित असून न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. मात्र तपास केव्हापर्यंत पूर्ण होईल हे जाहीर करा अशी मागणी साटम यांनी केल्याने सभागृहात गदारोळ उडाला. ते म्हणाले, मुंबई ही स्वप्ननगरी आहे. याठिकाणी देशभरातून अनेक तरुण-तरुणी करिअर घडवण्यासाठी येतात. कोणी पॉवरफुल व्यक्ती असेल किंवा कोणी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहे, म्हणून अशी घटना दाबली जाणे चूक आहे. माझी शासनाला विनंती आहे की, डिसेंबर २०२२ मध्ये जी एसआयटी नेमली होती, त्यांनी काय चौकशी केली, काय निष्कर्ष समोर आला? दिशा सालियनच्या वडिलांनी चार मित्र, तत्कालीन मंत्री आणि मुंबईच्या महापौरांचे नाव घेतले. त्यामुळे याचे गांभीर्य वाढलेले आहे शासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करावी. (Disha Salian)
त्यामुळे विधानसभेचे कामकाज अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पंधरा मिनिटांसाठी तहकूब केले.
विधान परिषदेतील हाच विषय चर्चेचा ठरला पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनअन्वये याप्रकरणी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी मुद्दा उपस्थित केला. शिवसेनेच्या ॲड. मनीषा कायदे यांनी याबाबत आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात ठराव मांडला. त्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या सदस्यांची त्यांची खडाजंगी उडाली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्याला आक्षेप घेत प्रत्युत्तर दिले, तर मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यात बाचाबाची झाली. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी याबाबत मनीषा कायदे यांच्यावर टिकेची झोड उठवली. त्यांनी दोन वर्षांपूर्वी केलेले ट्विट सभागृहात वाचून दाखवले. भाजपा व राणे गँगचा बुरखा सीबीआयच्या निर्वाळ्यामुळे फाटला आहे. त्यांनी आता आदित्य ठाकरे यांचे नाक घासून माफी मागावी असे ट्विट केले होते, त्याचा आता आपल्या वरिष्ठांना खूष करण्यासाठी, उपसभापतिपद मिळवण्यासाठी कारवाईचा प्रस्ताव आणत आहेत. त्या सरड्याप्रमाणे रंग बदलतात. त्यांच्या या पावित्र्यामुळे सरडाही लाजून गेला, असे म्हणाले. त्यावर महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करू नका, असे सांगत शिक्षण मंत्री दादा भुसे, निरंजन डावखरे यांनी त्याला आक्षेप घेतला.
प्रचंड गोंधळ होऊ लागल्याने सभापती शिंदे यांनी दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. त्यानंतर परब यांच्या आरोपामुळे संतप्त झालेल्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले. राठोड हे उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या क्लीन चिटमुळे मंत्री झाले आहेत. तुमच्यात हिम्मत असेल तर त्याबाबत उद्धव ठाकरेंना जाब विचारा, असे आव्हान देत आपल्यासारखे ५६ जण मी पायाला भिंगरी बांधून फिरवीत असते, असे वक्तव्य केले. या गोंधळाबाबत संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नाराजी व्यक्त करीत दोन्ही बाजूच्या सदस्यांना शांत राहण्याच्या सूचना केल्या. परब उत्तर देण्यासाठी उभे राहिले असता पुन्हा गदारोळ झाला. त्यामुळे तालिका अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी सभागृहाचे कामकाज अर्धा तास तहकूब केले.
आरोप करणाऱ्यावर बुमरँग होईल : उद्धव ठाकरे
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत. त्यात काडीमात्र तथ्य नाही, मात्र जे राजकारण करत आहेत त्यांच्यावर बुमरँग होईल, असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. ते म्हणाले, ‘केंद्र व राज्य सरकार त्यांच्या ताब्यात आहे. सर्व तपास यंत्रणा त्यांच्याकडे आहेत. मात्र ते अद्यापही तपास जनतेसमोर का आणत नाहीत, सत्ताधारी पक्षाचे आमदारच ठाण्यातील व नगर विकास पक्षाची विभागातील भ्रष्टाचार उघडकीस आणत असताना नागपूरमध्ये दंगल कशी होते, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, असे त्यांनी सांगितले.
जे काय असेल ते कोर्टासमोर सांगेन : आदित्य ठाकरे
गेल्या पाच वर्षापासून माझ्यावर या प्रकरणातून बदनामी करण्याचे प्रयत्न विरोधक करत आहेत. मात्र त्यामध्ये काडीमात्र तथ्य नाही. कोर्टाने मला जर काही विचारले तर मी त्यांना त्याबाबत सर्व काही सांगेन, अशी प्रतिक्रिया आ. आदित्य ठाकरे यांनी दिली.