मुलहेम : ध्रुव कपिला-तनिशा क्रॅस्टो या भारताच्या जोडीला जर्मन ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत शनिवारी पराभव पत्करावा लागला. त्यांच्या पराभवाबरोबरच भारतीय खेळाडूंचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. (Dhruv-Tanisha)
ध्रुव-तनिशा जोडीला या स्पर्धेमध्ये आठवे मानांकन होते. चुरशीच्या उपांत्य सामन्यात रेहान कुशारजांतो-ग्लोरिया विड्जाजा या इंडोनेशियाच्या जोडीने ध्रुव-कपिला यांच्यावर २५-२३, १०-२१, २१-१५ अशी मात केली. हा सामना १ तास रंगला. पहिला गेम गमवावा लागल्यानंतर ध्रुव-कपिला जोडीने जोरदार पुनरागमन करत दुसरा गेम २१-१० असा जिंकून सामन्यात बरोबरी साधली होती. निर्णायक गेममध्येही दोन्ही जोड्यांदरम्यान प्रत्येक गुणासाठी चुरस पाहायला मिळाली. या गेममध्ये एकावेळी इंडोनेशियाची जोडी १६-१५ अशा निसटत्या आघाडीवर होती. त्यावेळी मात्र, त्यांनी सलग पाच गुण जिंकून हा गेम २१-१५ असा जिंकला आणि विजय निश्चित केला. (Dhruv-Tanisha)
या स्पर्धेच्या पुरुष व महिला एकेरी, दुहेरी गटात खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले होते. केवळ मिश्र दुहेरीमध्येच ध्रुव-तनिशा जोडीच्या रूपाने भारताच्या आशा जिवंत होत्या. मात्र, उपांत्य फेरीचा अडथळा पार करण्यात ही जोडी अपयशी ठरली. (Dhruv-Tanisha)
हेही वाचा :