Home » Blog » राज्य देवेंद्रच्या हाती?

राज्य देवेंद्रच्या हाती?

निवडीची औपचारिकता बाकी

by प्रतिनिधी
0 comments
Devendra Fadnavis file photo

मुंबईः महाराष्ट्रात भाजपला आजपर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवून देणारे देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि भाजपच्या दबावामुळे आता फडणवीस यांच्या निवडीची औपचारिकता उरली आहे. अजित पवार यांनी रविवारीच फडणवीस यांच्या मुख्यमंत्री होण्याला अनुकूलता दाखवली होती. एकनाथ शिंदे यांच्या काही समर्थकांनी बिहार व अन्य राज्यांची उदाहरणे देत नाव रेटण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यावर उतारा म्हणून आता भाजप आणि शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद घेण्याचा फॉर्म्युला तयार करण्यात आला असून, त्याला तीनही पक्षांनी मान्यता दिली आहे. अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत उशिरा त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने राज्यात सरकार चालवण्याचा फॉर्म्युला ठरवला आहे. पहिली अडीच वर्षे फडणवीस मुख्यमंत्री, तर पुढील अडीच वर्षे शिंदे मुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर फडणवीस यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केले जाणार आहे. सूत्रानुसार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मिळून फडणवीस यांची भूमिका निश्चित केली आहे. त्यांना अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये करार झाला आहे. त्याचवेळी फडणवीस यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी पक्षश्रेष्ठी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तयारी सुरू झाली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी सहमती दर्शवल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याचे मुख्य कारण म्हणजे फडणवीस यांचा दोन्ही संघटनांमधील समान समन्वय हे आहे. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून फडणवीस विजयी झाले आहेत. या जागेवरून त्यांचा हा सलग चौथा विजय आहे. फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांचा पराभव केला आहे. २०१४ मध्येही दोघे आमनेसामने आले होते. त्या वेळी फडणवीस ५८,९४२ मतांनी विजयी झाले होते. २०१९ मध्ये काँग्रेसने उमेदवार बदलून आशिष देशमुख यांना तिकीट दिले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस ४९,३४४ मतांनी विजयी झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने फडणवीस यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. फडणवीस यांच्या नावाला मुख्यमंत्रिपदासाठी मंजुरी मिळाल्याचे भाजपच्या एका सूत्राने सांगितले. महायुतीतील अन्य सूत्रांनी सांगितले, की फडणवीस मुख्यमंत्रिपदी आणि  शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी एक उपमुख्यमंत्रिपद असेल. पवार यांच्यासह शिंदे यांना उपमुख्यमंत्री केले जाण्याची शक्यता आहे. गेल्या ३६ तासांपासून शिंदे यांची भाजपशी चर्चा सुरू होती.

शिवसेनेला जवळपास १२ मंत्रिपदे मिळू शकतात आणि काही महत्त्वाची खाती दिली जाऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसलाही सुमारे दहा मंत्रिपदे मिळणार असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रातील मंत्री परिषदेची संख्याबळ मर्यादा ४३ आहे, त्यात मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. १३२ आमदारांसह भाजपकडे २१ मंत्रिपदे जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह, वित्त, नगरविकास आणि महसूल ही प्रमुख चार खाती आता भाजपऐवजी युतीतील मित्रपक्षांना दिली जाणार आहेत. मंत्रिपदे आणि खात्यांच्या संख्येवरून वाटाघाटी सुरू आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दिल्लीत शिंदे, फडणवीस आणि पवार यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर घोषणा अपेक्षित आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पक्षाचे हित अबाधित ठेवत त्यांच्या समस्यांची काळजी घेण्याचे आश्वासन मित्रपक्षांना दिल्याचे मानले जात आहे. यापूर्वी २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळही पूर्ण केला. त्या वेळी भाजपची तत्कालीन अविभाजित शिवसेनेशी युती होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपने अजित पवार यांच्याशी हातमिळवणी केली. फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली; परंतु हे सरकार केवळ ८० तास टिकले.

सर्वाधिक आमदार फडणवीस यांच्या पाठीशी

भाजपच्या पाठिंब्यामुळे चार सहयोगी पक्षांतील आमदार निवडून आले. विधानसभेतील नवनिर्वाचित पाच आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे आणि अशोक माने, युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा आणि अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांचा भाजपला पाठिंबा आहे. ५ आमदारांच्या पाठिंब्यामुळे भाजपची संख्या १३७ वर पोहोचली आहे. महायुतीतील सर्वाधिक आमदारांची मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना पसंती देण्यात आली आहे. भाजपने आपल्या कोट्यातून चार जागा मित्रपक्षांना सोडल्या होत्या, त्यापैकी तीन जागांवर विजय झाला असून, तिन्ही आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00